एक समाज, समरस समाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020   
Total Views |
Devaji Rwat_1  

‘सामाजिक समरसता’ हाच भारतीय परंपरांचा आधार आहे. ‘समरसता’ ही भारतीयत्वाचा आत्मा आहे, तो आत्मा समाजात जपण्यासाठी देवजी रावत काम करतात, त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...


“तो दिवस मला आजही आठवतोय, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघलजी अहमदाबादमध्ये प्रवासात होते. विश्व हिंदू परिषदेचा पदाधिकारी म्हणून त्यांच्या सोबत मी होतो. मी त्यांना भेटायला गेलो. ते म्हणाले, “देवजी, सामाजिक समरसता वस्त्या- वस्त्यासंमध्ये निर्माण होण्यासाठी आपण कार्य करतोय, हे चांगलेच आहे. पण, खरे सांगू का, सामाजिक समरसतेची जाणीवजागृती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आणि अत्यंज असलेल्यांमध्ये करणे गरजेचे आहेच. पण, सामाजिक समरसतेची जागृती प्रबुद्ध आणि संपन्न बांधवांमध्येही करणे तितकेच गरजेचे आहे. मला वाटते, तू यादृष्टीने विचार करावास, काम करावे. तेव्हापासून सामाजिक समरसतेचे कार्य या आयामातूनही करायचे, असे मी ठरवले.” विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय मंत्री आणि सामाजिक समरसतेचे केंद्रीय संयोजक देवजीभाई रावत सांगत होते. अहमदाबाद येथे निवासाला असलेले देवजीभाई आज राष्ट्रीय पातळीवर समरसतेचे कार्य करत आहेत. ‘समरसता सेतू’ नावाचे मासिकही ते प्रकाशित करतात. समाजातील विषमता दूर व्हावी, ‘एक गाव, एक मंदिर, एक पाणवठा, एक स्मशानभूमी’ ही समरसवृत्ती देशातील प्रत्येक गावात निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे प्रबोधनकार्य, समाजकार्य अखंड सुरू असते. हे करत असताना नरेंद्र मोदी, अमित शाह, प्रवीण तोगडिया वगैरेंशी त्यांचा संपर्क आणि संवाद असायचाच. एकदा समन्वय बैठकीत अमित शाहांनी संघटन विषयावरचे ‘मायक्रो प्लानिंग’ मांडले. देवजी म्हणतात, “तशी ‘मायक्रो प्लानिंग’ प्रत्येक सामाजिक कार्यातही करण्याची सवय लागली.”


हिंदू मागासवर्गीयांना जे आरक्षण दिले आहे, त्या आरक्षणामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म स्वीकारलेल्या मागासवर्गीयांनाही आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसच्या काळात घालण्यात आला. मात्र, यावर रा. स्व. संघ परिवारातील आणि संघाच्या विचारधारेशी जोडलेल्या लोकांनी ‘आरक्षण बचाओ मंच’ची स्थापना केली. त्यावेळी या मंचाचे राष्ट्रीय संयोजक होते सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सहसंयोजक होते देवजी रावत. ‘आरक्षण बचाओ मंच’च्या माध्यमातून देवजीभाईंनी मग हिंदू मागासवर्गीय समाजाचे आरक्षण, सामाजिक समरसता याबाबत साहित्यिक, विचारवंत, विविध स्तरावर सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते यांच्याशी यशस्वी संवाद संपर्क सुरू केला. त्यातले कित्येक साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते पुढे ‘सामाजिक समरसता मंच’शी जोडलेही गेले. २०१७ साली देवजीभाई यांनी ‘धार्मिक परंपरा आणि सामाजिक समरसता’ या विषयाचा राष्ट्रीय सेमिनार दिल्लीला आयोजित केला. यात देशातील २२ विद्यापीठातील ८१ संशोधकांनी प्रबंध सादर केले. त्यावरील ६०० पानांचे एक पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. आज समाजात देवजींनी जातीय संघर्षाच्या विरोधात कार्य करायला सुरुवात केली.


अहमदाबादच्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये बेहरामपूरमध्ये जेवाभाई आणि पुंजीबेन यांना सात अपत्ये. त्यापैकी एक देवजी. जेवाभाई आणि पुंजीबेन दोघेही मजूर. आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे चटके रावत कुटुंबीयांना नवीन नव्हते. गरिबीमुळे रावत कुटुंब कधीही पोटभर जेवू शकले नाही. मात्र, जेवाभाई आणि पुंजीबेन अत्यंत धार्मिक. त्यांच्याच समाजाचे साधुसंत आले की ते अगत्याने त्यांना आपल्या घरी बोलवत. त्यांची सेवा करत. लहान देवजीही गावातल्या मंदिराच्या आवारातल्या आयाबायांना रामायण वाचून दाखवत. सुट्टी पडली की मोलमजुरी करत. त्या पैशातून पुढच्या वर्षीची वह्या पुस्तके घेत. आठवीला असताना मित्राच्या सांगण्यावरून ते रा. स्व. संघाच्या शाखेत गेले. तेथील कार्यवाह ईश्वरभाई होते. ते दररोज सकाळी देवजींना सकाळी उठवायचे आणि आपल्या सायकलवर बसवून शाखेत न्यायचे. तेथील प्रेरक विचारांनी देवजी यांच्या विचारांची दिशा बदलली. दिवस जात होते, काबाडकष्ट करत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तेही मजुरी करू लागले. त्यांचा विवाह पार्वती यांच्याशी झाला. याकाळात ईश्वरप्रसाद नावाच्या मित्रासोबत त्यांचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात जाणे-येणे व्हायचे. तिथे एके दिवशी प्रवीण तोगडिया आणि अशोक सिंघल देवजींना म्हणाले, “तुम्ही धार्मिक आहात. समाजशील आहात. विश्व हिंदू परिषदेसाठी काम करा.” गरीब कुटुंब, पत्नी, दोन मुले. मग पूर्णवेळ काम कसे करणार? इच्छा होती. पण कसे जमणार? त्यावेळी पार्वती यांनी हिंमत दिली. घरातच छोटेसे दुकान टाकले. मार्ग निघाला. दोन वर्षे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात ते काम करू लागले. ते काम म्हणजे दोन वर्षांनंतर त्यांना अहमबदाबाद येथील सेवावस्तीमध्ये बालसंस्कार वर्ग सुरू करण्याची जबाबदारी मिळाली.


गरिबी, अज्ञान, निरक्षरता हेसुद्धा सामाजिक समरसतेचे शत्रू आहेत. त्यासाठी वस्तीपातळीवर नियोजन करायला हवे, या विचारांनी त्यांनी अहमदाबादच्या ३२ सेवावस्तींचे सर्वेक्षण अभ्यास केला. साधारण २५ वर्षांपूर्वीचा तो काळ होता. सामाजिक आर्थिकदृष्ट्या अत्यंज असलेले देवजी समाजाच्या उत्थानासाठी काम करू लागले. आज देवजी राष्ट्रीय स्तरावर सामाजिक समरसतेसाठी कार्यरत आहेत. ‘एक समाज, समरस समाज’ हा त्यांच्या कार्याचा आधार आहे.

@@AUTHORINFO_V1@@