श्रवणप्रतिष्ठा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |


ears_1  H x W:


लहानपणी नवजात बालकाला काही कळत नाही. ते बालक अज्ञानदशेत असते. नंतर कालांतराने ती व्यक्ती आजूबाजूचे पाहून, अनुभवातून व दुसर्‍यांचे ऐकून शिकत जाते व शहाणे होते. शब्द तसेच भाषा यांच्याद्वारा विचार दुसर्‍यांपर्यंत पोहोचवता येतात. त्यामुळे ऐकलेले किंवा वाचलेले शब्द माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात.



आजूबाजूचे ऐकत असता म्हणजे श्रवण करीत असता वृत्तीत फरक पडत जातो. योग्य काय, अयोग्य काय, याची मनाला जाणीव होत जाते. हे जे विचारमंथन माणसाच्या मनात चालू असते, त्याला ‘मनन’ असे म्हणतात. चांगले काय हे समजू लागले की त्याची आवड निर्माण होते. माणसाला त्या गोष्टीचा छंद लागतो, त्यामुळे त्याचे सतत चिंतन होते. त्यातून एकाग्रता वाढीस लागते. त्याला ‘निजध्यास’ असे म्हणतात. मानवी जीवनात श्रवण, मनन, निजध्यास यांना मोठे स्थान आहे. या सूक्ष्म शक्तींनी माणसाचे आयुष्य घडत असते. या सर्व शक्तीत श्रवणाला विशेष स्थान आहे. भागवत ग्रंथात ‘नवविधा भक्ती’ सांगितल्या आहेत.
 
 

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
 
 
दासबोधात स्वामींनी त्या भक्ती विस्तारपूर्वक सांगितल्या असल्या तरी त्यांचा क्रम कायम ठेवला आहे. अर्थात, त्या नऊ भक्तीत श्रवणभक्तीला पहिले व विशेष स्थान दिलेले आहे. स्वामींनी श्रवणप्रतिष्ठा दासबोधात ठिकठिकाणी प्रतिपादली आहे. माणसाने सर्व ऐकावे, हे जरी खरे असले तरी त्यातील तत्त्वांश काय, ते शोधून सार तेवढेच घ्यावे आणि असार म्हणजे जे टाकाऊ, निरुपयोगी असेल ते सोडून द्यावे.
 
ऐसे हे अवघेचि ऐकावे ।
परंतु सार शोधून घ्यावे ।
असार ते जाणोनि त्यागावे ।
या नाव श्रवणभक्ती ॥
 
तसे पाहिले तर वाचन हेही एकप्रकारे श्रवणच आहे. तरीसुद्धा ते विचार एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या तोंडून ऐकले, तर त्याला विशेष महत्त्व आहे. आज तर श्रवणाची अनेक साधने उपलब्ध आहेत. रामदासांच्या काळी मात्र कीर्तन, प्रवचन, ग्रंथश्रवण हीच श्रवणाची साधने होती. आजच्या काळात श्रवणसाधनांची रेलचेल झाल्यामुळे आपण काय ऐकावे किंवा काय वाचावे, हे पूर्ण विचारान्ती ठरवावे लागते. यावरही स्वामींनी मार्गदर्शन केलेले आढळते. काहीवेळा एखाद्या श्रवणाने आपले समाधान भंग पावते आणि मनाचा केलेला निश्चय मोडीत निघतो. असे हे भ्रम उत्पन्न करणारे व मानसिक हानिकारक वक्तृत्व सोडून द्यावे. काहीवेळा एखादे वक्तृत्व ऐकून मन काही निश्चय करते किंवा ग्रंथाच्या वाचनाने मनाचा निश्चय होतो. त्याच विषयावरचे दुसरे व्याख्यान ऐकावे किंवा दुसरा ग्रंथ वाचावा, तर मनातील अगोदरचा निश्चय उडून जातो. त्यामुळे अनिश्चितता आपली साथ करीत राहते. ज्या वाचनाने शंका निवृत्ती होते, संशय नाहीसे होतात, असे परमार्थापर अध्यात्मग्रंथांचे वाचन, श्रवण श्रेयस्कर होय.
 
जेथे संशय तुटती ।
होये आशंका निवृत्ती ।
अद्वैतग्रंथ परमार्थी । श्रवण करुवे ॥
 
पाणी उतारावर सहजगत्या वाहते. तसे मनात आपोआप आवड निर्माण होते, त्याला ‘प्रेम’ म्हणतात. जशी आवड तसे वाचन, श्रवण घडते. आत्मज्ञानी माणसाला इतर विषय आवडणार नाहीत. त्याला आध्यात्म आवडेल, तसेच स्थानालाही महत्त्व असते. मनगटावरचे वीरकंकण नथीप्रमाणे नाकात घातले, तर ते शोभा देत नाही. तीर्थे अपार आहेत. त्या त्या तीर्थाचे माहात्म्य त्या तीर्थावर सांगावे लागते. मल्हारी माहात्म्य द्वारकेला चालणार नाही. द्वारका माहात्म्य काशीला आणि काशीमाहात्म्य तिरुपतीच्या व्यंकटेशाला चालणार नाही. जेथील तेथे शोभून दिसते. जे योग्य तेच त्याच्यापुढे ठेवावे. योग्यापुढे भुताटकी, रत्नपारख्यासमोर दगड, विद्वान माणसापुढे तमाशातील गाणे म्हणणे विपरीत होईल.
 
