लाॅकडाऊनमध्ये दापोलीत खवले मांजराचे तस्कर सक्रिय; २ किलो खवले जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020   
Total Views |

 pangolin_1  H x

 
 
कांदे-बटाटे विकण्याच्या निमित्ताने तस्कर गावागावांमध्ये सक्रिय
 
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - दापोली तालुक्यात खवले मांजरांचे तस्कर सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी रात्री दापोली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करंजाणी गावातील एका घरावर धाड टाकून खवले मांजराचे खवले, नख्या, कासवाचे कवच आणि जीवंत ससा ताब्यात घेतला. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला गावात येणाऱ्या तस्कराने खवले मांजराची शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे आता या तस्कराच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन वनाधिकाऱ्यांसमोर आहे.
 
 
 

pangolin_1  H x 
 
 
 
वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खवले मांजरांच्या खवल्यांना मोठी मागणी आहे. राज्यातील कोकण पट्ट्यात खवले मांजरांचा अधिवास आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा तस्कर पैशांची आमिष दाखवून गावकऱ्यांकडून खवले मांजरांची शिकार करुन घेतात. अशीच घटना दापोली तालुक्यातील करंजाणी गावातून उघड झाली आहे. गुरुवारी रात्री वनाधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करंजाणी गावातील कल्पेश बालगुडे यांच्या घरावर धाड मारली. या धाडीमधून अधिकाऱ्यांनी २ किलो २०० ग्रॅम खवले मांजराचे खवले आणि ६ नखे ताब्यात घेतली. याशिवाय गोड्या पाण्यातील कासवाचे कवच आणि जीवंत ससा देखील त्यांना घरामध्ये सापडला.
 
 
 
 
 
 
 
या प्रकरणी आम्ही आरोपील कल्पेश बालगुडे (वय ३५) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी 'महा MTB' ला दिली. गावात एक-दीड महिन्यांनी कांदे-बटाटे विकण्यासाठी येणाऱ्या एका इसमाने आपल्याला खवले मांजरांची शिकार करण्यास सांगितल्याचे आरोपी बालगुडेने चौकशीत सांगितले. तसेच शिकार करुन खवले कसे काढावे याच्या पद्धती देखील या इसमाने आरोपी बालगुडेला सांगितल्याचे, बोराटे म्हणाले. कांदे-बटाटे विकण्याच्या निमित्ताने हा इसम गावांगावांमध्ये जाऊन खवले मांजराची तस्करी करत असल्याची शक्यता बोराटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या तस्कराच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे.
 
 
 
चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेकडून कोकणात खवले मांजरावर संशोधनाचे काम सुरू आहे. दापोली तालुक्यातही या संस्थेकडून संशोधन कार्य सुरू आहे. याविषयी आम्ही संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक भाऊ काटदरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, यापूर्वी देखील कांदे-बटाटे, भंगार आणि अशा विविध कारणांच्या निमित्ताने तस्कर गावागावांमध्ये फिरुन ग्रामस्थांना खवले मांजराची शिकारी करण्याबाबत सांगत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी पैशाचे आमिष दाखवत आहेत. परंतु, वन विभागासह स्थानिक पोलीस यंत्रणा देखील या तस्कारांचा शोध घेण्यामध्ये रस दाखवत नाही. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@