सावरकर, द्विराष्ट्रवाद आणि गैरसमज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
ind-pak-veer savarkar _1&

तत्कालीन हिंदू महासभेने (ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते) फाळणीला कडाडून विरोध केला आणि धर्माच्या आधारावर होणारी ही फाळणी हिंदुस्थानच्या हिताची नाही, हे ठणकावून सांगितले होते. त्याच काळात सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची (स्वतंत्र हिंदू आणि मुस्लीम राष्ट्र) भूमिका घेतली आणि तेच या भूमिकेचे प्रणेते आहेत अशा आशयाचे निराधार आरोप सावरकरांवर झाले.
   
धर्मावर आधारित अशी १९४७ झालेली भारताची फाळणी हा भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. यापूर्वी भारतामध्ये धर्मावर आधारित फाळणी करायचे अयशस्वी प्रयत्न वंगभंग आंदोलनावेळीही झाले. पण, त्यामुळे फाळणी झाली नाही तरी भारतीय जनमानसाची दुखरी आणि लंगडी बाजू मात्र इंग्रजांनी अत्यंत अचूकपणे हेरली. इंग्रजांनी पूर्वापार वापरलेली ’फोडा आणि राज्य करा’ करा ही नीती त्यानंतरच्या काळात वेग घेऊ लागली. इंग्रजांनी भारतात पाय रोवायच्या बर्‍याच अगोदरच्या काळात भारतावर मुघलांनी राज्य केले आणि तेव्हापासूनच एकसंध नसणार्‍या भारतीय समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आघात होत गेले. भारत हा पूर्वापार हिंदू प्रदेश किंवा हिंदुस्थान होता आणि इथले सर्व शासक हे हिंदूच होते. तेव्हाही हिंदू बहुसंख्याक होते आणि आज ही हिंदूच बहुसंख्याक आहेत. १४व्या शतकात मुघल आक्रमण झाल्यानंतर सुमारे दोन ते अडीच शतके देशाच्या उत्तर भागात टप्प्याटप्प्याने मुस्लीम शासकांची जुलमी राजवट राहिली. त्याच काळात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले गेले आणि हिंदूंची धर्मांतरे झाली. पुढे इंग्रजांच्या काळात काही ठिकाणी झालेल्या जातीय दंगली आणि त्यानंतर भारताची झालेली धर्माधिष्ठित फाळणी हे या दुफळीचे अंतिम टोक ठरले.



तत्कालीन हिंदू महासभेने (ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते) फाळणीला कडाडून विरोध केला आणि धर्माच्या आधारावर होणारी ही फाळणी हिंदुस्थानच्या हिताची नाही हे ठणकावून सांगितले होते. त्याच काळात सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची (स्वतंत्र हिंदू आणि मुस्लीम राष्ट्र) भूमिका घेतली आणि तेच या भूमिकेचे प्रणेते आहेत अशा आशयाचे निराधार आरोप सावरकरांवर झाले. १९३७च्या सुमारास सावरकर राष्ट्रीय राजकारणात मूळ प्रवाहात येऊन हिंदू महासभेच्या रूपाने सकल हिंदू समाजाचा आवाज बनत होते. सावरकर हयात असतानाही त्यांच्या भाषणातील या भागावर आक्षेप घेण्यात आला होता. नागपूर येथील साप्ताहिक ’आदेश’च्या कार्यालयात जमलेल्या पत्रकारांना दि. १५ ऑॅगस्ट १९४३ ला स्वत: सावरकरांनी आपल्या वाक्याचे स्पष्टीकरण दिले. दि. २३ ऑॅगस्ट १९४३ ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. दि. २८ ऑॅगस्ट १९४३च्या साप्ताहिक ’आदेश’मध्ये ही मुलाखत प्रसिध्द झाली.


१९३७ साली कर्णावती (अहमदाबाद) येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर असे म्हणाले होते ”हिंदुस्थान हे एकात्म आणि एकजिनसी राष्ट्र आहे असे आज गृहित धरता येत नाही. मात्र, उलटपक्षी हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी मुख्यत: दोन राष्ट्रे विद्यमान आहेत.” या वाक्याच्या आधाराने (मागचापुढचा कोणताही संदर्भ न देता) सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची भूमिका घेतली हे बालीश आरोप विरोधकांनी केले. सदर आरोपांचे खंडण करताना सावरकर म्हणाले की ‘’मुसलमान आणि हिंदू अशी दोन राष्ट्रे हिंदुस्थानात आहेत. अशी आहे ती वस्तुस्थिती सांगणे म्हणजे काही मुसलमानांचा देश तोडून सांगण्याचा पाकिस्तानी दुराग्रह मान्य करणे नव्हे... सध्या दोन व दोनशे, स्वत:स हिंदूंपासून परकी मानणारी राष्ट्रे हिंदुस्थानात जरी बळाने घुसली असली तरी आणि हिंदुस्थानची विभागणी करू मागत असली, तरी ती वस्तुस्थिती नुसती नाकारण्याच्या भाबडट नि भेकड धोरणाने नव्हे, तर ती वस्तुस्थिती समजून घेऊन त्या वस्तुस्थितीला तोंड देऊन, तिला उलथून पाडून, आसिंधुसिंधू हिंदुस्थानात स्वतंत्र, अखंड नि अविभाज्य असे हिंदुराष्ट्रच नांदत राहणार, यात शंका नाही.”


