सावरकरांचे हिंदुत्व आणि वाद-प्रतिवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Swantraveer-Savarkar _1&n






संघर्षाच्या इतिहासाबद्दल सर्वांना सारखीच भावना आहे. त्यामुळे एक राष्ट्र, एक जाती (जन्मजात ‘जात’ या अर्थाने नव्हे) आणि समान संस्कृती या तिन्ही लक्षणांनी युक्त ते ‘हिंदुत्व’ असे सावरकरांनी मानले.




स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी हिंदू आणि हिंदुत्वावर बरेच तत्त्वचिंतन केले आहे हे दिसते. मात्र, पहिला प्रश्न हाच उत्पन्न होतो की, हिंदुत्वाला शब्दबद्ध करण्याची गरजच का पडावी? सावरकरांच्या आयुष्याचे आपण तीन कालखंड करू शकतो. एक - मॅझिनीचे चरित्र लिहिणारे, स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी मार्ग अवलंबत बोटीतून उडी मारणारे सळसळत्या रक्ताचे स्वातंत्र्यवीर सावरकर, दोन - अंदमानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही चिंतन करणारे आणि महान काव्ये लिहिणारे साहित्यिक सावरकर, तर तीन - सुटका झाल्यानंतर रत्नागिरीच्या वास्तव्यात समाजातील विषमता दूर करत समाजसुधारणा करणारे समाजसंघटक सावरकर आणि या तिसर्‍या कार्यासाठीच हिंदुत्वाची व्याख्या करणे अतिशय गरजेचे होते.



केवळ हिंदुस्थानचा रहिवासी हेच केवळ हिंदुत्वाचे लक्षण नाही, तर संस्कृतीने आणि इतिहासाने एक होऊन पूजास्थान म्हणून देशाला गणू लागण्याचे लक्षण म्हणजे हिंदुत्व. मात्र, राष्ट्राला संस्कृतीचा म्हणजे विचारांचा, आचारांचा, साहित्य आणि कलेचा, संघर्षाचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे. सण, समारंभ, यात्रा, उत्सव, साहित्य, कलाकृती, चालीरीती, प्रथा, परंपरा, विश्वास हा सर्वांचा समान सांस्कृतिक इतिहास आहे. तो सर्वांना सारखाच अभिमानास्पद आहे आणि स्फूर्तीदायक आहे. संघर्षाच्या इतिहासाबद्दल सर्वांना सारखीच भावना आहे. त्यामुळे एक राष्ट्र, एक जाती (जन्मजात ‘जात’ या अर्थाने नव्हे) आणि समान संस्कृती या तिन्ही लक्षणांनी युक्त ते ‘हिंदुत्व’ असे सावरकरांनी मानले.



‘पितृभू’ म्हणजे केवळ वडिलांची भूमी नव्हे. ‘पितृभू’ म्हणजे पितर किंवा वाड-वडिलांची भूमी; यात आई-वडील, आजी-आजोबा या सगळ्या पितरांचा समावेश होतो. म्हणून मातृभूऐवजी ‘पितृभू’ शब्द योजिला आहे. भारताबाहेर स्थायिक झालेली हिंदू कुटुंबातील दुसर्‍या, तिसर्‍या पिढींतील मुले त्यांचे वडील जरी भारताबाहेर जन्मले तरी त्यांच्या वाड-वडिलांची भूमी भारत असल्यामुळे ते हिंदूच ठरतात. ‘पितृभू’ आणि ‘पुण्यभू’ हे दोन्ही निकष जो एकाचवेळी एकत्र पूर्ण करेल तो ‘हिंदू.’ सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू, बौद्ध, जैन, शीख, लिंगायत, आर्यसमाजी, ब्राह्मोसमाजी, प्रार्थनासमाजी इत्यादी सर्व हिंदू ठरतात,





