स्वा. सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
VDS _1  H x W:




सावरकर जिथे गेले तिथे क्रांतिकार्य केले. तरुण जागृत केले. सावरकर नाशिकमध्ये होते, तिथेही क्रांतिकारी चळवळी चालू केल्या. इंग्लंडमध्ये गेले, तिथेही क्रांतिकार्य केले. अंदमानात शिक्षा भोगत असताना कैद्यांना जागृत करून क्रांतिकार्यात सहभागी केले. अंदमानातून रत्नागिरीत आले, तिथेही त्यांनी आपले क्रांतिकारी कार्य सुरूच ठेवले. क्रांतिकार्याचा व भारतमातेच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेऊन ती पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी ते जिथे असतील तिथे प्रयत्न केले आहेत.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अवघे आयुष्यभर देशसेवा केली. अहिंसक मार्गाचा अवलंब न पत्करता त्यांनी सशस्त्र क्रांतीस प्राधान्य दिले. त्याच क्रांतिकार्यामुळे त्यांना तब्बल ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ब्रिटिशांनी फर्मावली. परंतु, ‘देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन’ अशी प्रतिज्ञा घेतलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना काहीही करून अंदमानच्या सेल्युलर जेलमधून बाहेर पडायचे होते. त्यासाठीच त्यांनी कुटनीतीचा अवलंब करत ब्रिटिशांशी आपण सामोपचाराने घेत आहोत, असे दाखवत ब्रिटिश सरकारने ठेवलेल्या अटींचा स्वीकार करत आपली सुटका करवून घेतली. सुटका झाल्यानंतर विनायक दामोदर सावरकर कोणत्याही राजकीय कार्यात सहभाग घेणार नाहीत, ही त्यातील सर्वात महत्त्वाची अट होती.

या एका अटीमुळे सावरकरांना रत्नागिरीत असताना अप्रत्यक्ष छुप्या पद्धतीने आपले क्रांतिकार्य करावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे अफझलखानाला गोड बोलून कुटनीती वापरून आपल्या जाळ्यात ओढला होता, त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकार सावरकरांच्या कुटनीतीपुढे झुकले होते. ब्रिटिश प्रशासनाची तशी इच्छा नसली तरी न्यायव्यवस्थेमुळे ब्रिटिशांना तसे करणे भाग पडले होते. सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना सरकारविरोधी क्रांतिकार्य करत आहेत, याची जाणीव ब्रिटिशांना होती, पण ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नव्हते. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे, तर पाच वेळेस सावरकरांच्या रत्नागिरीतील नजरकैदेची मुदत वाढवली आहे, हे विसरून चालणार नाही.

तात्यारावांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी खटाटोप


स्वा. सावरकरांची सुटका म्हणजे किती मोठ संकट आहे, याची जाणीव ब्रिटिशांना होती. त्यामुळे त्यांनी १९२४ नंतर सावरकर रत्नागिरीत असताना त्यांना पुन्हा एखाद्या गुन्ह्याखाली अटक करून अंदमानात पाठविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. यासाठी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष राहावं म्हणून निवासस्थानी खडा पहारा ठेऊन नजर ठेवली होती. सावरकरांचे रत्नागिरीतील सहकारी आ. ग. साळवी सांगतात, “सावरकर वरवर सामाजिक कार्यात गुंतलेले दाखवत असले तरी त्यांच्या मनातील ब्रिटिशांच्या विरोधातील खदखद तशीच जीवंत होती. योग्य व्यक्ती भेटल्यास त्यास ते बॉम्बस्फोट आणि बंदूक चालविण्याची शिक्षा देऊन प्रोत्साहित करत असत. वामनराव चव्हाण, वासुदेव बळवंत गोगटे, वासुदेव पवार, अण्णा कासार, वासू हर्डीकर यासारख्या निधड्या छातीच्या क्रांतिवीरांच्या माध्यमातून त्यांनी आपली क्रांती चळवळ जीवंत ठेवली होती.




