‘कोरोना’शी लढताना सेवाकरूणेचा सागर ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020   
Total Views |


Keshavsrushti_1 &nbs


वाडा, विक्रमगड, जव्हार मधल्या ६० गावांत तर मोखाड्यामधील १५ गावांत ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’चे काम सुरू आहे. कोरोनाच्या आपत्कालामध्ये ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’चे कार्य, त्याचे स्वरूप यांची व्याप्ती वाढली आहे. पालघर जिल्हा प्रशासनासोबत ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करताना ‘केशवसृष्टी’चे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि अतुलनीय आहे. त्या कार्याचा घेतलेला मागोवा.



कोरोनाच्या संकट काळातही नेहमी प्रमाणे सुरू असणारे काम करत राहणार असे वाटले, पण विमल केडियाजींचा फोन आला. ते म्हणाले, “संतोषजी कोरोनाची भीषणता गावपाड्यापर्यंत कदाचित पोहोचेल. पण आपण मागे हटायचे नाही. सर्वशक्तीनिशी सेवा करायची, आपल्या बांधवासाठी काम करायचे. आणि हो, वाडा, जव्हार, विक्रमगड आणि मोखाडा या तालुक्यातील एकही जण उपाशी राहता कामा नये. आपण या तालुक्यातील ६० गावांसाठी काम करतो. पण आता ६० गाव धरूनच चालणार नाही. आपल्याला या गावाव्यतिरिक्तही सेवा करावी लागेल. विमलजी असे म्हणाले आणि आमच्या सगळ्यांच्या मनात प्रेरणा जागृत झाली की, हो या संकटकाळात आपण पुढे येऊन समस्यांशी भिडत समाजासाठी काम केले पाहिजे.” त्यातूनच मग ‘केशवसृष्टी’च्या ग्रामविकास योजनेचे कोरोना स्थितीमध्येही आपत्तीनिवारणचे कार्य सुरू झाले. ‘केशवसृष्टी’चे विश्वस्त संतोष गायकवाड सांगत होते.

 


संतोष गायकवाड यांच्याशी बोलताना ‘केशव सृष्टी’च्या ग्रामविकास प्रकल्पाची माहिती मिळाली. ती अशी –

 


ग्रामविकास योजना मुख्यत: नऊ आयामांवर काम करते.

 

. जल २. कृषी/पर्यावरण, ३. शिक्षण/संस्कार ४. आरोग्य/स्वच्छता ५. सौरऊर्जा ६. सरकारी योजना ७. नेतृत्व विकास/ विवेकानंद शक्ती केंद्र, ८. उद्योग ९. महिला सक्षमीकरण.

 

पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यामध्ये ग्रामविकासाचे काम चालते. शहर आणि गाव यामधील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ स्तर दूर व्हावा. गावातील लोकांनाही प्रगतीच्या संधी मिळाव्यात, त्यांच्यापर्यंत किमान सुविधा पोहोचाव्यात यासाठीचे काम या योजनेतून होते. त्यासाठी गावागावात संघटनही केलेले. शहरी भागातील काही सेवाभावी लोकही या प्रकल्पासाठी काम करतात. आतापर्यंत सर्वसाधारणपणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जायचे. गावात विवेकांनद शक्तिकेंद्र, माधव संस्कार केंद्र वगैरेच्या माध्यमातून संपर्क, संवाद, सेवाकार्य सुरूच होते. पण कोरोनाची आपत्ती आली आणि ग्रामविकास योजनेच्या कार्याचे स्वरूपही बदलले. ग्रामविकास योजनेची कामे ज्या गावातून व्हायची ती गावे मूलत: वनवासीबहुल. कोरोनाची आपत्ती आली आणि गावपाडे सोडून जगण्यासाठी शहरात स्थलांतर केलेले वनवासीबांधव पुन्हा येनकेन मार्गे गावपाड्यात परतले. तो ‘लॉकडाऊन’चा पहिल्या कालावधीच्या पूर्वीचा काळ. त्यामुळे या गावामध्ये लोकसंख्या वाढली. बरे हे कोणी परकीय नव्हतेच, तर गावातलेच लोक होते. सुरुवातीला कोरोनाची भीषणता या वनवासी गावात जाणवली नाही. मात्र, गावातलेही उद्योगधंदे बंद पडले आणि त्याचा परिणाम या गावातल्या जगण्यावरही झाला. पाड्यातले आर्थिक चक्रही थांबले. यांना कोणी मदत करावी? त्यासाठी पुढे सरसावले ‘केशवसृष्टी.’

