सावरकर आणि नाझीवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
savarkar _1  H




‘वंशश्रेष्ठत्व’ याऐवजी सावरकरांनी जातिवादाला प्राधान्य दिले किंवा वर्णसंस्थेतील उच्च वर्णाचा वापर हिटलरच्या ‘मास्टर रेस’ या संकल्पनेप्रमाणे केला, असा आरोपही बर्‍याचदा ऐकला आहे. पण, सावरकर हे नेहमी जातिव्यवस्थेविरुद्ध उभे होते. सावरकरांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन करणे, सर्व जातींना हिंदू सणांच्या एकत्रित उत्सवासाठी प्रोत्साहित करणे आणि जाती-जातींतील भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले.



सावरकर आणि हिटलर यांच्या विचारांमधील सहसंबंधांवर बर्‍याच चर्चा कट्ट्यांपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये रंगत असतात. सावरकरांचा ‘हिंदू राष्ट्रवाद’ आणि हिटलरचा ‘वंशवाद’ या दोन भिन्न मतप्रवाहांची सांगड अनेक जणांकडून नेहमी घातली जाते. सावरकरांचं हिंदुत्व आपण अभ्यासलं, तर ‘हिंदुत्व’ हा नुसता शब्द नसून इतिहास आहे. हा इतिहास फक्त आध्यात्मिक आणि धार्मिक बाबींवर अवलंबलेला नसून संपूर्ण भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. (१) हे सावरकरांचं विधान प्रामुख्याने समोर येतं. परंतु, हिटलरच्या विचारधारेचा उगम हा जर्मन इतिहासातून नव्हे, तर पहिल्या महायुद्धाच्या शेवटातून अपमानास्पद अशा व्हसार्यच्या तहामुळे सूडवृत्तीतून झाला होता. सावरकरांच्या विचारधारेचा मूळ गाभा हिंदुत्वाची प्रगती असून कोणत्याही प्रकारच्या सूडवृत्तीवर ही विचारधारा कधीच अवलंबून नव्हती.



हिटलरच्या ‘मास्टर रेस’ किंवा ‘वंशश्रेष्ठत्व’ या संकल्पनेची नेहमीच सावरकरांच्या ‘हिंदू वंश’ या संकल्पनेसोबत तुलना केली जाते. हिटलरचा विरोध हा ज्यू धर्माला नसून ज्यू या वंशाला होता. (२) तर वंशवादाबद्दल सावरकरांचे मत सरळ आणि सोपे होते. एकंदरीत जर पाहिले तर सर्व जगामध्ये मनुष्य म्हटला की त्याची एकच जाती असली पाहिजे ती मानव जाती होय. आपण एकाच रक्ताच्या संचरण्याने जीवंत राहिलो आहोत नि ते रक्त म्हणजे मानवी रक्त, याव्यतिरिक्त जी अन्य भावना ती केवळ तात्पुरती सोईपुरती आणि केवळ सापेक्षतः सत्य आहे. तुम्ही ज्या ज्या कृत्रिम भिंती जातीजातींमध्ये निर्माण करता, त्या भुईसपाट करण्याकरिता, निसर्गाचा सतत प्रयत्न चालू आहे. रक्तारक्तांचे संमिश्रण रोखून धरणे म्हणजे वाळूच्या पायावर इमारत उठविणे होय. सर्व धर्मसंस्थापकांच्या सर्व आज्ञांपेक्षाही स्त्रीपुरुषांमधले प्रेमाकर्षण हे अधिक बलवान ठरले आहे. खरोखरीच जर बोलायचे तर आपल्याला मात्र इतकेच विधान करता येईल की, माझ्या धमन्यांमधून सर्व मानवी जातीचे रक्त खेळत आहे. मनुष्याची या ध्रुवापासून त्या ध्रुवापर्यंतची ऐकी हेच सत्य आहे. इतर सर्व केवळ सापेक्षत: आंशिकत: तसे आहे. (३) अगदी साध्या भाषेत सांगायचे झालेच, तर शेवटी संपूर्ण जगात, मानवाचा विचार करता एकच वंश आहे तो म्हणजे मानवी वंश आणि हा वंश एकाच सामायिक रक्तामुळे जीवंत आहे आणि ते रक्त म्हणजे मानवी रक्त.



