हिंदू महासभा-मुस्लीम लीग युती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Veer Savarkar _1 &nb





सावरकरांसारख्या देशभक्त अन् राष्ट्रहितैषी घटकांसाठी आग्रही असणार्‍या व्यक्तीवर फाळणीवादी, सत्तापिपासू असे निरर्थक अन् अश्लाघ्य आरोप केले जातात, तो आक्षेप म्हणजे, सावरकरांनी मुस्लीमबहुल भागात हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने मुस्लीम लीगसोबत संयुक्त मंत्रिमंडळे स्थापण्यास अनुमती दिली होती हा होय. तथापि, सावरकरांच्या राजकारणाची मूलतत्त्वे समजून घेतल्यास, या कृतीवरून होणार्‍या आरोपांतील फोलपणा सहज ध्यानात यावा!


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाबरोबरच त्यांच्या नानाविध प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर तरळून जातात. अत्यंत बहुआयामी, शूर, प्रतिभावान, हिंदुत्ववादी आणि लोकोत्तर गुणांची श्रीमंती लाभलेले असे हे व्यक्तिमत्त्व. आपल्या लोकोत्तर गुणांनी त्यांनी तत्कालीन समाजाला मार्ग दाखविला, हे खरे आहेच. परंतु, त्यांच्या मृत्युपश्चात इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांचे स्वभावविशेष आणि अभिनव गुणवैशिट्ये समाजास मार्गदर्शक ठरत आहेत, यावरून त्यांची महत्ता ध्यानात यावी. तथापि, हिंदुत्ववादाची विचारप्रणाली भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यापासून, हिंदुत्वाचे मेरुमणी असलेल्या सावरकरांवर आक्षेप घेण्याची अहमहमिकाच विरोधकांत लागली आहे. तथापि अनाठायी अन् तर्कदुष्ट आक्षेपांनी या लोकोत्तर व्यक्तिविशेषाबद्दल संभ्रमावस्था निर्माण होऊ नये, म्हणून त्या आक्षेपांचे निराकरण करणे क्रमप्राप्त ठरते.
या आक्षेपांतील एक आक्षेप, ज्याचा उच्चार करून सावरकरांसारख्या देशभक्त अन् राष्ट्रहितैषी घटकांसाठी आग्रही असणार्‍या व्यक्तीवर फाळणीवादी, सत्तापिपासू असे निरर्थक अन् अश्लाघ्य आरोप केले जातात, तो आक्षेप म्हणजे, सावरकरांनी मुस्लीमबहुल भागात हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने मुस्लीम लीगसोबत संयुक्त मंत्रिमंडळे स्थापण्यास अनुमती दिली होती हा होय. तथापि, सावरकरांच्या राजकारणाची मूलतत्त्वे समजून घेतल्यास, या कृतीवरून होणार्‍या आरोपांतील फोलपणा सहज ध्यानात यावा! सावरकरांनी सन १९४२-४३ मध्ये सिंध, पंजाब, वायव्य सीमाप्रांत, बंगाल, ओडिशा आणि आसाम या सहा प्रांतांत हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने हिंदू महासभा सदस्यांना मुस्लीम लीग पक्षासोबत संयुक्त मंत्रिमंडळे स्थापण्यास अनुमती दिली होती. ही अनुमती, लीगच्या भारतविरोधी धोरणांस विरोध करण्यासाठी, सीमाभागातील शीख व हिंदू या अल्पसंख्याक समूहाच्या रक्षणासाठी होती. सावरकरांना सत्ता वा मंत्रिपदांचे कसलेच आकर्षण वा पिपासा नव्हती. उपरोक्त गोष्टी, या त्यांनीच वेळोवेळी काढलेल्या पत्रके वा लेखांतून दिसून येतात.