 इतकच काय निधर्मी, कुठलाच धर्म न मानणारे, नास्तिकही हिंदू ठरतात. बरोबरीने ‘हिंदू कोड बिल’ ज्यांना लागू आहे ते सर्वच हिंदू ठरतात. मात्र, मुसलमानांची ही ‘पितृभू’ असली तरी त्यांची ‘पुण्यभू’ अरबस्तानात किंवा पॅलेस्टाईनमध्ये आहे म्हणून मुसलमान, ख्रिश्चन, पारशी व ज्यू यांना वगळले. मात्र, त्यांची व्याख्या कोणाला वगळण्यासाठी नव्हती, तर सर्वांचा समावेश करून घेण्यासाठी होती. ती भारतीय नागरिकत्वाची व्याख्या नाही, भारतीय देशभक्त कोण याची व्याख्या नाही. ती ‘हिंदू कोण?’ची व्याख्या आहे.




हिंदुत्वाला हिंदू धर्मापासून त्यांनी स्वतंत्र केले. धर्म म्हणजे कोणत्यातरी आध्यात्मिक वा धार्मिक पंथाच्या वा मताच्या नियमांचा संग्रह. पण, हिंदुत्व म्हणजे ऐहिक, राजकीय, सामाजिक संकल्पना आहे. अर्थात हिंदुत्व म्हणून अशी विभागणी केली तरी भारताचे नागरिक म्हणून हिंदूंना कोणतेही विशेष लाभ इतर कोणत्याही धर्मीयांना कमी अधिकार असावेत, असे त्यांचे मत नव्हते, तर अल्पसंख्याकांना बरोबरीनेच सर्व हक्क, लाभ मिळावेत, असे मत त्यांनी अनेक वेळा मांडले आहे.




हिंदूराष्ट्राची संकल्पना सांगताना २१व्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर म्हणतात, “हिंदू संघटनवादी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार सर्व नागरिकांना समान अधिकार नि कर्तव्ये राहतील. मग त्यांची जात, पंथ, वंश वा धर्म कोणतेही असोत, मात्र त्यांनी या हिंदुस्थानच्या राज्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आणि कृतज्ञ राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. भाषण, विचार, धर्म नि संघ इत्यादी संबंधीचे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना सारखेच उपभोगता येतील. हिंदुस्थानची भावी राज्यघटना या व्यापक तत्त्वांवर आधारण्यात येईल... सामान्य हिंदीराष्ट्राच्या वाढीशी हिंदूराष्ट्राची कल्पना कोणत्याही प्रकारे विसंगत नाही.” अर्थातच बहुसंख्याक वा अल्पसंख्याक असा कोणताही भेदभाव ते अधिकार देण्यासाठी करत नव्हते. आपल्या अनेक भाषणांत ते वेळोवेळी सांगतात की, “धर्म, वंश, जात, पंथ यावरून ते भेदभाव करणार नाहीत.”



 
 
“अल्पसंख्याकांचा धर्म, संस्कृती नि भाषा त्यांच्या संरक्षणाची हमी आम्ही त्यांना केव्हाही देऊ, पण तद्वतच आपलाही धर्म, संस्कृती नि भाषा रक्षिण्याच्या हिंदूंच्या समान स्वातंत्र्यावर त्यांचे होणारे कोणतेही अतिक्रमण आम्ही यापुढे सहन करणार नाही. जर अहिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण व्हावयाला पाहिजे तर हिंदुस्थानातील कोणत्याही अतिक्रामक अल्पसंख्याकांपासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण निश्चितपणे झालेच पाहिजे. म्हणजे सर्व धर्माच्या लोकांना धर्मपालन व धर्मसंरक्षण करायचा अधिकार दिला आहे.”



