दुरितांचे तिमिर जावो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |


sunrise_1  H x


चांगुलपणा कोणास आवडत नाही? जगातील सर्व प्राणी व विशेष करून मानवसमूह हे नेहमी चांगल्या गोष्टींचीच अपेक्षा ठेवतील. वाईटाची कोणालाच अभिलाषा नसते. सर्वजण सद्गुण सच्छिल, मांगल्य आणि सुंदरतेचाच आग्रह धरतात. सदरील मंत्रात वाईट नको, चांगलेच हवे!हा भाव व्यक्त होतो.



विश्वानि देव सवितर्दुरितानि परा सुव ।

यद् भद्रं तन्न आसुव ॥

(ऋ. 5/82/5, यजु. 30/3)

अन्वयार्थ

(सवितः) हे सकल जगाच्या सृजनकर्त्या, प्रेरक परमेश्वरा! (देव) हे दिव्यगुणांनी परिपूर्ण देवा! तू आमच्यातील (विश्वानि) अखिल, सर्व (दुरितानि) दुर्गुणांना, पापांना (परा सुव) दूर कर आणि (यत्) जे काही (भद्रम्) पवित्र, शुद्ध व कल्याणकारी गुण, कर्म, स्वभाव आहेत (तत्) ते (नः) आम्हा सर्वांना (आसुव) प्रदान कर.



विवेचन

चांगुलपणा कोणास आवडत नाही? जगातील सर्व प्राणी व विशेष करून मानवसमूह हे नेहमी चांगल्या गोष्टींचीच अपेक्षा ठेवतील. वाईटाची कोणालाच अभिलाषा नसते. सर्वजण सद्गुण सच्छिल, मांगल्य आणि सुंदरतेचाच आग्रह धरतात. सदरील मंत्रात वाईट नको, चांगलेच हवे!हा भाव व्यक्त होतो. मंत्र छोटासाच आहे, पण भाव मात्र व्यापक स्वरुपाचा आहे. इथे उपदेश नसून प्रार्थनाच दृष्टीस पडते. प्रार्थना म्हटले की, याचकांच्या मनातील तीव्र आकांक्षा किंवा अभिलाषा असा अर्थ ग्रहीत धरला जातो. पण, ‘प्र + अर्थनाया शब्द विग्रहाद्वारे आपणास प्रकर्षाने केलेली किंवा उत्कंठापूर्वक झालेली याचना हा स्पष्टार्थ लक्षात येतो. मागणारी व्यक्ती ही अतिशय तीव्र इच्छेने, तितक्याच विह्वलतेने व मनापासून आपल्या इच्छित वस्तू, पदार्थ किंवा ध्येयप्राप्तीची मागणी करते. याचक हा त्याचेच मागणे मागतो, जे की त्यास ज्ञान असते व ते मिळविण्याचे सामर्थ्य त्यात असते, अन्यथा त्याची प्रार्थना व्यर्थ जाते. एखादा गरीब माणूस दोन वेळचे जेवणच मागेल किंवा जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा! देशाचे पंतप्रधानपद मिळावे, असे त्याला कदापि वाटणार नाही. म्हणजेच इप्सित ध्येयाचा अर्थ आणि स्वतः भव्य ते मिळविण्याची शक्ती, या दोन बाबी समजल्याविना प्रार्थना करणे काहीच कामाचे नाही. म्हणूनच सर्वसामान्य लोक हे कोणत्याही मत-पंथाचे (धर्माचे) असोत की, वर्ण अथवा देशांचे आपल्या इष्टदेवतेकडे ते मोक्ष किंवा स्वर्गाची कामना कधीच करीत नाही. त्यांना तर इहलोकासाठी भौतिक सुखसुविधाच हव्यात! दुःख, दारिद्य्र, क्लेश नको, तर सुखसंपदा, आनंद, हर्ष आणि भौतिक ऐश्वर्य हवे! हाच हेतू या मंत्रातून प्रतिपादिला आहे-