‘वंशश्रेष्ठत्व’ याऐवजी सावरकरांनी जातिवादाला प्राधान्य दिले किंवा वर्णसंस्थेतील उच्च वर्णाचा वापर हिटलरच्या ‘मास्टर रेस’ या संकल्पनेप्रमाणे केला, असा आरोपही बर्‍याचदा ऐकला आहे. पण, सावरकर हे नेहमी जातिव्यवस्थेविरुद्ध उभे होते. सावरकरांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन करणे, सर्व जातींना हिंदू सणांच्या एकत्रित उत्सवासाठी प्रोत्साहित करणे आणि जाती-जातींतील भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांनी सर्व प्रवर्गातील लोकं प्रार्थना आणि उपासना करू शकतील, असे पतितपावन मंदिरही उभे केले. अमुक एका जातीला उच्च किंवा कनिष्ठ असा दर्जाही दिला नाही. कोकणात रत्नागिरीला ते जातिवादाविरुद्ध खंबीरपणे लढा देत होते. असे असूनदेखील, सावरकरांनी वंशश्रेष्ठत्वताचा वापर जातीवादाला प्राधान्य देण्यासाठी केला असा अपप्रचार त्यांच्याबद्दल करण्यात येतो.


दुसर्‍या महायुद्धाच्या रूपाने जेव्हा संधी आली, तेव्हा भारतीय तरुणांना ब्रिटिश सैन्यात दाखल होण्याचे आवाहन सावरकरांनी केले. पण, विरोधकांनी सावरकरांवर ‘रिक्रूटवीर’ (भरती अधिकारी) म्हणून ठपका ठेवला. जर खरंच सावरकर हिटलरचे प्रशंसक आणि जातिवादाचे पुरस्कर्ते असते, तर त्यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध हिटलरला पाठिंबा दिला असता का? 
आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत सावरकरांचे विचार पाहता, परराष्ट्रांशी भारताचा संबंध त्या देशांतील सरकार किंवा विचारधारेपेक्षा, भारताच्या राष्ट्रीय हितावर आणि सुरक्षा धोरणांवर अवलंबून आहे. सावरकरांच्या मते, प्रत्यक्ष राजकारणानुसार, आपण आपले हित ज्यात आहे त्यांच्याशी मैत्री करायला हवी, राजकीय विचारधारेशी नाही आणि आपले हेतू साध्य होईपर्यंत ती मैत्री टिकवायला हवी. अभारतीय असणार्‍या नि युरोपात राहणार्‍या ज्यू निर्वासितांसाठी भारताची दारे खुले करण्याच्या काँग्रेसच्या आमंत्रणाला सावरकरांनी कडाडून विरोध केला. परंतु, इस्रायलच्या निर्मितीचे समर्थनसुद्धा केले. यावरुन त्यांची विचारधारेच्या पुढची कूटनीति दिसून येते.


सावरकरांचे यहुदींसंबंधातील आणखी एक वाक्य युक्तिवाद करताना नेहमी वापरण्यात येते ते म्हणजे, बहुसंख्य नागरिकांमुळे राष्ट्र निर्माण होते. जर्मनीमध्ये यहुद्यांनी काय केले? ते अल्पसंख्याक असल्याने त्यांना जर्मनीतून हाकलून देण्यात आले. याचा अर्थ सर्रासपणे, यहुदींसोबत जर्मनीत जे घडत होते त्याचे सावरकर समर्थन करत होते, असा लावला जातो. परंतु, सावरकरांच्या, “ज्यू हे तर संख्येने फारच अल्प आहेत नि ते आमच्या राष्ट्रीय आकांक्षांच्या विरुद्धही नाहीत. आमचे हे सर्व अल्पसंख्याक देशबांधव हिंदी राज्यामध्ये प्रामाणिक नि देशभक्त नागरिक म्हणूनच वागतील याविषयी निश्चिती आहे.” यहुदी लोकांचा विचार करता त्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यांनी राजकीयदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूंना आजवर कधी त्रास दिलेला नाही आणि ते प्रामुख्याने धर्मांतर करविणारेही नाहीत. ते निराश्रित असता, हिंदूंनी त्यांना जो आश्रय दिला. तो स्मरून ते हिंदूंशी स्नेहभावानेच राहू इच्छितात. अर्थात, त्यांना संयुक्त हिंदी राष्ट्रात सहज समाविष्ट करून घेता येईल.” या वाक्याकडे दुर्लक्ष केले जाते. (४) यहुदींनी भारतीय संस्कृतीत ढवळाढवळ न करता मित्रत्वाच्या नात्याने त्यात सहभागी झाले. यहुदी राष्ट्रनिर्मितीनंतर सावरकरांनी इस्रायलचे समर्थनदेखील केले होते. म्हणजे, त्यांना ‘नाझीवादी’ म्हणणार्‍यांकडून यहुदी राष्ट्राचे समर्थन करणारे सावरकर या विषयावर कधीही दृष्टिक्षेप टाकला जात नाही.