योगियापुढे राहाण ।
परीक्षावंतापुढे पाषाण ।
पंडितांपुढे डफगाण । शोभा न पवे ॥
वेदज्ञापुढे जती । नि:स्पृहापुढे फलश्रुती ।
ज्ञानीयांपुढे पोथी । कोकशास्त्राची ॥


अशा अनेक विपरीत जोड्या स्वामींनी दशक ७, समास ९ मध्ये सांगितल्या आहेत. ज्ञानाचे श्रवण करावे, इतर श्रवण ही केवळ करमणूक. त्याने हीत साधणार नाही, असे स्वामींनी शेवटी सांगितले आहे. श्रवण जरी ऐकणार्‍याला करायचे असले, तरी त्यासाठी सांगणाराही तितकाच महत्त्वाचा व जबाबदार असतो. श्रोता आणि वक्ता दोघेही ज्ञानी, अनुभवी असले तरच ते श्रवण चांगले होते. आज इतर सामाजिक गोष्टी सोडून दिल्या तरी अध्यात्मक्षेत्रात तरी कुठे चांगले प्रवचनकार वक्ते उरलेत? अनुभवाचा लेश नसलेले हे वटवट करून इतरांनाही आपल्याबरोबर गटांगळ्या खायला लावतात.
 
पोहणाराचि गुचक्या खातो ।
जनास कैसा काढू पाहतो ॥
 
हे लोक परस्परविरोधी विधाने करून आपले तत्त्वज्ञानातील अज्ञान उघडे करतात किंवा काहीवेळा मूळ मुद्दा सोडून पाल्हाळ लावून श्रोत्यांना जेरीस आणतात. श्रवणाचे महत्त्व समजले तरी त्यातील अडथळे, विक्षेप कसे येतात, यावरही स्वामींनी दासबोधाच्या दशक १८, समास १०मध्ये मार्मिक आणि मिस्कीलपणे विवरण केले आहे. हे विशेष खूप आहेत.
 
श्रवणाआड विक्षेप येती ।
नाना जिनस सांगो किती ॥
 
या विक्षेप विवरणात स्वामींचे मनुष्य स्वभावाचे ज्ञान व निरीक्षण दिसून येते. एखाद्या वक्त्याचे भाषण लोक शांतपणे ऐकत असतात. त्या विचारात लोक एकाग्र झालेले असतात. अशावेळी काही लोक बाहेरून येऊन श्रोतृसमुदायात बसतात. त्यापैकी एखादा बाहेर हिंडून काही ऐकून आलेला असतो. फार ऐकल्याने त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला असतो. त्याला स्वस्थ बसवत नाही. तो लोकांत बोलत बसतो. प्रसंग काय आणि हा वागतो कसा?
 
‘प्रसंग पाहोन चालती ।
ऐसे लोक थोडे असती ॥


या वागण्याने सार्‍यांच्याच श्रवणात विक्षेप येतो. श्रवणास बसले की शरीर अवघडून जाते. पाठीला पायाला रग लागते. डोळ्यांपुढे झापड येऊन जांभया येऊ लागतात. आणखीही शारीरिक विक्षेप या समासात स्वामींनी मिश्कीलपणे मांडले आहेत.


कर्पट ढेकर उचक्या देती । वारा सरता मोठी फजिती । क्षणक्षणा उठोनी जाती । लघुशंकेसी ॥

वक्त्याचे व्याख्यान चालू असता लोक शांतपणे ते ऐकत असतात. अशावेळी अचानक वारा सरल्याने किंचित जरी आवाज झाला, तर लोकांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळतात, तेव्हा मोठी फजितीच होते! श्रवणात विक्षेप येतो. एखादे वेळी जागा जुनी असेल तर विंचू डंख मारतो. मग कसले व्याख्यान अन् कसले श्रवण! श्रवणासाठी येऊन बसलेल्या लोकात अनेक तर्‍हेचे लोक असतात. स्वामींनी त्यांना बरोबर टिपले आहे.
 
विषयी लोक श्रवणा येती ।
ते बायकांकडेच पाहती ।
चोरटे लोक चोरून नेती । पादरक्षा ॥


श्रोत्यांमधील विषयी लोक स्त्रियांकडे टक लावून पाहत बसतात, तर काही लोक चप्पल चोरायला आलेले असतात, ते चपलांचा विचार करीत बसतात. एखादे वेळी वक्ता सांगतो ते खरे की खोटे, यावर श्रोत्यात बाचाबाची होते. जो तो ‘माझेच बरोबर’ म्हणतो. त्या वादावादीत शिवीगाळापर्यंत वेळ येते आणि श्रवण बाजूला राहाते. काहीवेळा तर कथेकरी बुवाच रे रे करीत रटाळ कीर्तन लावतात, तेव्हा श्रोतेही आपापसात गप्पागोष्टी करीत बसतात. समर्थांचे मानवी मनाचे निरीक्षण अफाट आहे. समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक श्री. म. माटे म्हणतात, “मानवी मनाचा इतका सूक्ष्म शोध रामदासांशिवाय इतर कोणाही समकालीन ग्रंथकाराने केला नाही.” हे अगदी खरे आहे.
 
 

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@