उशिरा सुचलेले शहाणपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020
Total Views |
all party meeting _1 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ७ मे रोजी सर्व विरोधी पक्षनेत्यांबरोबर चर्चा केली आणि त्यांच्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सुरुवात केली. खरे म्हणजे, कोरोना उग्र रूप धारण करत आहे, असे लक्षात आले तेव्हाच या लढ्यात सर्वांना सहभागी करून घ्यायला पाहिजे होते. पण, एखाद्या लढ्यात विरोधकांची सूचना, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची क्लृप्ती यशस्वी ठरली तर त्यांचा बोलबाला होतो. मग सरकार किंवा सरकारचे मुख्य म्हणून मुख्यमंत्री करत काय होते, असा प्रश्न उपस्थित होतो. बरे, सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे ‘तीन तिघाडी’पद्धतीचे आहे. विरोधकांना विचारविनिमयात सामावून एखाद्या घटकाला पटले नसते तर त्याचा सरकारवर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘सावध पवित्रा’ घेतला आणि विरोधकांवर राजकारण करीत असल्याचा ठपका ठेवून त्यांची प्रतिमा जनतेसमोर मलीन करण्याचा प्रयत्न केला. पण, अखेर कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांत विरोधकांना सामावून घेणे मुख्यमंत्र्यांना भाग पडले आणि ते उशिरा सुचलेले शहणपण ठरले. महाराष्ट्र हे अठरापगड जातीजमातीचे राज्य आहे. त्यामुळे जितक्या संघटना तितके पक्ष आणि तितके त्यांचे नेते. त्याप्रमाणे लहानमोठ्या अठरा पक्षांच्या प्रमुखांना गुरुवारच्या सभेत सामावून घेणे आणि त्यांच्या सूचनांवर विचार करणे मुख्यमंत्र्यांना भाग पडले. खरे तर कोरोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली आणि कोरोनाबाधितांवर उपचाराचे मुख्य रुग्णालय कस्तुरबा वगळून सर्व आजारांवर उपचारांसाठी मुख्य रुग्णालय असलेल्या शीव, केईएम आणि नायर रुग्णालये जेव्हा ‘कोविड-१९’ म्हणून जाहीर करण्याची वेळ आली, तेव्हाच कोरोनाचे उग्र रूप लक्षात घेऊन पुढे काय करायचे, यासाठी सर्व विरोधकांना सामावून घेणे आवश्यक होते. मात्र, राज्याची रुग्णसंख्या १७ हजारांवर पोहोचली आणि मुंबईची रुग्णसंख्या ११ हजारांवर पोहोचली, तेव्हा हे संकट सरकारच्या हाताबाहेर चालल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी विरोधकांना साद घातली आणि विरोधकांनी मान, अपमान विसरून त्यांना प्रतिसादही दिला. शेवटी संकटच सर्वांना एकत्र येण्याची सद्बुद्धी देते, हेच खरे!
 
 
 

विदारक दृश्य

 
 
 
कोरोनाने धारण केलेले उग्र रूप लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ७ मे रोजी घेतलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांबरोबरच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे राज ठाकरे यांनी पोलीस आणि मजुरांच्या दीन अवस्थेवर प्रकाश टाकला. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे. केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत. पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे लागेल, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर राज ठाकरे यांनी पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपीएफ फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहित धरत आहेत, अशी व्यथा मांडली. दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही २२ एप्रिलच्या अंकात पोलीस थकले असल्याची आणि त्यांना गृहित धरले जात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. राज ठाकरे यांनी ज्या एसआरपीएफ जवानांना आमंत्रित करण्याची सूचना केली आहे, त्या एसआरपीएफ जवानांची सध्याची अवस्था काय आहे, याचे विदारक दृश्य एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाले. मुंबई पोलीस मुख्यालयापासून काही अंतरावरच एसआरपीएफचे जवान पदपथावर झोपलेले ते दृश्य होते. लोकांना ‘घरात जा, घरात बसा,’ असे सांगणारे, लोकांच्या संरक्षणासाठी झटणारे हे जवान स्वतः मात्र आकाशाच्या छताखाली त्यांना कोणी वारस नसल्यासारखे झोपलेले ते दृश्य होते. त्याचवेळी शुक्रवारी ८ मे रोजी पहाटे जालना-भुसावळ रेल्वे मार्गावर मालगाडीखाली १६ मजूर चिरडून मृत्यमुखी पडले. त्यांची ओळख पटावी असे काहीही शिल्लक राहिले नव्हते. महिना-दीड महिना कोरोनाने कोंडी केल्यानंतर घरच्यांना भेटण्याच्या ओढीने हे मजूर गावाकडे निघाले होते. रेल्वे वाहतूक बंद असल्याने सुरक्षित म्हणून त्यांनी रेल्वे रुळांवरच डोके टेकले. मात्र, ती त्यांची निद्रा चिरनिद्रा ठरली. या मजुरांचे छिन्नविच्छिन्न देह त्यांच्या गावी जातील, तेव्हा तेथे होणारा आक्रोश अंगावर काटा उभा करणारा आणि मनाचा थरकाप उडविणारा असेल. आता पोलिसांना संरक्षण आणि राज्यांतर्गत मजुरांची सुरक्षितता याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.




- अरविंद सुर्वे 
@@AUTHORINFO_V1@@