‘आर्य’ शब्दाचे वाङ्मयीन संदर्भ : एक सिंहावलोकन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020
Total Views |

arya_1  H x W:
 
 
प्राचीन भारतीय वाङ्मयात आर्य शब्द एखाद्या वंशाचा वाचक नव्हे, तर सद्गुणांचा वाचक म्हणूनच सगळीकडे वापरला गेल्याचे अनेक संदर्भ आतापर्यंतच्या सलग काही लेखांत आपण पाहिले. इतिहास संशोधकांच्या समाधानासाठी म्हणून आपण काही निवडक भौतिक पुरावे सुद्धा मागच्याच लेखात पाहिले. काय सांगतात हे सगळे संदर्भ आणि पुरावे?
 
 
प्राचीन संस्कृत कोशवाङ्मयात ‘आर्य’ शब्दाचे विविध अर्थ आपण पाहिले. ‘थोर’, ‘उदात्त’, ‘योग्य / लायक’, ‘चारित्र्यवान’, ‘श्रेष्ठ’ (noble, worthy, able) अशा अर्थाचा हा शब्द असल्यामुळे आपण याला ‘गुणवाचक’ शब्द म्हणत आहोत. याच्या ऐवजी अनेक पाश्चात्त्य विद्वानांनी याला ‘वंशवाचक’ शब्द ठरवून टाकल्यामुळे एक मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे. शब्दार्थाची ही तोडमोड अतिशय कावेबाजपणे आणि जाणूनबुजून केलेली असल्याचे आपण मागच्या एका लेखात पुराव्यानिशी पाहिले. यात ‘आपटे संस्कृत-इंग्लिश शब्दकोशा’त सन १८९० मधल्या मूळ छापील आवृत्तीत दिलेला आर्य शब्दाचा ‘worthy, respectable, honourable, noble, high’ असा गुणात्मक अर्थ बदलून त्याच शब्दकोशाच्या वेब-आवृत्तीत सध्याचा ‘सुधारित’ अर्थ म्हणून ‘an inhabitant of आर्यावर्त, of the race migrated into India in Vedic times’, असा वंशात्मक अर्थ बेमालूमपणे घुसडून देणारे हेच पाश्चात्त्य आहेत. ही वेब आवृत्ती अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठ व शिकागो विद्यापीठ यांनी आणि ‘Dharam Hinduja Indic Research Center’ या संशोधन संस्थेने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका) व केंब्रीज विद्यापीठ (युनायटेड किंग्डम) यांच्या आर्थिक पाठबळावर चालवलेली आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीने भारतातल्या सामाजिक आणि वैचारिक जगतात सन १८९० ते १९७०-८० या उण्यापुऱ्या शतकभराच्या कालखंडात पद्धतशीरपणे पुरेसे विष कालवले गेल्याचे लक्षात येते.
 
वैदिक साहित्यात विविध देवतांची वर्णने आहेत. तशाच वर्णनाचे त्यांचे पूजक आर्य सुद्धा असणार, असे गृहीतक मनात धरून त्यावरून ती वर्णने ‘आर्य’ नावाच्या वंशाची आहेत, असे ठासून सांगितल्यावर साहित्याची पूर्ण दिशाच बदलून जाते. त्यांच्याशी ज्यांचे वैर आहे, ते वैदिक साहित्यातले दुसरे लोक म्हणजे ‘दस्यु / दास’. तर मग ते सुद्धा आर्यांसारखेच अजून दुसऱ्या एखाद्या वंशाचे असणार, हे दुसरे एक खोडसाळ गृहीतक. यातून या युरोपीय विद्वानांना ‘आर्य विरुद्ध दस्यु’ असा वांशिक संघर्ष रंगवून दाखवता आला. याविषयी मागच्या एका लेखात आपण पाहिले, की हा वस्तुत: ‘सद्गुणी विरुद्ध दुर्गुणी’, ‘सज्जन विरुद्ध दुर्जन’, ‘धार्मिक विरुद्ध अधर्मी’, ‘सरळमार्गी विरुद्ध त्रासदायक’ अशा दोन विरुद्ध गुण असलेल्या लोकांमधला अतिशय स्वाभाविक झगडा आहे. परंतु या युरोपीय संशोधकांनी अतिशय चतुरपणे त्याला वांशिक संघर्षाचे स्वरूप दिलेले दिसते. अशा या गृहीतकांमुळे संपूर्ण वैदिक साहित्याची दिशाच बदलून टाकण्यात आली आहे. याच खोडसाळपणाच्या भावनेतून प्रेरित होऊन वेदांचे जे अनुवाद पाश्चात्त्य विद्वानांनी युरोपीय भाषांमध्ये केले, ते वापरून आपले संशोधन करणारे भारतीय अभ्यासक सुद्धा यामुळेच भरकटलेले दिसतात. ‘भारताबाहेरून मध्य-आशिया वगैरे ठिकाणांहून इराणमार्गे भटकत आलेले परके, आगंतुक, उपरे लोक’ म्हणजे आर्य, तर ‘त्याआधी भारतात राहणारे’ ते दस्यू, द्रविड किंवा मूलनिवासी लोक, असे समाजात दुफळी माजवणारे संशोधन यातूनच जन्म घेते. याद्वारे काही नतद्रष्ट विचारवंत ‘आर्य – दस्यु’ तंट्यांना तथाकथित ‘उच्चवर्णीय विरुद्ध शूद्र’ किंवा ‘सवर्ण विरुद्ध दलित’ असा जातीय रंग देतात. तर अजून काही फुटीरतावादी आंदोलक ‘द्रविड’ म्हणजे दक्षिण भारतीय, तर ‘आर्य’ म्हणजे उत्तर भारतीय लोक असे भारताचे सरळ आडवे दोन तुकडेच करून टाकतात.
 
