पुलित्झर पुरस्कारा मागील वार्तांकनाचे सत्य
नवी दिल्ली : कुठल्याही ठिकाणी घडत असलेला वादंग, संकट किंवा आणखी काही गोष्टी प्रकरणे, प्रसार माध्यमे आणि पत्रकारांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करत असतात. तिथल्या वार्तांकनासाठी त्यांचा गौरव केला जातो, त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळत असते. भारतात जम्मू काश्मीरसारखी दुसरी जागा किंवा ठिकाण असल्या वृत्तांकानांसाठी असूच शकत नाही. त्यामुळे बुधवारी काश्मीरातील तीन पत्रकारांना जाहीर झालेल्या पुलित्झर पुरस्काराच्या निमित्ताने हे सत्य पुन्हा अधोरेखित झाले आहे. वार्तांकन निर्भीड असावे, त्याला एकेरी किंवा पूर्वग्रहदूषितपरणा नसावा, ही पत्रकारितेची मूळ मुल्ये आहेत. मात्र, त्या मुल्यांची पायमल्ली करून वार्तांकन करणाऱ्यांनी त्यावरच आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे.
मंगळवारी रात्री पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात काश्मीरसाठी वार्तांकन करणाऱ्या डार यासीन, मुख्तार खान आणि चन्नी आनंद या तिघांना हा पुरस्कार प्राप्त झाला. केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर तिथे ज्या ज्या गोष्टी घडल्या तिथल्या वार्तांकनासाठी हा पुरस्कार प्राप्त मिळाला आहे, असा दावा एपी वृत्तसंस्थेने केला आहे. मात्र, ज्या छायाचित्रांना हा पुरस्कार मिळाला त्यावर एक नजर टाकली असता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक डावपेच सहज लक्षात येईल.
ही छायाचित्रे जम्मू काश्मीरातीलच आहेत. मात्र, या छायाचित्रांच्या फोटोओळी देशाविरोधात एक सूर आळवत असल्याचे तुम्हाला दिसेल. भारत सरकार काश्मीरमध्ये कशाप्रकारे अन्याय अत्याचार करत आहे, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न या सर्वच छायाचित्रांतून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.
फोटो ओळींमध्ये भारताच्या ताब्यात असलेला काश्मीर (इंडियन कंट्रोल काश्मीर), असा उल्लेख प्रत्येक फोटोंमध्ये तुम्हाला दिसेल. यातून एकसंध भारताच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न आजतागायत परदेशी वृत्तवाहिन्या करत आल्या तसाच प्रयत्न या फोटोओळींमध्येही दिसून येईल. हे सर्व फोटो काश्मीरातलेच आहेत. तिथल्या छायाचित्रकारांनीच काढलेले आहेत. मात्र, काश्मीरमध्ये झालेला पुलवामा हल्ला, पाकिस्तानच्या सीमेलगत भागात नागरिकांच्या घरांवर होणारा गोळीबार, दहशतवाद्यांच्या चकमकीत हुतात्मा होणाऱ्या जवानांबद्दलचे वार्तांकन आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे कशा स्वरुपात दाखवतात हा देखील एक प्रश्नच आहे.

पाकिस्तान, फुटीरतावादी आणि भारताविरोधातील शक्ती ज्या प्रकारे अखंड भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या सारख्य़ांची भाषा आणि ही भाषा सारखीच वाटते. या सर्व फोटोंमध्ये चन्नी आनंद यांनी टीपलेला एका जवानाचा फोटो खुप सुंदर आहे. यावर शंका घेण्यासारखे काहीच नाही. तसेच फोटोओळींमध्येही जम्मू, भारत, असाच उल्लेख केला आहे. जाणकारांच्या मते, चन्नी आनंद यांना पुरस्कार देणे म्हणजे एक प्रकारे या वृत्तांकनावर प्रश्न उपस्थित न करण्यासाठीचा हा डावपेच असू शकतो. मात्र, इतर फोटोंमध्ये सरळ सरळ देशविरोध, काश्मीर भारताचा हिस्सा नसल्याचे भासवणे, सरकार इथल्या लोकांवर वारंवार अन्याय करत असल्याचा भास करणे, अशाच गोष्टी छायाचित्रांमध्ये दिसतील.
काही भारतविरोधी आंतरराष्ट्रीय शक्ती आजही हेच मानतात की, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही. काश्मीर स्वतंत्र आहे, त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या नकाशांमध्येही दिसून येत असेल. हाच अजेंडा पुरस्कार वितरण करतानाही समोर ठेवण्यात आला तो कायम वार्तांकन करतानाही ठेवण्यात येत होता, हे छायाचित्रांत दाखवून देण्यात आले आहे. यातला आणखी एक फोटो पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येईल. २२ मार्च २०१९ रोजीचा एक रिपोर्ट ज्यात एका ११ वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाच्या बाजूला त्याचा परिवार शोक व्यक्त करताना बसला आहे. त्याच्या फोटोओळींकडे पाहिल्यास धडधडीत खोटा मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे.
११ वर्षाच्या आतीफ मीरचा मृत्यू भारतीय संरक्षक दलाच्या गोळीबारामुळे झाल्याचे या फोटोत म्हटले आहे. मात्र, सत्यता पडताळल्यास एक लक्षात येते कि, २१ मार्च रोजी आतीफ आणि त्याचे काका अब्दुल मीर यांना एका खोलीत दहशतवाद्यांनी बंद करून ठेवले होते. अब्दुल कसाबसा या खोलीतून पळ काढला मात्र, आतीफ हा तिथेच अडकून पडला. लष्कराने तिथल्या खोलीला घेराव घातला तेव्हा भेदरलेल्या दहशतवाद्यांनी आतीफला गोळ्या घालून ठार केले. अली भाई नामक एका दहशतवाद्याची नजर आतीफच्या बहिणीवर होती, तिच्याशी निकाह करण्याचा विचार त्याने त्यांच्या कुटूंबियांना बोलून दाखवले होते. मात्र, त्यांनी दहशतवाद्याला आपली मुलगी देण्यास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी अली भाईने हा सर्व खेळ रचला. हे या फोटोमागचे सत्य उघडकीस आले आहे.
या प्रकारावर संबित पात्रा म्हणतात, "तुम्ही जर पुलित्झर पुरस्कार वेबसाईटवर काही छायाचित्रे पाहिलीत तर त्यात असा स्पष्ट उल्लेख केलेला आढळेल कि, भारताने काश्मीरवर कब्जा केला आहे, तिथल्या लोकांना स्वतंत्र देश हवा असून भारताने हा भूभाग स्वतःच्या ताब्यात ठेवला आहे. दरम्यान, अशा पुरस्काराचे कौतूक देशातील लोकांनी केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या तिन्ही पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काश्मीर मुद्द्यावर आपली भूमीका स्पष्ट करावी", अशी मागणी त्यांनी केली आहे. पुलवामा हल्ला, हंडवाडा हल्ला, दहशवाद्यांतर्फे नागरिकांचा केली जाणारा अमानुष छळ, रात्री बेरात्री घरे वस्त्यांवर पाकिस्तानातून होणारा गोळीबार हे सत्य आंतरराष्ट्रीय मीडियासमोर कधी आणले जाणार,हा देखील प्रश्न आहे...
या छायाचित्रांसाठी कधी पुलित्झर मिळणार का ?