‘साध्यानुकूल सहकार्य’ व ‘प्रतियोगी सहकारिता’ आणि ‘याल तर तुमच्यासह’ ही सावरकरांच्या राजनीतीतील सूत्ररुपे होती. साध्यासाठी अर्थात उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अनुकूल गोष्टींना सहकार्य अन् प्रतिकूल गोष्टींना विरोध, असा या सूत्रांचा अर्थ. आता, या बाबतीत सावरकरांनी काढलेली पत्रके काय म्हणतात बघू. १० जून १९४३ ला सावरकरांनी या संदर्भात पत्रक काढले, त्यात ते म्हणतात: “देशभक्तीने आणि शुद्ध हेतूने प्रेरित होऊन जर संयुक्त मंत्रिमंडळे बनविण्यात आली, तर संघशक्तीने काम करण्याचे शिक्षण आपल्याला मिळून परकेपणाची भावना नष्ट होईल. या संबंधात हिंदू महासभावाद्यांनी खालील सूचना लक्षात ठेवाव्यात. त्याची मुख्य तत्त्वे अशी, ज्या प्रांतात हिंदू अल्पसंख्य असून मुस्लीम मंत्रिमंडळे होणे अपरिहार्य असेल, तेथे हिंदूंनी प्रवेश करून शक्य तितकी अधिकाधिक मंत्रिपदे मिळवावीत. मग त्या मंत्रिमंडळातून स्वयंनिर्णयासारखे हिंदूघातक जे प्रस्ताव येतील, त्याला त्या मंत्र्यांनी आणि अन्य हिंदू सदस्यांनी निर्धाराने विरोध करावा. युद्धानंतर भविष्यकाळात जी कोणती राज्यघटना बनविण्यात येईल, ती बनवताना मुस्लीम लीग आणि काँग्रेस यांच्या बरोबरीने हिंदू महासभेचाही विचार घेतला पाहिजे. हिंदू महासभेचा हा अधिकार सिद्ध करण्यासाठी हिंदू संघटकांनी मंत्रिमंडळे बनवण्याचा प्रयत्न करावा. हिंदूंचे आणि इतरांचेही न्याय्य हक्क संरक्षण अधिकार करण्याचे वचन देणार्‍यालाच हिंदू बहुसंख्य प्रांतात मुख्यमंत्री निवडावे. प्रत्येक प्रांताने तेथील परिस्थितीनुसार ही मंत्रिमंडळे हिंदूहिताला बाधा न आणता बनविण्याचा प्रयत्न करावा.”



उपरोक्त तत्त्वांशी बांधील असणार्‍या हिंदू मंत्र्यांस सावरकरांचा पूर्ण पाठिंबा होता. वास्तविक पाहिले असतां, सावरकरांनी उपरोक्त पत्रकात, ‘लीगच्या मंत्रिमंडळात घुसा’ असाच आदेश दिला होता. तथापि, तो आदेश विरोधकच काय, पण स्वपक्षीयांनाही फारसा पटला नाही. तेव्हा, या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी सावरकरांनी १० जुलै १९४३ ला एक पत्रक काढले, ज्यात त्यांची भूमिका विस्ताराने मांडली होती. त्यात ते म्हणतात: “संयुक्त मंत्रिमंडळे बनविण्याविषयी मी जे पत्रक काढले, त्याचा उपयोग अपेक्षेप्रमाणे झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत संयुक्त मंत्रिमंडळे बनविण्याविषयी मी कधीच फारसा उत्सुक नव्हतो. युद्धकाळात सत्तेचे केंद्रीकरण झालेले सरकारला अत्यंत सोयीस्कर असल्याने प्रत्येक प्रांतात तशी केंद्रीभूत झालेली सत्ता सोडून देण्याची सरकारची इच्छा आहे, असे मला तितकेसे वाटत नाही. पण, संयुक्त मंत्रिमंडळाची कल्पना निघून कित्येक प्रांतांतून या ना त्या प्रमुख गटाने त्या दृष्टीने हालचाली करण्यास प्रारंभ केला. तेव्हा, हिंदुत्वनिष्ठांनाही हात जोडून स्वस्थ बसता येणे शक्यच नव्हते. माझ्या पत्रकामुळे पहिली गोष्ट कोणती साध्य झाली असेल, तर ती ही की, हिंदू-मुस्लीम ऐक्यासंबंधीच्या ‘याल तर तुमच्यासह’ या माझ्या तत्त्वानुसार सहकार्याविषयीच्या किंवा संयुक्त मंत्रिमंडळाविषयीच्या कोणत्याही प्रामाणिक योजनेचे स्वागत करण्यास आणि हिंदू नि अहिंदू अशा सर्व लोकांच्या हातात हात घालून प्रत्यक्ष व्यवहार्य काम करण्यास मी सिद्ध आहे हेही स्पष्ट झाले.