दुरितानि परासुव... भद्रम् आसुव ।


हे ईश्वरा! दुरितांना दूर कर आणि सुचरितांना प्रदान कर! अगदीच सोपी प्रार्थना आहे ही!
दुरितहा शब्द दुः+इतम्हणजेच दुःखांना व पापकर्मांना प्राप्त झालेलेया अर्थाने तयार होतो. अर्थात या जगात जे काही अनिष्ट, वाईट, अमंगल, पाप, अपवित्र, अशुद्ध आहे, ते सर्व दुरित आहे. पण, याची संख्या सर्वाधिक आहे. म्हणूनच मंत्रात विश्वानिहे विशेषण आले आहे. याचा अर्थ सकलानि, अत्याधिकानि किंह सर्वाणि।असा होतो. समग्र जगात दुरिते ही अनेक प्रकारची आहेत. जिकडे पाहावे तिकडे दुरितांचा अंधारच दडला आहे. चांगुलपणा फार कमी प्रमाणात व तोही शोधूनच सापडेल! वाटेने चाललेल्या पांथस्थाला आपल्या इच्छीत ठिकाणी पोहोचायचे आहे, पण रस्ता बरोबर नाही. नद्या, नाले, काटेकुटे हे सर्व बाह्य अडथळे तर शारीरिक थकावट, विश्रांती, खाद्यपदार्थ, पाणी वगैरे न मिळणे हे आंतरिक अडथळे! पण अशी असंख्य दुरिते असली, तरी ध्येय मात्र निश्चितस्थळी पोहोचणे, हे एकमेव आहे. म्हणूनच पथिकाला अनेक अडथळ्यांनी भरलेल्या मार्गाला पार करीत आपल्या मूळ एकाच उद्दिष्टाला प्राप्त करायचे आहे. अनेकविध दुरितांना दूर सारत एका भद्राला म्हणजेच पावित्र्याला मिळवायचेय! यासाठीच भक्ताची दुर्गुणांचे निवारण करून सद्गुण धारण्यासाठीची ही आर्त विनवणी!



खरे तर दुर्गुण दूर झाले की सद्गुण आपोआपच समोर येतात. कपड्यांवरचा मळ नाहीसा झाला की ते आपोआप स्वच्छ होतातच. अंधार दूर झाला की प्रकाशास जागा उरतेच. मनावर साचलेले काम
, क्रोध, लोभ, मोह, इर्ष्या, अहंकार या सहा रिपूंचे किंवा दोषांचे मळभ नष्ट झाले की, मन व इंद्रिय पवित्र व शुद्ध होतात आणि भक्त ही भगवंताच्या भक्ती व उपासनेसाठी सिद्ध होतो. दुरितांकरिता दुःखहादेखील पर्यायवाचक शब्द आहे. न्यायदर्शनया ग्रंथात महर्षी गौतम म्हणतात- बंधनालक्षणार्थं दुःखम् ।म्हणजेच सन्मार्गात अडथळे (बाधा) आणणारे जे तत्त्व आहे, ते दुःख होय. यालाच दुरितम्हणतात. त्या सर्व दुुरितांना रोखणे, अडविणे म्हणजेच भद्रहोय. तदत्यन्तनिमोत्यो अपवर्जः।सर्व तर्‍हेच्या दुरितांना, दुःखांना पूर्णपणे नाहीसे केले की अपवर्गम्हणजेच भद्र व कल्याणकारक बाबी आपोआप उदयास येतात.



मंत्रातील विशेष गोष्ट ही की
, इथे दुरितानिअनेकवचनी तर भद्रम्हे एकवचनी रूप आले आहे. याचे कारण हे की, जगात वाईट गोष्टी मोठ्या प्रमाणावर असतात. पण त्यांच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे भद्रत्व होय. एका चांगल्या गोष्टीमुळे असंख्य वाईट दुर्गुणांचा अंत होतो. कारण शूद्र म्हणजेच ईश्वरीय शाश्वत सत्य किंवा धर्म! महापुरुष हे सत्यानुगामी व धर्मानुरानी असतात. एकाच सत्याच्या छत्रछायेखाली त्यांचे जीवन पवित्र होते. मनसा-वाचा-कर्मणा ते सत्यतत्त्वांचा अंगिकार करणारे असतात. धर्ममार्गाची त्यांची वाटचाल ही सार्‍या अनिष्टांना दूर सारणारी असते. प्राण गेले तर बेहत्तर, पण सत्य धर्माची कास ते कदापि सोडत नाहीत. म्हणूनच ते अजरामर ठरतात.