 


‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’च्या माध्यमातून कोरोना संकटकाळात काम करण्यास सिद्ध झाली. ‘केशवसृष्टी’चे सामाजिक कार्य तर शब्दातीत आहेच. पण कोरोनाच्या संकटकाळातही ‘केशवसृष्टी’ अतुलनीय सेवाकार्य करत आहे. नुकतेच ‘केशवसृष्टी’मार्फत कोरोना विषाणूंमुळे वाडे तालुक्यातील कुडूस भागात अडकलेल्या ओडिशा येथील १२३ कामगारांना किमान महिनाभर पुरेल इतके पुरेसे अन्नधान्य वाडा तहसीलदार उध्दव कदम यांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये तांदूळ, तूरडाळ, साखर, गोडेतेल, मीठ, मटकी, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चहा पावडर, अंगाचा साबण, आगपेटी इत्यादी जीवनावश्यक साहित्य होते. यावेळी नायब तहसीलदार सुनील लहांगे, ‘केशवसृष्टी’चे विश्वस्त संतोष गायकवाड, ग्रामविकास योजनेचे संयोजक अरविंद मार्डिकर उपस्थित होते. पण या गरीब कामगारांना अन्नधान्य दिले तरी ते अन्न शिजवून खाण्याइतकी भांडीकुंडी सुविधा त्यांच्याकडे नव्हत्याच. मग ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’च्या माध्यमातून त्यांना भांडीकुंडीही पुरवण्यात आली. कोरोनाच्या आपत्काळात जवजवळ २,२०० कुटुंबीयांना रेशन किटसही देण्यात आले. अर्थात, इतक्या जणांना रेशन किटस देताना गर्दीगोंधळ झालाही असता. पण तसे घडले नाही. कारण. ‘केशवसृष्टी’ने यासाठी प्रशासनाची मदत घेतली. प्रशासनाकडे यादी होती की कुणाकडे रेशनकार्ड आहे, कुणाला धान्यवितरण झाले आहे, कोण या सुविधांपासून वंचित आहे. प्रशासनाकडून या वंचितांची यादी घेण्यात आली. त्यांनाच हे रेशन किट देण्यात आले. आपण अनुभव घेत असतो की मदत करायची म्हणून सरसकट कुणालाही मदत करा, असे होताना दिसते. पण ‘केशवसृष्टी’च्या ग्रामविकास योजनेच्या पदाधिकार्‍यांनी असे होऊ दिले नाही. ते प्रत्यक्ष गरजूूंपर्यंत पोहोचले. त्यांनाच मदत केली. काही घरात असेही असते की रेशनकार्ड आहे, पण घरातल्या नव्या सूनेचे किंवा काही जणांचे नावच त्यात नहाी. त्यामुळे त्यांच्या वाटेचे रेशन मिळत नाही किंवा काही कुटुंबे विभक्त झालेली असतात. त्यांनाही रेशन सुविधा मिळाली नाही. अशा लोकांनाही ‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून रेशन किट देण्यात आले. कार्यकर्त्यांना असे दिसून आले की पंतप्रधान योजनेअंतर्गत ५०० रूपये मिळवण्यासाठी आयाबाया पहाटेपासून दुपारपर्यंत बँकेसमोर रांगा लावतात. त्यादरम्यान त्या काहीच खातपित नाहीत. तेव्हा या ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’ अवेरनेस, कोरोना जागृती करत रांगेतील महिलांना दररोज अन्न वितरीत करण्यात येते.

 

‘लॉकडाऊन’मुळे सगळेच बंद आहे. पण छोटेमोठे आजार बंद नाहीत. साधे आजार झाल्यास दवाखानेही बंद. मग ‘केशवसृष्टी’तर्फे गावागावात मेडिकल किट ही देण्यात आले. हे किट विवेकानंद शक्तिकेंद्राच्या प्रमुखाकडे देण्यात आले. तसेच आशा वर्कर किंवा आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना देण्यात आले. कुणाला औषधांची गरज असली तर त्यांनी या व्यक्तींकडून औषधे घ्यावीत, अशी सुविधा निर्माण करून देण्यात आली. ग्रामविकास योजनेअंतर्गत काही महिलांना शिवणकामाचा रोजगार उपलब्ध व्हायचा. पण ‘लॉकडाऊन’ मुळे तो बंद झाला. ग्रामविकास योजनेने यातूनही मार्ग काढला. त्यांनी महिलांना ‘हायजीन’ पाळत मास्क बनवायचे प्रशिक्षण दिले. त्या महिलांना मास्क बनवण्यासाठीचा कच्चा माल दिला जातो. त्याच महिलांकडून ‘केशवसृष्टी मास्क’ विकत घेते. अशा प्रकारे हजारो मास्क विकत घेतले आहेत. त्यांचे नि:शुल्क वितरण प्रशासन, पोलीस, डॉक्टर आणि कोरोना आपत्तीमध्ये सेवाकार्य करणार्‍यामध्ये केले जाते. पालघर आणि डहाणू येथे कोरोना रूग्ण सापडले. या परिसरामध्ये पाच हजार मास्कचे वितरण केले गेले. डहाणू, वसई येथे कोरोना निवारण इस्पितळ तयार केले आहे. येथील आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा विचारही ‘केशवसृष्टी’ने केला आहे. ‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून प्रशासनाला नुकतेच १०० थर्मोमीटर गन, २००० पेस शिल्ड मास्क, २०० पीपीई किट्स, २००० आधुनिक हॅण्ड ग्लोव्हज, ५००० सर्जिकल मास्क देण्यात आले.

