व्हाईट हाउसमध्ये यजुर्वेदातील शांती पाठाचे मंत्रोच्चारण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020
Total Views |

america_1  H x



राष्ट्रीय प्रार्थना दिवसाचे औचित्य साधत व्हाईट हाउसमध्ये सर्वधर्मीय प्रार्थनांचे आयोजन



वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये राष्ट्रीय प्रार्थना दिवसाचे औचित्य साधत व्हाईट हाऊसमध्ये रोज गार्डनमध्ये एका हिंदू पुजार्‍याने पवित्र वैदिक शांति पाठाचे मंत्रोच्चारण केले. हा शांती पाठ कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून न्यूजर्सीमधील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे पुजारी हरीश ब्रह्मभट्ट व्हाईट हाउसमध्ये पोहचले होते. अन्य धर्मातील मंडळीदेखील याप्रसंगी तेथे उपस्थित होते.


ब्रम्हभट्ट यांनी यावेळेस रोज गार्ड्न मंचावर बोलताना सांगितले की,' कोव्हिड १९, सोशल डिस्टंसिंग, लॉकडाऊन या काळामध्ये लोकांच्या मनात बेचैनी वाढणं हे सामान्य आहे. हे शांती पाठाचे उच्चारण प्रसिद्धी, यश मिळवण्याचा किंवा स्वर्गात जाण्यासाठी केली जाणारी प्रार्थना नव्हे. हे शांती पाठ यजुर्वेदातून घेण्यात आलेल्या मंत्राची रचना असून तिच्या उच्चारणामुळे मनाची अस्वस्थता कमी होते.' या संस्कृत मंत्रपठणानंतर त्यांनी इंग्रजीमध्येही अनुवाद केला. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ब्रम्हभट्टांचे आभार मानले.


अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांनीदेखील याप्रसंगी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति शोक व्यक्त केला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय प्रार्थना दिवस दिवशी देशाला संबोधित करताना आपण एका भयावह आजाराचा सामना करतोय, त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. अमेरिकेने यापूर्वीही अनेक कठीण प्रसंगातून बाहेर पडताना धर्म,आस्था, प्रार्थना आणि ईश्वरीय शक्तीवर विश्वास ठेवला होता, असे नागरिकांना उद्देशून म्हटले आहे.



@@AUTHORINFO_V1@@