“एक सार्वभौम, एकसंध आणि अविभाज्य राष्ट्र म्हणून हिंदुस्थानची ओळख असावी आणि जनसंख्येची ताकद (principle of people's power) सूत्रानुसार ते राजकीयदृष्ट्या समर्थ राष्ट्र म्हणून ओळखले जावे हेच आपले ध्येय आहे आणि हीच हिंदूंच्या एकत्रीकरणाची शपथ आहे,” असे सावरकर म्हणत. हिंदू आणि मुसलमान जर वेगळी राष्ट्रे असतील तर ते एक राष्ट्र म्हणून कसे एकत्र होतील, या प्रश्नाच्या उत्तरात सावरकर म्हणतात की, “आपण राष्ट्र आणि राज्य यामध्ये गोंधळ करु नये. राज्य गेले तरी राष्ट्र टिकते. जेव्हा मुसलमान आमच्यावर राज्य करत होते, तेव्हा शासन (राज्य) त्यांचे होते. पण हिंदूंचे अस्तित्व निश्चितपणे अबाधित होते. तरीही हिंदू आणि मुसलमानांच्या संयुक्त राज्यास कुठलीही अडचण नाही. भूतकाळात, आपल्याकडे सौराष्ट्र, महाराष्ट्र, देवराष्ट्र (बेरार जवळ) ह्यासारखी राष्ट्रे होती. आता ही राष्ट्रे कुठेत? एकमेकात मिसळून गेली आहेत. शक आणि हूण हिंदुस्थानात राष्ट्र म्हणून आले. पण आता त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे काय आहेत? आम्ही त्यांना आत्मसात करून घेतले. म्हणून जर मुसलमानांना हवे असेल तर ते हिंदूंसोबत एक अल्पसंख्य समुदाय म्हणून आनंदाने राहू शकतात. सर्वाच्या अंती, इच्छा हीच राष्ट्राचा अधिक प्रभावी व महत्त्वाचा घटक ठरतो.”



बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी सावरकरांची संकल्पना स्वीकारली असे म्हणणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. कारण, जिनांच्या कोणत्याच लिखाणात सावरकर त्यांचे प्रेरणास्रोत होते असे लिहिलेले आढळत नाही. २४ जानेवारी १८८८ साली सर सय्यद अहमद (अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक) तत्कालीन मद्रास (आताचे चेन्नई) काँग्रेसचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “भारतात राहणारे सर्व धर्मांचे लोक एकच राष्ट्राचे घटक आहेत किंवा ते तसे होतील व त्यांच्यात समान आकांक्षा निर्माण करता येतील असा आपला समज आहे काय? मला तर ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटते.” प्रत्युत्तरादाखल बद्रुद्दीन तय्यबजींनी १८ फेब्रुवारी १८८८ ला सर सय्यद अहमदना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “माझ्या माहितीत तरी सर्व भारताला एक राष्ट्र मानणारा कोणी नाही. मी माझ्या उद्घाटनाच्या भाषणात स्पष्टपणे मांडले की, हिंदुस्थानात अनेक जमाती किंवा राष्ट्रे आहेत व त्या प्रत्येकाला स्वत:चे असे विशिष्ट प्रश्न आहेत.” भारतातून विभाजित असे स्वतंत्र आणि सार्वभौम मुस्लीम राष्ट्राची सर्वप्रथम सार्वजनिक मागणी १९३० साली तत्कालीन मुस्लीम लीग अध्यक्ष मोहम्मद इक्बाल यांनी केली. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले होते की, “पंजाब, वायव्य सीमाप्रांत, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांचे एकसंध राष्ट्र झालेले पाहण्याचे माझे एक स्वप्न आहे.” त्यामुळे सावरकर हे द्विराष्ट्रवादाचे जनक होते, हा सावरकरांवर होणारा सर्वात मोठा अन्याय आहे. सावरकरांबद्दलचे हे गैरसमज दूर करण्याचा हा एक प्रयत्न!
- केदार सरवटे
@@AUTHORINFO_V1@@