नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसल्याने लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अरविंद सक्सेना यांच्या उपस्थितीत परीक्षांच्या तारखेबद्दल सोमवारी बैठक झाली. त्या वेळी ३१ मे रोजी घेतली जाणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.
नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. २० मे रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात वेसबाइटवर जाहीर करण्यात येईल असा निर्णय सांगण्यात आला आहे. नवीन तारीख ठरवल्यानंतर उमेदवारांना कळवण्यात येणार आहे. लॉकडाउनमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सोबतच करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यांकडून एनओसी मिळालेली नाही. प्रत्येक राज्यात परीक्षेसाठी केंद्र ठरलेली असतात. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासना परीक्षेच्या तयारीसंबंधीचा अहवाल युपीएससला दिला जातो. पण लॉकडाउनमुळे राज्यांची देखील तयारी झालेली नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढची तारीख ठरवण्यात येईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे.