खरा तो एकचि धर्म...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |
Corona Care_1  


फार पूर्वीपासूनच महामारीच्या आजाराचा फैलाव होऊ लागला की लोकांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. ‘महारोग’, ‘क्षयरोग’ यासारखी नावाची संकल्पनाच आपल्या मनात भयगंड करायला पुरेशी आहे. आरोग्यविश्वात आपण या भयगंडावर दोन गोष्टी प्रामुख्याने पाहतो. त्या म्हणजे, एखादा भयंकर आजार आपल्याला होऊ नये, ही प्रबळ इच्छा. पण, त्याचबरोबर माणसाचं मन असंही विचार करतं की, हे असे भयानक आजार या पृथ्वीतलावर वास करणारच असतील, तर ते आपल्याला नकोत. पण, दुसर्‍या कुणाला तरी होणे पर्याप्त आहे. मग अशावेळी आपल्या मनात कळत-नकळत दुसर्‍यांबद्दल वाईट विचार येतात. आपण दुसर्‍याचे वाईट चिंततो. अर्थात, यात आपण काही दुर्जन असतो असेही नाही. पण, मानवी मन विशेषतः ते जेव्हा सामान्य माणसाचे मन असते, तेव्हा ते पहिला विचार आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेचाच करते. आपण या कोरोना महामारीच्या काळात पाहिलं की, जो तो स्वतःच्या सुरक्षिततेचा प्रथम विचार करताना दिसतो. पण, याचा अर्थ दुसर्‍याच्या रोगग्रस्ततेचे किंवा कोणाची मृत्यूची बातमी ऐकल्यावर आपल्याला दुःख होत नाही असे नाही. दुःख तर होतेच, पण आपण कसे या महामारीतून वाचलो, याचे सुख मात्र आपल्याला अधिक असते. जेव्हा मृत्यूचे तांडवनृत्य डोळ्यांसमोर चालू असतं, तेव्हा ‘मला वाचव रे देवा’ ही आर्त वा आक्रमक प्रार्थना आपल्या संकटकालीन ‘डिफेन्स’चा एक महत्त्वाचा नैसर्गिक हिस्सा आहे.


आपण खरोखरच जीव मुठीत घेऊन जगतो आणि ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ सांभाळतो. कारण, आपण आपल्या जीवाला घाबरतो. सभोवताली दिसणार्‍या भयानक वेदनादायी बातम्यांमुळे आपल्याला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले प्रेत आपण जीवंत असताना दिसायला लागते. गोष्ट नुसती प्रेतावरच थांबत नाही. आपल्याला धाय मोकलून रडणारे, स्वतःला आवरू न शकणारे, धडाधड कोसळणारे आपले गणगोत दिसायला लागतात. वृद्धत्वाने खालावलेले कमजोर आईवडील डोळ्यांसमोर तरळायला लागतात. रोज साडी आणि दागिन्यांची भांडून भांडून मागणी करणारी पत्नी पांढर्‍या कपाळाने समोर उभी राहते. बागडून बागडून घर डोक्यावर घेणारी मुलं तहानभूकेने व्याकूळ झालेली आपण पाहतो. छान छान स्वप्नांनी रंगविलेल्या संसाराच्या डोलार्‍याची राखरांगोळी झालेली दिसू लागते. हे सगळं असं उद्ध्वस्त सोडून जायला मन जाणूनबुजून कसं तयार होणार? मग आपल्याला हे घर असं मोडायला द्यायचं नसतं. भरल्या पानावरून उठून जायचं, बोलायला सोपं आहे. पण, करणं किती अवघड आहे? मुद्दाम कसं काय असं कोणी सगळं वार्‍यावर सोडून जाणार? म्हणून तर ‘मला हा आजार होऊ नये,’ अशी प्रत्येकाची अपरिहार्य इच्छा असते. अशा लोकांना आपण क्रूर, आपमतलबी, स्वार्थी, आप्पलपोटे, दूराग्रही म्हणून संबोधणे योग्य नाही. खूपच कमी लोक असे लबाड व आपमतलबी असूही शकतात. पण वेदना, व्यथा आणि भोग हसत हसत झेलणे हे काही येर्‍यागबाळ्याचे काम नाही.


हा अनुभव अत्यंत जीवघेणा, असाहाय्य असतो. प्रत्यक्ष रोगग्रस्त होण्याचा अनुभव, एकाकी पडण्याचा अनुभव, रागाचा अनुभव, तणावाचा अनुभव या सगळ्या भावना आपल्या सहनशीलतेच्या पलीकडच्या आहेत. म्हणून यातून सुटण्यासाठी, कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी आपल्याला एका जीवंत श्वासाची गरज असते. म्हणून आपल्याला जगायचं असतं. मग कुणीतरी या कोरोनात जाणार असेल, तर मग कुणी दुसरा आपल्या भावनांच्या विश्वात नसलेला आणि मनाच्या संवेदनशील कोपर्‍यातून दूर असणारा, किंबहुना आपल्या अस्तित्वाच्या वलयापलीकडचा कोणीतरी गेला, तर आपल्याला त्याचं सोयरसुतक नसतं. म्हणून आपण कोणीतरी दूर देशातला गेला की, एक दुःखद बातमी ऐकावी लागण्याइतपत दुःखी व्हायला तयार असतो. आपला लचका कोणी तोडावा, याचा विचार आपल्या मनात दूरवर कुठेही येत नाही. आयुष्य शेवटी सामान्य माणसाचे आहे. ‘मी’पणाच्या पलीकडे जाणे खूप कठीण आहे. पण, तरीही साने गुरुजींची कविता मात्र मनाला भुरळ घालतेच.


खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ।
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे ।
समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥




- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@