हिंदू अल्पसंख्य प्रांतात मुस्लीम मंत्र्यांनी जर पाकिस्तानचा किंवा स्वयंनिर्णयाचा ठराव संमत करून घेण्याचा प्रयत्न केला, तर सामुदायिक दायित्व झुगारून देऊन तशा प्रस्तावाला विरोध करण्याचा अधिकार हिंदू मंत्र्यांना असलाच पाहिजे, असे मी माझ्या पत्रकात म्हणालो होतो आणि प्रत्यक्ष तसे वागताना सिंधच्या हिंदू सभा मंत्र्यांनी जे धैर्य दाखविले, ह्याविषयी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्याचप्रमाणे संयुक्त मंत्रिमंडळात शिरून हिंदूंचे हित साधेल की नाही हे ठरवण्याचा प्रश्न, माझ्या पत्रकातील मूलभूत हेतू लक्षात घेऊन प्रांतिक हिंदू सभांच्या विवेकबुद्धीवर सोपविण्यात आला होता. सद्हेतूने टीका करणार्‍यांच्या लक्षातही ही गोष्ट आली नाही. निरनिराळ्या प्रांतांतील हिंदूंनी, विशेषतः अल्पसंख्य हिंदूंच्या हिंदू प्रांताच्या परिस्थितीप्रमाणे निरनिराळे धोरण आखले पाहिजे.

उदाहरणार्थ, लीगच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाला आपण खेचून काढू इतके आपले सामर्थ्य असल्याचे बंगाल हिंदू सभेला वाटत आहे, तर सीमाप्रांतातील हिंदू सभा पुढार्‍यांना काँग्रेसशी सहकार्य करून एकत्र निवडणुका लढविणे अधिक श्रेयस्कर वाटते आहे. हिंदूंच्या न्याय्य अधिकारांचे संरक्षण करण्याचे आपले वचन तेथील काँग्रेसवाल्यांनी पाळले तर हिंदू सभा पुढार्‍यांचे वर्तन समर्थनीय नि माझ्या पत्रकाच्या आराखड्यासारखेच आहे. सिंधमध्ये हिंदू सभेने लीग सभा मंत्रिमंडळाला पाठिंबा दिला आहे. कारण, याच मार्गाने हिंदुहित उत्तम प्रकारे साधेल, असे तेथील हिंदू सभा पुढार्‍यांना वाटते. तेव्हा महासभेचे धोरण गोंधळ उत्पन्न करणारे, विसंगतिपूर्ण नि प्रांताप्रांतातून परस्परविरोधी आहे असा कांगावा करणार्‍या लोकांची दृष्टीच दूषित झाली आहे. हिंदुहिताच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले म्हणजे ते पूर्ण सुसंगत नि सुसंबद्ध असल्याचे दिसून येते.”