सावरकरांनी आपली माणसे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनात पेरून ठेवली होती. सावरकरांच्या विरोधात सरकार काय पावलं उचलत आहेत, हे त्यांना त्यामुळेच माहीत होत असे. तेथील कर्मचार्‍यांकडून सावरकर ब्रिटिश सरकारविरोधी बोलले असे वदवून घेण्याचा बर्‍याचदा ब्रिटिश अधिकार्‍यांनी प्रयत्न केला. पण, त्यांना त्यात यश आले नाही. सावरकरांना पुन्हा एखाद्या गुन्ह्यात अडकवून अंदमानात पाठविण्यासाठी प्रयत्न करणार्‍यात जिल्हाधिकारी गिलिगन व जिल्हा पोलीस अधिकारी ओ’सलीवन सतत प्रयत्न करतच होते. तात्यारावांनी क्रांतिकार्य सोडून केवळ सामाजिक कार्य सुरु केले असते, तर ब्रिटिशांना एवढे उपद्व्यााप करण्याची गरजच काय होती?”


पृथ्वीसिंग आझाद आणि सेनापती बापटांना पुन्हा क्रांतिकारक बनवले


तात्याराव रत्नागिरीत असताना उघडपणे त्यांना क्रांतिकार्यात सहभाग घेता येत नव्हता. परंतु, त्यांना भेटलेला एक एक जण क्रांती घडवून आणण्यासाठी प्रेरित होत असे. पृथ्वीसिंग आझाद हे सावरकरांचे अंदमानातील सहकारी. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या विचारात बदल झाला होता. त्यांनी गांधीजींची भेट घेऊन आपण अहिंसक क्रांतिकार्यात सहभागी होऊन देशसेवा करणार असल्याचे ठरविले होते. रत्नागिरीत काही दिवसांनी त्यांची व सावरकरांची भेट झाली. या भेटीनंतर पृथ्वीसिंग पुन्हा सशस्त्र क्रांतिकार्यात सहभागी झाले. सेनापती बापटांनीसुद्धा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने जाण्याचे ठरविले होते. परंतु, त्यांची एके दिवशी रत्नागिरीत तात्यारावांशी भेट झाली. अख्खी रात्र गहन चर्चा चालली. या भेटीनंतर तेही पुन्हा सशस्त्र क्रांतिकार्यात उतरले. यानंतर त्यांनी हॉटसनवर गोळीबार करणार्‍या वासुदेव बळवंत गोगटेंचे अभिनंदन केले.


“गोगटेंचा मार्ग योग्य असून याच मार्गाने आपण ब्रिटिशांना आपल्या देशातून हुसकावून लावू शकतो,” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. या भाषणामुळे ब्रिटिशांनी त्यांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तात्यारावांच्या भेटीनंतर अहिंसक मार्ग स्वीकारलेले तरुण पुन्हा क्रांतिकार्यात सहभागी होत होते, ते नेमके कशामुळे? सावरकर जर क्रांतिकार्यापासून अलिप्त असते व ब्रिटिशांशी त्यांनी इमान राखलेले असते तर गोगटे आणि बापट सक्रिय क्रांतिकारक कदापि होणे शक्यच नव्हते. विनायक दामोदर सावरकर नावाच्या क्रांतीच्या यज्ञकुंडाच्या सहवासात प्रज्वलित होऊन एक एक निखारा मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बाहेर पडत होता, ते तात्यारावांचे कार्य जीवंत होते म्हणूनच!



लालाजींच्या मृत्यूनंतर सरकारचा निषेध

लाला लजपतराय यांच्यावर सॅण्डर्स या पोलीस अधिकार्‍याकडून झालेल्या लाठीहल्ल्यात ते निधन पावले. त्याविषयी शोकसभा आयोजित करून तात्यारावांनी मोघे नावाच्या आपल्या सहकार्याकडून भाषण करविले. लालाजींच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी कार्यक्षेत्रात उतरा, असे आवाहन त्यांनी देशातील तरुणांना केले होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी सॅण्डर्सला ठार मारून लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. गांधीजींनी याबद्दल मात्र दु:ख व्यक्त करत ‘ही हत्येची ब्याद’ हा लेख लिहिला. त्याला प्रत्युत्तर देत तात्यारावांनी आपल्या वृत्तपत्रातही ‘सुडाची ब्याद की हत्येची ब्याद’ असा अग्रलेख लिहिला.