नाझीवाद आणि सावरकरांचे हिंदुत्व यात साम्य शोधणारे सावरकरांच्या विचारांचा गाभा विसाव्या शतकात घडलेल्या युरोपातील घटनांपुरताच मर्यादित ठेवतात. मागील शतकात वाढलेल्या ‘पॅन-इस्लामिक’, ‘पॅन-स्लाव्हिक’, ‘पॅन-इथिओपिक’ चळवळींचासुद्धा सावरकरांच्या हिंदुत्वाला वळण देण्यात मोठा वाटा होता. सावरकरांनी हिंदूंना आपले प्राचीन, नैसर्गिक आणि संघटनात्मक संबंध जोपासण्यास सांगितले. जातिवाद नष्ट करून, आंतरजातीय विवाह, आंतरजातीय सहभोजन यांतून हिंदू एकतेचे धागे मजबूत करण्यास सांगितले. मातृभूमीप्रति ओढ कायम असायला हवी, हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी आणि यहुदींनी आपण आधी भारतीय आहोत आणि बाकी सगळे नंतर हे लक्षात ठेवायला हवे. (५) या विचारांच्या अगदी विरुद्ध म्हणजेच हिटलरचा, आदर्शवादी नाझी पुरुष हा वंशवादावर चालणारा आणि नाझी विचारधारेचा पुरस्कार करणारा असायला हवा, ज्याची प्रत्येक कृती जर्मन वंशासाठी असावी, असा कायम हट्ट असे.


‘वोल्क्सगेमेनशाफ’ या नाझी संकल्पनेद्वारे हिटलरने अपील केले होते की, आधुनिक युगासाठी नाझीवाद ही एक नवीन संकल्पना असून आधुनिकतेच्या तणावपूर्वक आणि असुरक्षित वातावरणापासून संरक्षण देण्याचे मोठे काम ही विचारधारा करते. परंतु, सावरकरांच्या मते, आधुनिकीकरण एक महत्त्वपूर्ण संकल्पना होती. समाजातील तणाव दूर करण्यासाठी आणि अस्पृश्यांमधील असुरक्षितता नष्ट करण्यासाठी, आधुनिकीकरणाचा वापर व्हायला हवा आणि त्यासाठी सावरकर नेहमी तत्पर असत. विज्ञान आणि तंत्रज्ञानासमवेत मानसिक आधुनिकीकरण हिंदू समाजाची गरज आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. असे असूनही नाझीवादी विचारसरणीची सावरकरांच्या हिंदुत्वाशी सतत सांगड घातली जाणे दुर्दैवी आहे.

 - शांभवी थिटे



References:

१. Savarkar, V. D, Hindutva: Who is a Hindu? S. S. Savarkar, Bombay, १९६९.

२. The Roots of Nazism, Encyclopaedia Britannica

३. समग्र सावरकर वाड्मय- खंड ६, पृष्ठ ५८

४. Akshay Jog, Organiser: Voice of the nation, Vir Savarkar, Nazi, Hitler and Jews, २५-Feb-२०२०

५. Political Thought, TYBA, p.१०६


@@AUTHORINFO_V1@@