येथे सावरकरांनी जेथे आवश्यक असेल, किंबहुना त्या त्या स्थानच्या हिंदू मंत्र्यांना तेथील परिस्थिती लक्षात घेऊन हिंदुहिताचे वाटेल तेथेच लीगसोबत जाण्यास सांगितले आहे, ही बाब ध्यानात घेण्यासारखी आहे. त्याच्याच पुढे पाकिस्तानच्या मागणीबाबत आणि फाळणीच्या योजनेस मान्यता देण्याबाबत सावरकर म्हणतात: “हिंदू बहुसंख्य प्रांतापुरते पाहिले तर माझ्या पत्रकात जे धोरण आखून देण्यात आले आहे, त्यामुळे पाकिस्तानचा प्रश्न निघण्याची गोष्ट अशक्य कोटीतील झाली आहे. पाकिस्तानचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या कक्षेबाहेरचा आहे. या अटींवर संयुक्त मंत्रिमंडळ बनविण्याचे प्रयत्न व्हावे, असे या पत्रकात सांगितले होते. हिंदू संघटनांनी संयुक्त मंत्रिमंडळे बनविण्याचे प्रयत्न चालू असल्याचे पाहून मंत्रिमंडळे करण्या-मोडण्याचा आपला एकाधिकार आपल्या हातातून निसटणार म्हणून त्यांचे (काँग्रेसचे) धाबे दणाणले आहे. त्यामुळे काँग्रेसवाल्या वृत्तपत्रांनी माझ्या विरोधात काहूर उठवले. कोणत्याही स्वरूपात पाकिस्तानच्या योजनेला मान्यता द्यायची नाही, असा आदेश मी माझ्या पत्रकात स्पष्टपणे दिलेला असतानाही पाकिस्तानानुकूल असल्याचा आरोप काँग्रेसपत्रांनी माझ्यावर केला.”

यामध्ये सावरकरांनी सार्‍या आक्षेपाचे सविस्तर निराकरण केले आहे. हिंदू महासभेने सत्तेच्या लालसेपोटी युती केली नव्हती, याचे अजून एक उदाहरण म्हणजे १० मे १९४४ रोजी सावरकरांनी काढलेले पत्रक. यात ते म्हणतात: “आज सिंध किंवा सीमाप्रांतात जे हिंदू मंत्री लीगच्या मंत्र्यांशी सहकार्य करीत आहेत, त्यांनी लीगच्या ध्येयधोरणांना पाठिंबा दिलेला नाही, तर केवळ हिंदू-शीख यांच्या हितरक्षणार्थ ते त्या मंत्रिमंडळात गेले आहेत. त्याचप्रमाणे पंजाबातही जर हिंदू नि शीख युती पक्की राहिली तर ती मातृभूमीच्या विच्छेदनाची जिनांची स्वप्ने हाणून पाडून अखंड भारताचे स्वातंत्र्य संपादन नि रक्षण करण्यास समर्थ ठरेल.”
याच धोरणानुसार सिंध मंत्रिमंडळात मुस्लीम लीगने पाकिस्तान निर्मितीच्या संमत केलेल्या ठरावास महासभेने विरोध केला होता व यासंबंधीही सावरकरांनी १० मार्च १९४३ ला पत्रक काढले होते. सावरकरांनी सर्व एकराष्ट्रीय होऊन मुस्लीमबहुल प्रांतातही काम करू शकतो, हे दाखविले आणि फाळणी निश्चित झाल्यावर तेथील हिंदू महासभेने पंजाब आणि बंगालच्या फाळणीची मागणी केली आणि फाळणीची फाळणी होऊन अर्धा पंजाब आणि अर्धा बंगाल भारतात समाविष्ट झाला. इतकेच काय, तर सावरकरांनी आर्य समाज, सनातनी, आंबेडकरांचा स्वतंत्र श्रमिक पक्ष, उदारमतवादी पक्ष आदींशीही सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती, तेव्हा, सावरकरांचा फक्त मुस्लीम लीगलाच पाठिंबा होता, हा आरोप फोल आहे. उपरोक्त सगळ्या गोष्टींचा विचार केला असतां, केले जाणार्‍या आरोपांतील फोलपणा ध्यानात येईल.अर्थात, इतके सगळे समजून घेऊनही सावरकरांच्या विरोधकांनी वृथा टीका थांबविली नाही, तर त्यांचे विचार आणि कृती यांतील वदतोव्याघात ध्यानात येऊन जनतेच्या मनातून ते उतरतीलच, मात्र सावरकर त्याच तेजाने उत्तरोत्तर मध्यान्हीच्या भास्करासारखे जनमानसात तळपत राहतील, यात संदेह नाही.

- हर्ष जोशी


(संदर्भ: स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)
@@AUTHORINFO_V1@@