महापालिकेकडून मास्क, सॅनिटायझर, पीपीई खरेदीचे काम डॉक्टरांच्याच माथी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2020
Total Views |
Coronaa_1  H x

भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा आरोप


ठाणे : `कोरोना'चे रुग्ण वाढत असतानाच, महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या रुग्णांची वेगाने तपासणी आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणचे डॉक्टर सध्या आरोग्य केंद्रासाठी आवश्यक मास्क, सॅनिटायझर आणि पीपीई खरेदीचे काम करीत आहेत. महापालिकेने थेट वस्तू देण्याऐवजी डॉक्टरांनाच खरेदीच्या कामाला जुंपले, या प्रकाराकडे भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले असून, आरोग्य केंद्राना थेट वस्तू देण्याची मागणी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.


`कोरोना'च्या काळात आवश्यक वैद्यकिय साहित्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खरेदी करण्यात आली. मात्र, ती अवाच्या सवा दराने झाल्याची चर्चा झाल्यानंतर आयुक्त विजय सिंघल यांनी खरेदीची बिले देण्यास नकार दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रांना `कोरोना' रुग्णांपासून बचावासाठीचे साहित्य दिलेले नाही. सुरुवातीला आरोग्य केंद्रात मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज आणि पीपीई किट आले. मात्र, ते संपुष्टात आल्यानंतर डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांपुढे साहित्याचा तुटवडा आहे, असे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सांगितले.


यासंदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर, त्यांना आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या एक लाख रुपयांमधून खरेदी करण्याचे सुचविण्यात आले. मात्र, त्यासाठी तीन कोटेशनची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. बहुसंख्य डॉक्टरांना खरेदीची नियमावली माहिती नाही. मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज आणि पीपीई खरेदीसाठी डॉक्टर मेडिकल दुकानदारांशी संपर्क साधत आहेत. त्याचबरोबर साधारणत: १५ ते २० दिवसाने पैसे मिळणार असल्याचे सांगून, तीन कोटेशन मागत आहेत. बहुसंख्य दुकानदारांनी उधारीवर साहित्य देण्यास नकार दिल्याने, पुन्हा नव्या दुकानदाराचा डॉक्टरांना शोध घ्यावा लागतो. बाजारभावापेक्षा जास्त रक्कमेचे कोटेशन मंजूर केल्यास, `कोरोना'नंतर चौकशीत अडकण्याची डॉक्टरांना भीती आहे. त्यामुळे ते खबरदारीने खरेदीप्रक्रिया करीत आहेत. त्यात त्यांचा नाहक वेळ वाया जातो, याकडे मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले.


या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांचा वेळ वाया जात असल्यामुळे रुग्णांची तपासणी विलंबाने होत आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आरोग्य केंद्रांमध्ये थेट वैद्यकिय साहित्य पाठवावे, अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@