आपल्या दुर्गुणांना नाहीसे करणे व त्याऐवजी सद्गुणांना धारण करण्याची अर्चना ही सविता देवाकडे केली आहे. मंत्रोक्त
सविताचा संबंध परासुवआसुवया दोन्हींशी आहे. कारण हे तिन्ही शब्द सु’ (षु) या एकाच धातूपासून तयार होतात. याचा अर्थ प्रसव करणे (जन्म देणे) उत्पन्न करणे किंवा जागृत करणे असे होतात. ज्या आईने बाळाला नुकतेच जन्माला घातले आहे, म्हणून तिला प्रसुता माताअसे म्हणतात. पण, समग्र विश्वाला जो ईश्वरीय तत्त्व जन्म देते, प्रसविते, म्हणून तिला प्रसविताम्हटले जाते. याकरिता भगवंताचे सविताहे नाव अतिशय सार्थक असे आहे. हे समजण्याकरिता सृष्टीतील तेजोमय गोलक असलेल्या सूर्याचे उदाहरण घेऊया!


सूर्याला
सविताअसे संबोधण्याचे कारण म्हणजे त्याच्यात विद्यमान असलेली प्रसविण्याची, उत्पन्न करण्याची किंवा निर्मिण्याची प्रेरक शक्ती होय. सूर्य उगवताच त्याची तेजोमय प्रकाशकिरणे ज्या ज्या वस्तू किंवा पदार्थांवर पडतात, तेव्हा त्यांच्यात प्रसुत होण्याची व जागृतीची प्रक्रिया सुरू होते. सूर्य स्वतःहून कोणास उत्पन्न करीत नाही व जन्माला देखील घालीत नाही. पण, त्या त्या घटकांमध्ये प्रसुप्त असलेल्या दिव्य शक्तींना जन्मण्याकरिता प्रेरणा देतो. अंतराळात अतिशय दूर अंतरावर असलेला तो सूर्य इथे प्रत्यक्ष येऊन काय जन्माला घालतो काय? किंवा सृष्टीतील सर्व जड व चेतन वस्तूसमूहांशी सूर्याचा कुठे कारणकार्यभाव संबंध तरी आहे काय? पण सूर्याचे हेच स्वभाव की, तो आपल्या प्रखर तेजाने जगातील सर्व वस्तूंमध्ये सृजनशीलता येण्याकरिता प्रेरणा देतो.



 आता आपण वळू या, त्या महासूर्याकडे! ज्याच्या प्रेरणेने या खगोलात असंख्य सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे एका विशिष्ट गतीमध्ये कार्यरत आहेत. जिथे जिथे जीवसृष्टी आहे, त्या त्या भूमीवर सर्व प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू एवढेच नव्हे, तर असंख्य नद्या, पर्वते इत्यादी उत्पत्ती, स्थिती व लय या प्रक्रियेतून जातात. याकरिता प्रेरक म्हणजेच तो सविता देव! किती हा अवर्णनीय व महानतम आहे. अशा सकलजनांच्या जन्मदात्या प्रेरक सवितृदेवाकडेच सर्व दुर्गुणनिवारणांकरिता आणि श्रेष्ठ गुण, कर्म, आचार-विचारादी धारण करण्याकरिता अगदी प्रयत्नपूर्वक प्रार्थना करणे इष्ट आहे. चला, तर मग अज्ञान, अविद्या, अंधश्रद्धा, अकर्म्यण्यता, आळस, प्रमाद, दुर्व्यसन इत्यादी दुर्गुणांचा सर्वत्र पसरलेला काळोख नाहीसा करून विश्वमंगलकारी आणि सकलजीव उद्धारी, परोपकारी सद्गुणांना धारण करू, याची प्रार्थना करू या! जेणेकरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील खालील सद्भाव वृद्धिंगत होण्यात मदत मिळेल!

दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ।

जो जे वांच्छील तो ते लाहो । प्राणिजात ॥


 - प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@