‘बॉईस लॉकर रुम...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020   
Total Views |


bois locker room_1 &



शाळेतल्याच काही मुलींचे अश्लील फोटो त्यांनी शेअर केले. त्याखाली सर्रास हिचा तर मी सहज बलात्कार करु शकतो. अजून एक-दोन मुलांनाही सोबत घेऊ. गँगरेपच करु तिचा!!अशा एकावर एक नीच कमेंट्स... मुलींच्या शरीरावर आंबट शेरेबाजीचा पाऊस सुरु होता. हे सगळं अगदी सहजपणे... एखाद्या निर्ढावलेल्या बलात्कारी गुन्हेगारासारखं, त्या मिसुरडंही न फुटलेल्या मुलांचं बोलणं... जणू या ‘बॉईस लॉकर रुम’ नावाच्या इन्स्टाग्रामवरील ‘प्रायव्हेट’ ग्रुप चॅट कोणाच्याच नजरेत येणार नाहीत, या धुंदीत हा सगळा शब्दच्छल सुरु होता. दिल्लीतील चार-पाच शाळांमधील जवळपास १०० मुलांचा या ग्रुपमध्ये समावेश. पण, या ग्रुपवरील हे धक्कादायक चॅट्स लिक झाले. ज्या मुलीचे फोटो या ग्रुपमध्ये शेअर झाले तिने आणि एका शाळेने या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलीसही लगोलग कामाला लागले. ‘लॉकर रुम’वाल्या बॉईसची ‘लॉकअप’मध्ये रवानगी झाली. सोमवारी पोलिसांनी एका १५ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला या प्रकरणी अटक केली. या ‘लॉकर रुम’ ग्रुपमधील इतर ‘बॉईस’चा शोध सुरु असून लवकरच हे बहुतांशी सगळे अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यातही असतील.

पण, या ग्रुपवरील या मुलांचे असले अश्लील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘लॉकडाऊन’मध्ये आईवडील घरी असतानादेखील, मुलांचे स्मार्टफोनमध्ये २४ तास डोकं खुपसून नेमके काय सुरु आहे, याची बहुतांश पालकांना कल्पनाच नाही. म्हणजे ‘लॉकडाऊन’ नव्हता, तेव्हा पालकांच्या अपरोक्ष ही मुलं काय करत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी! त्यातही मोठ्या घरातली मुलं त्यांच्या स्वतंत्र रुममध्ये कडीबंद. पालकही आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये गुंग, अशी स्थिती. त्यामुळे मुलं वार्‍यावर. त्यात अभ्यास नाही की बाहेर खेळायचीही सोय नाही. या रिकामटेकड्या वेळेत हातातल्या स्मार्टफोनचा असाही वापर आपली मुलं करु शकतात, हेच मुळी बहुतांशी पालकांच्या गावी नसतं. ते ‘गेम खेळतायतं’ असं बिचार्‍या पालकांना वाटतं, पण त्यांच्या मुलांच्या डोक्यात हे असले भलतेसलते ‘गेम’ सुरु आहेत, याची त्यांनी पुसटशीही कल्पना नसते. तेव्हा, पालकांनो, स्मार्टफोन मुलांना जरुर द्या, पण तुम्हीही जरा ‘स्मार्ट’ व्हा आणि मुलांच्या ‘ओव्हरस्मार्ट’ फोन वापराकडे जरुर लक्ष असू द्या!
 
वाट चुकायच्या आधीच...


ग्रुप व्हॉट्सअ‍ॅपचा असो इन्स्टाग्रामचा किंवा अन्य कुठल्याही सोशल मीडियावरचा, कुठलेही गैरकृत्य कायद्याच्या नजरेतून लपविणे सहज सोपे नाही. त्यामुळे ग्रुपवर आपण काहीही चर्चा करु, कोणाचेही, कसेही फोटो-व्हिडिओ शेअर करु आणि याची कोणाला कानोकान खबर लागणार नाही, या गैरसमजातून इंटरनेट वापरणार्‍या प्रत्येक व्यक्तीने बाहेर पडायला हवे. कारण, पोलिसांवर टीका करणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे टिकटॉकचे व्हिडिओ बघूनही पोलिसांनी कित्येक तरुणांना या ‘लॉकडाऊन’च्या काळात गल्लीबोळातून शोधून शोधून अटक केल्याची उदाहरणे आपण पाहिलीच. दिल्लीचे अतिउत्साही नाठाळ ‘बॉईस’ही त्याच धुंदीत होते. पण, त्यांचे बिंग फुटले आणि त्यांची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आली.
 

खरं तर बर्‍याच सोशल मीडिया साईट्सवर अशा प्रकारची अश्लील कृत्यं राजरोसपणे गुपचूप सुरु असतात. त्यातली काही प्रकरणं अशी उजेडात आली की त्याचा बोभाटा होता. त्यामुळे पालकांनी मुलांकडे पूर्ण वेळ लक्ष देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, या ‘लॉकडाऊन’च्या काळातही त्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहित करणे अगदी क्रमप्राप्त आहे. ज्या स्मार्टफोनचा या गैरकृत्यांसारखी वापर होतो, तेच स्मार्टफोन आपण साधन म्हणून कसे वापरतो, यावरच हे पूर्णपणे निर्भर करते. म्हणूनच पालकांना ‘संस्कार-नैतिकता’ ही एक पातळी आणि ‘शिक्षण-करिअर-आवडीनिवडी’ या दोन्हींचा योग्य समतोल साधूनच आजच्या मुलांशी वागण्याबोलण्याची गरज आहे. 
 
वयाच्या पंधराव्या वर्षी जर या मुलांच्या अशा क्रूर लैंगिक भावना चाळवल्या असतील, तर ही बाब त्यांच्यासाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि एकूणच समाजासाठी चिंताजनक म्हणावी लागेल. कारण, त्यांना योग्य मार्गदर्शन, जीवनाची दिशा आताच दाखविली नाही, तर हीच बिघडलेली मुलं उद्याचे ‘बलात्कारी’ ठरु शकतात. पालकांशी मनमोकळ्या संवादाबरोबरच, शालेय स्तरावर लैंगिक शिक्षण, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा सुयोग्य वापर, त्याच्या गैरवापराचे दुष्परिणाम, सायबर कायदे यांबाबतही मुलांना आज अवगत करायची नितांत गरज आहे. त्यामुळे ही मुलं वाट चुकून स्वत:चे वाटोळे करण्यापूर्वीच पालकांनी, शाळांनी काळाची गरज ओळखून, त्यांना केवळ दोष न देता, दिशादर्शन केले तरच ही मुलं न बिघडता घडतील, हे निश्चित!

 
 
@@AUTHORINFO_V1@@