धक्कादायक ! कोरोना रुग्णांच्या घरातील कचरा सोसायट्यांमध्ये पडून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020
Total Views |
Thane News _1  





ठाणे : `कोरोना' रुग्णांच्या घरातील कचरा दररोज संकलित करण्याकडे महापालिका यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, रुग्णांचे घर व सोसायटीच्या आवारात कचऱ्याच्या पिशव्यांचे ढीग लागले आहेत. आठ-आठ दिवस महापालिकेची गाडी फिरकत नसून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे, संपूर्ण सोसायटीत `कोरोना'चा संसर्ग होण्याची भीती आहे. या प्रकाराबद्दल भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 


कोरोनाचा रुग्ण आढळलेले घर महापालिकेकडून सील केले जाते. त्यानंतर रुग्णाने घरात वापरलेले मास्क, ग्लोव्हज आदी वैद्यकिय साहित्यासह ओला व सुका कचरा सरसकट फेकून न देता वेगळा ठेवण्याचे महापालिकेने निर्देश दिले आहेत. तो दररोज संकलित करून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, घोडबंदर रोडबरोबरच ठाणे शहरातील काही सोसायट्यांमध्ये आठ दिवसांपासून `कोरोना' रुग्णांच्या घरातच कचरा पडून आहे. काही ठिकाणी सोसायट्यांच्या आवारात कचऱ्याच्या पिशव्यांचे ढीग ठेवण्यात आले. या कचऱ्यात कोरोना रुग्णाने वापरलेले मास्क, ग्लोव्हज आदींचा समावेश असल्यामुळे संपूर्ण सोसायटी कोरोनाग्रस्त होण्याची भीती आहे,


याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे लक्ष वेधले. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनाही पत्र पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे. कोरोना रुग्णाच्या घरातील कचरा दररोज उचलण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्यात आल्यानंतर, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आज ड्रायव्हर नाही, तर उद्या गाडी पाठवितो, अशी कारणे सांगून टाळाटाळ केली जाते, हा प्रकार संतापजनक आहे. ठाणे शहरात `कोरोना' नियंत्रणात येत नसताना, अशा बेफिकीरीमुळे आणखी फैलाव होईल, अशी भीती मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली आहे.


घातक कचरा उचलण्यासाठी खासगी `दुकानदारी' सुरू


`कोरोना' रुग्णाचा कचरा उचलण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने खाजगी `दुकानदारी' सुरू झाली आहे. काही सोसायट्यांमध्ये रुग्ण तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडूनच कचरा उचलण्यासाठी खाजगी व्यक्तींचे क्रमांक दिले जात असल्याचा प्रकार घडला आहे. या व्यक्तींकडून कचरा उचलण्यासाठी पैसे आकारले जाणार असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले जाते, असा आरोप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला. खाजगी चाचणी, खाजगी रुग्णालय आणि आता कचरा उचलण्यासाठीही खाजगी व्यक्तींना पैसे मोजायचे, तर राज्य सरकार किंवा महापालिकेने केवळ निधी जमवायचा का, असा संतप्त सवाल डुंबरे यांनी विचारला आहे.


@@AUTHORINFO_V1@@