द्रष्टे सावरकर

    27-May-2020
Total Views |
Akshay jog_1  H

कालजयी सावरकर - विशेष संपादकीय

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे द्रष्टे महापुरुष. असामान्य व्यक्ती काळाच्या दोन पावलं पुढे असतात; पण सावरकरांसारखे महापुरुष काळाच्या शंभर पावलं पुढे असतात. सावरकरांनी वर्तवलेले भविष्य काही दशकांनी सत्यात उतरल्यावर सामान्य व्यक्तीला त्याची प्रचिती येते. इतिहास आणि वर्तमानाचे तटस्थ, चिकित्सक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून केलेले अध्ययन, सूक्ष्म आकलनशक्ती नि त्याचे वास्तववादी भूमिकेतून केलेले विश्लेषण, यामुळे सावरकर, ‘द्रष्टे’ ठरतात. ‘सावरकरविचार पचणे अशक्य’, ‘सावरकरवाद अंमलात आणणे कठीण’ अशी विविध कारणे काहीजण देतात; पण प्रत्यक्षात नकळतपणे सावरकरवादच आचरणात आणत असतात.

सावरकरांनी लोकरंजनासाठी किंवा तुष्टीकरणासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी विचार मांडले. त्यामुळे सावरकरांवर अनेकांनी ते हयात असतानाही टीका केली. अज्ञान, गैरसमज, द्वेष, विरोधाला विरोध, राजकीय गरज अशा विविध कारणांमुळे सावरकरांवर टीका होत आली आहे. पण, गेल्या काही वर्षांत त्याच्यात वाढ झाल्याचे दिसून येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘हिंदुत्व.’


‘हिंदुत्व’ देशाच्या केंद्रस्थानी आल्यापासून सावरकरांवरील टीकेत वाढ झाली आहे. हिंदुत्व विचारांना पराभूत करण्यासाठी ‘हिंदुत्व’ ज्या पायावार उभे आहे, त्या हिंदुत्वाचे प्रणेते आणि हिंदुत्व चळवळीचा वैचारिक पाया मानल्या जाणाऱ्या सावरकरांवर सतत आक्षेप घेतले जातात. आक्षेपांना कितीही उत्तरे दिली तरी विरोधकांचे समाधान होणार नाही, याची कल्पना आहे. पण, या आरोपांमुळे प्रामाणिक लोकांच्या, अभ्यासकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतात. सावरकरांसारख्या महापुरुषाविषयी असा संभ्रम निर्माण होणे हानिकारक आहे. कारण, देशातील नागरिकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये ‘महापुरुष’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे सावरकरांविषयीचे संभ्रम दूर करण्यासाठी या विशेषांकाची योजना केली आहे.


नवीन लेखकांनी सावरकर विचारांचे वाचन करून त्यासंदर्भातील आपले विचार लेखरुपात मांडावेत, जेणेकरून त्यानिमित्ताने सावरकरांच्या राष्ट्रहितार्थ विचारांचा आणि कार्याचा प्रचार व प्रसार होऊन अल्पदेशसेवेचे भाग्य लाभेल. या नवलेखकांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देऊन सावरकर विचार व कार्याचा अभ्यास, चिंतन, मनन आणि लेखन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’ने गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेल्या उपक्रमाचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे.


सावरकरांवर घेतले जाणारे आक्षेप आणि त्या आक्षेपातील सत्य किंवा वास्तव वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या विशेषांकातून करण्यात आला आहे. हे सत्य समोर ठेवताना आपल्याला सावरकरांचा नवीन पैलूही दिसून येतो आणि त्यांच्या विचारांची स्पष्टता, समतोलपणाही दिसून येतो. सावरकरांचे विचार व कार्य हे आजही राष्ट्राला व आपल्याला वैयक्तिक जीवनातही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे असे हे मौलिक विचार जनसामान्यांपर्यंत व त्यातही विशेष करून युवा वर्गापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, आजची युवापिढी उद्याच्या भारताचे भविष्य आहे. पण, सावरकर-विचार युवावर्गापर्यंत पोहोचायचे असतील, तर युवावर्गाला समजेल अशा साध्या, सोप्या, सुटसुटीत व युवावर्गाच्या भाषेतच ते समजावून सांगायला हवेत. म्हणून मुख्यत्वे युवा लेखक-लेखिकांची या विशेषांकासाठी निवड करण्यात आली आहे.


‘कालजयी सावरकर २०१८’ आणि ‘कालजयी सावरकर २०१९’ या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मागील दोन वर्षांतील विशेषांकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, असाच प्रतिसाद यावर्षीच्या ‘कालजयी सावरकर २०२० - सावरकर वाद-प्रतिवाद’ विशेषांकाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. या उत्तम उपक्रमासाठी आणि मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, मुख्य उपसंपादक (फीचर्स) विजय कुलकर्णी व सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार.

- अक्षय जोग
अतिथी संपादक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.