खाया पिया कुछ नही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2020   
Total Views |


mahavikas aaghadi_1 



‘पीएम केअर फंड’मध्ये लोक किती पैसे देतायत. बाई बाई... लोक पागल झालेत. त्या मोदींनी सांगितले म्हणून थाळ्या काय वाजवल्या, दिवे काय लावले, मला त्याचे काही वाटले नाही. मी आणि मम्मीने बिल्कुल दिवे लावले नाहीत. कारण, माझ्या भावाने काय कमी दिवे लावले होते. पण त्याचे कुणा कुणाला कौतुक नाही. माझ्या भावाने काय कमी केले होते? प्रत्यक्ष तत्कालीन पंतप्रधानांच्या हातातले कागद घेऊन हे असे टराटरा फाडले होते, पण नाही त्याच्या धडाडीचे कौतुक ते मेले नाहीच. त्याचे सोडा माझेही नाही. मी आजीसारखी दिसते. दिसते ना? पण माझेही कुणी कुणी ऐकत नाही. खरंच, लोक पागल झालेत. डायरेक्ट त्या ‘पीएम केअर फंड’ला पैसे देऊ लागलेत. लोक विसरले की देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क आमच्या राजघराण्याचा आहे. त्यानंतर आम्ही प्रत्येक राज्यात मांडलिक केलेल्या मांडलिकांचा आहे. महाराष्ट्रात तर काय कहरच आहे. जो उठतो तो पंतप्रधान मोदींच्या फंडात पैसे टाकणार म्हणत पार १०० पासून कोट्यवधी रूपये टाकत आहे. का? का? असे का? राज्य सरकार म्हणून काही विश्वासबिश्वास आहे की नाही. महाराष्ट्रात आदर्श घोटाळे’, ‘सिंचन घोटाळे’, ‘महाराष्ट्रसदन घोटाळेआणि काय काय घोटाळे असणारे लोक तिथे आमच्या सोबतीला आहेत. पण म्हणून काय झाले, ते सगळे जण पाठीमागे मंत्रीबिंत्री आहेत. पण राज्याच्या समोर तर मुख्य म्हणून आम्ही महाराष्ट्राचा शेर ठेवला आहे ना? मी मम्मी, दादा, बारामतीचे ते ज्येष्ठ काका आम्हाला सगळ्यांना आशा होती की, निदान शेरकडे बघून तरी महाराष्ट्रातील लोक कोरोनाच्या नावाने पैसे देतील. पण कसले काय? लोक तर मोदींच्या फंडात पैसे देतात. आता त्या ‘पीएम केअर फंड’ला ‘मोदींचा फंड’च म्हणायला हवे ना? कारण, ‘मैं खाता नही और किसी को खाने नहीं दुंगाअसे म्हणत मोदी कुणालाच काहीच वैयक्तिक हातखर्चाला देणार नाहीत. मोदींना पैसे नाही लागत. पण आमच्या इकडे तर सगळ्यांचे परिवार आहेत ना? महाराष्ट्रात बघा, आमच्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला परिवार आहे. आम्ही काय करायचे? कुठे जायचे? कामच करत राहायचे का? आता असे वाटते की महाराष्ट्रातली आमची सत्ता म्हणजे ‘खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आणाच का?’ त्या पीएम फंडचे ऑडिट झालेच पाहिजे...
 

अपना काम बनता...
 
 
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रात निर्माण झालेला राजकीय अनिश्चिततेचा धुरळा खाली बसेल. महाराष्ट्राची पुण्याई मोठी म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला. आता हे कोण म्हणाले? सांगायलाच हवे का? अर्थात महाराष्ट्रातल्या कलियुगातले दिव्यदृष्टीकारांचे हे दिव्य म्हणणे आहे. त्यांचेही म्हणणे खरेच आहे म्हणा. कारण, त्यांनी यासाठीच केला होता अट्टाहास... कोरोना काय येईल-जाईल, लोकांचे काय होईल ते होईल. पण सत्तेच्या चाव्या हातात असल्या पाहिजेत. आता त्या चाव्या राखण्यासाठी काय काय करावे लागते याचा हिशोब ठेवायची अजिबात गरज नाही. नव्हे तसे राजकारणात करायचेच नसते. खलबत केली, बारामती, दिल्ली व्हाया लीलावती, तेव्हा कुठे चक्र भिरभिरले आणि एकदा कुठे सरकार बसवले. बसवलेच. रोखठोक बोलायला हवे. ते भारीच मौजेचे दिवस होते. सगळ्या चॅनेलवर तेच होते. पण गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी... जाऊ दे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आपत्ती नियोजन व्यवस्थित व्हावे, म्हणून सगळ्याच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण देशाचे आणि लोकांचे काय घेऊन बसलात. अजेंडा एकच आहे कसेही सत्ताधीश राहायचे. या निवडणुका व्हाव्यात ही तो... कुणाची बरं इच्छा? काकांची, मॅडमची, साहेबांची इच्छा. शेवटी निवडणुका होणार म्हणजे होणार. त्यासाठी आता दिल्लीश्वरांना विनंती करावी लागली. पण ‘चलता है. हेच तर राजकाराण है।’ पाय धरा, पाय ओढा. दिल्ली तख्त, औरंग्या पाप्या, अफजूल खान, कोथळा, भाला, बाण वगैर वगैरे शब्द कधी वापरायचे कधी नाहीत त्याचेही एक तंत्र असते. तर असो... मुद्दा हा की, आता महाराष्ट्राचे कोरोनामुळे काय होईल ते होवो, पण राज्य सत्ता निश्चित राहिली पाहिजे. महाराष्ट्रात कोरोनाने जनतेला त्राहीमाम करून सोडले. कुणाचा कुणावर विश्वासच राहिला नाही. (राज्य सरकारवरचा विश्वास नाही म्हणत, कारण तिघांनी जनमताचा अनादर करून सत्ता स्थापन केली तेव्हाही जनतेला यांच्याबद्दल विश्वास नव्हताच.) पण आता विधान परिषदेच्या निवडणुका होणार.. सत्ताधीश राहणार.. शेवटी काय? ‘अपना काम बनता... में जाये जनता...’

 
 
@@AUTHORINFO_V1@@