हंदवाडा हल्ल्यानंतर भारतीय लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

    04-May-2020
Total Views |


army chief_1  H


नवी दिल्ली 
: हंदवाडा चकमकीत हुतात्मा झालेल्या भारतीय सैन्यदलाचे जवान आणि अधिकारी यांच्या साहसाची भारतीय  लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, कमांडिग ऑफिसर आशुतोष वर्मा यांनी सदर चकमकीचे नेतृत्व केले आणि कमीतकमी हानी होईल, याची काळजी केली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याने सर्वोच्च बलिदान दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.



पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे सुरूच राहिल. सीमापार होत असलेली वाढती घुसखोरी पाहता पाकिस्तान कोरोनाविरोधातील लढ्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तान हा संपूर्ण जगासाठीच धोका आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले. काश्मीरमधील हंदवाडा येथे झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.



ते पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकतर्फे वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करणे, हेच पाकचे धोरण राहिलेले आहे. पाकिस्तान जोपर्यंत हे धोरण सोडत नाही, तोपर्यंत भारतीय सैन्यातर्फे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे सुरुच राहणार आहे, असा इशारा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी दिला आहे. पाकिस्तान केवळ भारतातच नव्हे तर अफगाणिस्तानाही दहशतवाद पसरवित आहे. त्यामुळे दहशतवाद हे पाकिस्तानचे अधिकृत धोरण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.