या तिघा क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशी दिल्यानंतर तात्यारावांनी आपल्या घरावरील भगवा ध्वज उतरवून काळा झेंडा फडकावीत या घटनेचा व ब्रिटिश सरकारचा निषेध व्यक्त केला. तात्यारावांनी आपल्या ‘श्रद्धानंद’ वृत्तपत्रामधून चितगाव शस्त्रागारावर हल्ला करणार्‍या क्रांतिकारकांचेही समर्थन केले. देशवीर रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर श्रद्धांजलीपर लेख व काकोरी कटातील अश्फाकउल्ला यांच्या समर्थनात लेख लिहिले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारने ‘श्रद्धानंद’वर बंदी घातली. अंदमानातून काही अटी मान्य करून कैदेतून सुटून आल्यानंतरही सावरकर इतक्या सक्रिय क्रांतिकार्यात सहभागी होते, यालाच ‘धारिष्ट्य’ म्हणतात.


‘कृष्णशिष्टाई’ मुळे ब्रिटिशांची घबराट


सावरकर जिथे गेले तिथे क्रांतिकार्य केले. तरुण जागृत केले. सावरकर नाशिकमध्ये होते, तिथेही क्रांतिकारी चळवळी चालू केल्या. इंग्लंडमध्ये गेले, तिथेही क्रांतिकार्य केले. अंदमानात शिक्षा भोगत असताना कैद्यांना जागृत करून क्रांतिकार्यात सहभागी केले. अंदमानातून रत्नागिरीत आले, तिथेही त्यांनी आपले क्रांतिकारी कार्य सुरूच ठेवले. क्रांतिकार्याचा व भारतमातेच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेऊन ती पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी ते जिथे असतील तिथे प्रयत्न केले आहेत. १९२४ मध्ये रत्नागिरीत प्लेगची साथ आलेली असल्यामुळे सावरकरांना नाशिकला पाठविण्यासाठी मंजुरी मिळाली. नाशिकला जाताना तात्याराव ज्या तरुणांना भेटून गेले ते काही दिवसानंतर मीरत कटात सहभागी असल्याचे आढळले.



सावरकरांच्या कृत्यावर संशय घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी बेटसने त्यांना सक्त ताकीद देऊन एकाच आठवड्यात पुन्हा रत्नागिरीत पाठवून दिले. गुप्तचर खात्याच्या उपमहानिरीक्षकाने १९२९ मध्ये सावरकर हिंसक कारवायात सहभागी असल्याची तक्रार दिली. गोलमेज परिषद सुरु असताना सावरकर ‘कृष्णशिष्टाई’ या विषयावर भाषण देत होते. परंतु, त्याचा आशय गोलमेज परिषदेला भिडत होता. श्रोत्यांना तो कळत होता. तात्यारावांना कलेक्टरकडून याविषयी पुन्हा ताकीद दिली गेली. अशाप्रकारे तात्यारावांचे क्रांतिकार्य रत्नागिरी येथे असतानाही सुरूच होते हे स्पष्ट होते.


रत्नागिरीतील समाजकार्यही राष्ट्रकार्यच!


स्वा. सावरकर १९२४ नंतर समाजकार्यात गुंतले, त्यांनी क्रांतिकार्य सोडले असा चुकीचा आरोप अनेकजण करतात. परंतु, समाजकार्य हेही राष्ट्रकार्याच आहे, याचा त्यांना विसर पडलेला असतो. प्रत्यक्ष क्रांतिकार्य आणि राजकारण यापासून अलिप्त असलेले परंतु, सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतलेले असंख्य देशभक्त भारतमातेची सेवाच करत होते. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच समाजकार्य किती महत्त्वाचे आहे, हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच तात्यारावांनी केलेले समाजकार्य हेही एक राष्ट्रकार्यच होते.


पतितपावन मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी केलेले आंदोलन तर सर्वश्रुतच आहे. तात्यारावांनी मंदिर प्रवेशाचं कार्य जोमानं सुरु केलं होतं. तात्यारावांच्या घराची रत्नागिरीत असताना कितीवेळेस झडती घेण्यात आली याची मोजदाद नाही. देशात कुठेही काही घडले की सरकारसमोर सर्वात पहिले तात्यारावांचा चेहरा येई. कारण, तात्यारावांनी आपले क्रांतिकार्य कधीच थांबविले नव्हते. हे सर्व प्रसंग, घटना, पुरावे त्याचीच साक्ष देतात.

- कल्पेश जोशी




(संदर्भ: स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)



@@AUTHORINFO_V1@@