अशा प्रकारे सर्वांना समान अधिकार आणि कर्तव्ये असावीत, असे त्यांनी म्हटले, तर मग त्यांचे ‘हिंदुत्व’ किंवा ‘हिंदूराष्ट्र’ देशाला घातक कसे असू शकेल? हिंदुत्वाची आणि हिंदूराष्ट्राची मांडणी करण्याचा उद्देश म्हणजे त्यांचे विषमता निर्मूलनाचे आणि समाज संघटित करण्याचे समाजकार्य; बरोबरीने अतिक्रामक अल्पसंख्याकांपासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण आवश्यक हे ठासून सांगणे. अल्पसंख्याक हक्क रक्षण करताना हिंदूंच्या न्याय्य आणि नागरी अधिकारांची पायमल्ली होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक होते.



अनेक प्रकारच्या अस्मितांमुळे, वैविध्यामुळे समाजात पडलेली फूट हेही स्वातंत्र्य गमावण्याचे एक कारण होते आणि राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी तिचे पुनर्निर्माण करणे गरजेचे होते. या देशात जन्मलेल्या पंथांमध्येही स्वतंत्र मतदारसंघाच्या नावाने ब्रिटिशांनी फूट पाडली होती आणि राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वांनी एका समान तत्त्वावर एकत्र येणे गरजेचे होते. अस्पृश्यता निर्मूलनासाठीही सावरकर अग्रतेने प्रयत्न करताना दिसतात. याच उद्देशाने भारतीय संविधानानेही आपले सर्वोच्च उद्दिष्ट हे बंधुत्व हे ठेवले. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेचाच संविधानाने, कायद्याने आणि त्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमधून पुनरुच्चार केला.



कलम २५(२) ब च्या स्पष्टीकरणामध्येच लिहिलं आहे की, “हिंदूंचा जिथे जिथे संदर्भ येईल तो शीख, जैन आणि बौद्ध धर्माचा संदर्भ म्हणूनही मानला जावा. हिंदू विवाह कायदा १९५५, हिंदू वारसाहक्क कायदा १९५६, हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा १९५६, हिंदू दत्तक व पोटगी कायदा १९५६ हे सर्व कायदेही हिंदू म्हणजे वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो, प्रार्थना आणि आर्य समाज, बौद्ध, जैन, शीख यांना लागू आहे तसेच इतरही जे या भूमीत राहतात. मात्र जे धर्माने मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू नाहीत अशांना लागू आहेत. याचाच अर्थ हिंदूंचा कायदा सावरकरांनी ज्यांना हिंदू मानलं त्या सर्वांना लागू आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे या भूमीत जन्मलेल्या या पंथांना इहवादी सर्व कायदे हे हिंदूंचेच लागू राहिले.”


याच गोष्टीमुळे सर्वोच्च न्यायालयाने ‘हिंदू ही जीवनपद्धती आहे.’ असं म्हटलं. १९९५ साली सरन्यायाधीश जस्टीस जे. एस. वर्मा म्हणतात, फक्त धार्मिक आचारांच्या आधारावर हिंदुत्वाचा संकुचित विचारांनी अन्वयार्थ लावता नये. भारताची संस्कृती, भारतीयांची मूल्ये जी जगण्याचा मार्ग दाखवतात, त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. ‘हिंदुत्व’ शब्द हा विशेषकरून ‘एक जगण्याचा मार्ग’ हा अर्थ सूचित करतो. सावरकरांनीही फक्त धर्म आणि धार्मिक आचरण हिंदुत्वाचे लक्षण मानले नाही.


सावरकरांचे हिंदुत्वाचे आणि हिंदूराष्ट्राचे विचार हे अशा प्रकारे आपल्या राज्यघटनेशी, सर्वोच्च न्यायालयाने प्रस्थापित केलेल्या कायद्यांशी थोडेही विसंगत आहेत, असे दिसत नाहीत. उलट संविधानाने, कायद्याने तेच लिहिलेले आणि न्यायालयांनीही त्याचे तंतोतंत तसेच स्पष्टीकरण दिलेले दिसते.



 - विभावरी बिडवे




(संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)





@@AUTHORINFO_V1@@