 


संतोष गायकवाड त्यांनी एक अनुभव सांगितला. काही दिवसापूंर्वी संतोष कामानिमित्त कुडूसला गेले होते. त्यांना वाटते काही कचरावेचक महिला दिसल्या. संतोष यांच्या मनात आले. आज सगळे जग कोरोनाने त्रस्त आहे. या भगिनींच्या समोरही उदरनिर्वाहाच्या आणि इतरही समस्या निर्माण झाल्या असतीलच. त्यांनाही समस्या होत्याच. संतोष यांनी विचारपूस केल्यावर महिलांनी उदरनिर्वाहाची समस्या आहे. कामधाम बंद पडले आहे हे सांगितले. संतोष यांनी ठरवले की महिलांना ‘केशवसृष्टी’तर्फे आवश्यक जीवनसामुग्रीचे वाटप करूया. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी ते रेशन किट घेऊन त्या कचरा वेचणार्‍या महिलांच्या वस्तीत गेले. वस्ती कसली ती रस्त्याच्या कडेला बांधलेली कच्ची सात आठ घरे. त्यांना रेशन किट वितरण केले. वितरण करताना ते एका झोपडीजवळ गेले. तिथे ती काल भेटलेली महिला होती. तिच्या सोबत आणखी एक महिला होती. संतोष यांनी त्या दोघींना दोन रेशन किट दिले. यावर त्या महिलेने एक रेशन किट परत केले. ती म्हणाली, “साहेब आम्हाला हे इतकं नको. एकच रेशन किट द्या, आम्ही दोघीच आहोत. आम्ही हा एक किट अर्धा अर्धा वाटून घेऊ. हा दुसरा किट कोणा गरजूला द्या हो.असे म्हणून त्या महिलेने एकच किट घेतला आणि दुसरा किट परतही केला. त्या महिलेचे विचार आणि कृती पाहून कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. संतोष गायकवाड यांच्यासह तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले की, इतकी गरिबी असूनही, ही महिला दुसर्‍यांच्या सुखाचा विचार करत होती. खरेच हा अनुभव मोठाच आहे. केशवसृष्टी ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून आज ग्रामीण भागात चाललेले सेवाकार्य शब्दातीत आहे.




> गरीब व गरजू कुटुंबांना ६००० पेक्षा जास्त लोकांना रेशन वितरण केले.

 

> केशवसृष्टी ग्रामविकासाच्या प्रत्येक गावांमध्ये प्रथम उपचार ६० किट उपलब्ध करून दिली.


> २०००० पेक्षा जास्त मास्क अत्यावश्यक सेवांना उपलब्ध करून दिली.


> ५०४ किट अत्यावश्यक सेवांना वितरीत केली.


> ५५७९ इतक्या लोकांची आतापर्यंत जेवण व्यवस्था करून दिली.


> सर्व गावांमध्ये शेतकरी सध्या घरीच आहेत. शेतकर्‍यांनी जून महिन्यामध्ये वृक्षारोपण करण्याकरिता केशवसृष्टी

> ग्राम विकास योजने सांगितल्याप्रमाणे बांबू, आंबा व काजू वृक्षारोपण करण्यासाठी २३५०० एवढे खड्डे खोदून ठेवले आहेत.

- संदेश बोरसे (कृषी विभाग प्रमुख)





जव्हार तालुक्यातील ‘लॉकडाऊन’ मुळे स्थलांतरित ग्रामीण कुटुंबाची अवस्था बिकट झालेली होती, जी कुटुंबे गावाकडे पोहोचली त्यावेळी त्यांच्याकडे धान्य नव्हते अशा वेळी जवळ जवळ २५०० कुटुंबांना धान्याचे किट वाटप केले. त्यामध्ये मजूर, विधवा, गरोदर, अनाथ, लहान मुलेही होती. धान्य वाटल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव, डोळ्यातील अश्रू व लहान मुलांचा आनंद अविस्मरणीय होता. गावातील म्हातारी माणसे तर देवासारखे धावून आलो म्हणून पायासुद्धा पडत होती. असेच एक कुटुंब होते, दोन दिवस उपाशी होते. त्यांना मदत दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहण्यासारखा होता.


- कैलास कुरकुटे, ‘केशवसृष्टी ग्रामविकास’ (विस्तारक जव्हार)

 
 
@@AUTHORINFO_V1@@