वेदांच्या नंतरच्या काळात निर्माण झालेले जे लौकिक साहित्य आहे, त्यात रामायण – महाभारत ही आर्ष महाकाव्ये प्रामुख्याने येतात. त्यातली दोन प्रमुख पात्रे राम आणि रावण. त्यांच्यातला संघर्ष हा प्रामुख्याने ‘सज्जन विरुद्ध दुर्जन’ किंवा ‘धार्मिक विरुद्ध अधर्मी’ अशा स्वरूपाचा आहे, हे ही कथा मुळातून संपूर्णपणे वाचणारा कुणीही सांगेल. पण त्यातूनही राम उत्तर भारतातला म्हणजेच आर्य, तर मग रावण दक्षिणेकडचा द्रविड अर्थात मूलनिवासी - असा विचार काही समाजकंटक मांडतात. यातूनच मग ‘जय रावण’ सारख्या घोषणा देऊन समाजात फोडाफोडीचे विष पेरले जाते. दक्षिण भारतातले (किष्किंधा – पूर्व कर्नाटक) असणारे वानर सुद्धा जर एकमेकांना आर्य म्हणतात, तर मग फक्त उत्तर भारतीयच तेवढे आर्य कसे, हा प्रश्न या समाजकंटकांना अजिबात ऐकूच येत नाही. कारण नेमके त्याच वेळी त्यांनी शहामृगाप्रमाणे वाळूत आपले डोके खुपसलेले असते. खुद्द रावणाचेही वर्णन राक्षस कुळातले अनेक जण आणि त्याच्या बायका सुद्धा ‘आर्य’ किंवा ‘आर्यपुत्र’ म्हणून करतात. त्यांच्या दृष्टीने रावण हा थोरच! त्यामुळे त्यांना रावणाचा उल्लेख ‘आर्य’ म्हणून करताना काहीच संकोच वाटत नाही. पण हे धडधडीतपणे समोर दिसत असतानाही रावणाला मूलनिवासी मानून ‘जय रावण’ म्हणत आंदोलने पेटवणाऱ्या समाजकंटकांचा मेंदू मात्र वाळूत खुपसलेल्या शहामृगाच्या त्या डोक्याइतकाही नाही, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात एव्हाना आलेच असेल.
या व्यतिरिक्त सुद्धा ‘आर्य’ हा शब्द संपूर्ण भारतीय समाजाने वर दिल्याप्रमाणेच गुणात्मक अर्थाने स्वीकारला होता, हे इतरही संस्कृत साहित्यात सर्रास दिसते. इतकेच नव्हे, तर तत्कालीन प्राकृत भाषांत निर्माण झालेल्या साहित्यातही दिसते. अगदी सामान्य प्रजाजन सुद्धा हा शब्द उदात्त किंवा थोर व्यक्तिरेखांसाठी वापरताना दिसतात. ‘गाहा सत्तसई’ या प्राकृत ग्रंथात ग्रामीण जनजीवनाचे जे दर्शन घडते, त्यातही ‘आर्या’ हे विशेषण सामान्य ग्रामीण स्त्रियांना सुद्धा आदराने दिले गेलेले आपण पाहिले. प्राकृत साहित्यात बौद्ध वाङ्मय आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यात दु:खनिवारणाच्या साधनेतली चार श्रेष्ठ सत्ये सांगताना भगवान बुद्ध ‘आर्यसत्य’ हा शब्द आवर्जून वापरतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गाला ते स्वत: ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ असे नि:संकोचपणे म्हणतात. त्यांच्या अनुयायांपैकी अनेक भिक्खू, स्थविर, आचार्य स्वत:ला ‘आर्य’ म्हणवून घेतात. उत्तरकालीन बौद्ध साहित्याचे अनेक कर्तेही ‘आर्य’ हे विशेषण आपल्या नावामागे लावतात. नावातच ‘आर्य’ असणारे ग्रंथही निर्माण होतात. हे सगळे कशाचे द्योतक आहे? सर विल्यम जोन्स (William Jones), मोर्टिमर व्हीलर (Mortimer Wheeler), मॅक्स म्यूलर (Max Müller) वगैरे विद्वान मंडळींनी अतिशय परिश्रमपूर्वक हा शब्दार्थाच्या छेडछाडीचा उपक्रम वैचारिक क्षेत्रात विविध मार्गांनी राबवला आणि सामाजिक दुफळीच्या या विषवल्लीचे बीजारोपण केले. त्यांचे शिष्यत्व मोठ्या अभिमानाने पत्करून या क्षेत्रात संशोधन केलेल्या अनेक भारतीय विद्वानांनी त्याला आपल्या बुद्धिमत्तेने खतपाणीच घातले – आजही अनेक जण घालत आहेत. अशांना मागच्या लेखात दाखवल्याप्रमाणे अगदी ‘भौतिक पुरावे’ सुद्धा कितीही दिले, तरी हे लोक त्याच्याकडे सोयीस्करपणे डोळेझाकच करतात. उपजीविकेशी निष्ठा राखावी तर अशी !


तर वाचकहो, ‘आर्य’ शब्दांचे वाङ्मयीन संदर्भ आतापर्यंत आपण पाहिले. त्याचा मूळचा गुणात्मक अर्थ बदलून वंशात्मक कसा केला गेला, त्याचाही एक धावता आढावा आपण घेतला. वाङ्मयीन संदर्भांच्या या चर्चेला आता विराम देऊया आणि पुढच्या लेखापासून या ‘आर्यप्रश्ना’च्या अजून एका पैलूविषयी विचार सुरू करूया.
 
-वासुदेव बिडवे
 
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@