सावरकर आणि रासबिहारी बोस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Veer savarkar and bose_1&



आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३८व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या शिक्षामाफी संबंधी निवेदनांवरून केल्या जाणार्‍या आरोपांचे खंडन करण्याचे योजिले आहे. पण, जरा वेगळ्या मार्गाने. जपान मार्गे सावरकर.




सावरकर कुटुंबाने स्वातंत्र्य वेदीवर त्यांचा तत्कालीन वर्तमान कर्तव्य म्हणून हां हां म्हणता स्वाहा केला. पण, स्वातंत्र्यानंतरही त्यांचं भवितव्य त्या आहुतीचं फलित देणारच नाही, असा नियतीचा कठोर मानस आहे का, असा विदारक प्रश्न पडतो, जेव्हा आजचं रसातळाला गेलेलं राजकारण आणि त्यांच्यावर अनाहत केलेली चिखलफेक दृष्टीस पडते. संपूर्ण विपक्ष आणि त्यांचं प्रचारतंत्र ज्या खालच्या थराला उतरून आज सावरकरांवर दातओठ खातात, अखंड अपप्रचार करतात, त्यांना याची चाड आहे का की आपण किती हानिकारक पायंडे पाडतोय? त्यांच्यावर होणार्‍या गलिच्छ आरोपांचं खंडन अनेकानेक अभ्यासकांनी आजवर केले आहे. पण, ‘अजेंडा उंचा रहे हमारा’चा तोरा मिरवणार्‍यांना याचं उत्तरं नकोच. यांना फक्त नवनवीन निराधार प्रश्न उपस्थित करायचे आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३८व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या शिक्षामाफी संबंधी निवेदनांवरून केल्या जाणार्‍या आरोपांचे खंडन करण्याचे योजिले आहे. पण, जरा वेगळ्या मार्गाने. जपान मार्गे सावरकर.






विषयप्रवेश आपण रासबिहारी बोस यांच्यापासून करूया. रासबिहारी बोस यांच्या तारुण्यात, बंगाल प्रांतात क्रांतिकारक चळवळींची गळचेपी करण्यात इंग्रज सरकारला मोठे यश प्राप्त झाले होते. म्हणून या तरण्या, महत्त्वाकांक्षी व होतकरू क्रांतिकारकाने बंगाल बाहेरचा मुलुख, संयुक्त प्रांत (तत्कालीन उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड) आणि पंजाब आपली कर्मभूमी म्हणून निवडला. पुढे रवींद्रनाथ ठाकूर यांचे नातलग म्हणून गुप्त ओळख दाखवून १९१५ साली जपान गाठला. तिथे २५ वर्षांचा काळ ब्रिटिश गुप्तहेरांपासून नजर चुकवत अनेक राहण्याची ठिकाणे बदलत काढला. पुढे १९४२ सालच्या पूर्वार्धात टोकियो आणि बँकॉक येथे अनेक समविचारी भारतीयांना एकत्र करून ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली. १९४२च्या उत्तरार्धात जपानी सरकारच्या साहाय्याने ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’चे रूपांतर ‘आझाद हिंद सेने’त घडवून आणले आणि त्याचे नेतृत्व नेताजी सुभाष बाबूंना सोपविले. अशा धुरंधर रासबिहारींची १३५वी जयंती तीन दिवसांपूर्वीच म्हणजे २५ मे रोजी झाली, हे सांगणे येथे प्रासंगिक ठरेल.



सावरकरांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर लिखित साहित्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रासबिहारी बोस या दोहोंमध्ये होणार्‍या पत्रव्यवहाराविषयी बरेच उल्लेख आढळतात. हा पत्रव्यवहार सावरकर हिंदू महासभेचे अखिल भारतीय अध्यक्ष असतानाच्या काळात सुरु झाला. या काळात रासबिहारी बोस ‘हिंदू महासभे’च्या जपान शाखेचे अध्यक्ष होते. पण, हा वार्तालाप सुरु होण्यापूर्वीची एक घटना, ज्या वेळी सावरकर ‘हिंदू महासभे’चे सभासदही व्हावयाचे होते, त्याबद्दल आपण आज बोलूया.


सावरकरांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून विनाअट सुटका झाली ती जून १९३७ साली. या घटनेचे औचित्य साधून रासबिहारी बोस यांनी एका जपानी नियतकालिक/वर्तमानपत्रात सावरकर यांची सुटका झाल्याची वार्ता वर्तविणारा आणि त्याबद्दल आनंद व अभिनंदन व्यक्त करणारा एक लेख प्रकाशित करून आणला होता. त्या लेखाचे चित्र संलग्न आहे. हे चित्र मला सावरकर अभ्यासक आणि वक्ते अक्षय जोग यांच्या सौजन्याने प्राप्त झाले होते. त्यावेळी या चित्रांमध्ये नेमकं काय आहे, याबद्दल ठाऊक नव्हतं. नेमका यात मजकूर काय याबद्दल उत्सुकतेपोटी जपानी भाषातज्ज्ञ लोकांकडे मी धाव घेतली. हे काम सोपे नव्हते. प्रस्तुत लेखातल्या जपानी कांजी जुन्या आहेत आणि भाषांतर करायला कठीण आहेत, असा अभिप्राय बर्‍याच जणांकडून आला. तरी भरपूर प्रयत्नांचे फलित म्हणून शेवटी मार्ग मिळाला. ठाणे येथील रहिवासी शलाका मनोहर यांच्या सौजन्याने व अथक प्रयत्नांमुळे मला या लेखाचे भाषांतर करून मिळाले.
रासबिहारी बोस यांनी त्यांच्या लेखात सावरकरांची अखेर ’सुटका’ झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल, क्रांतिकार्याबद्दल आणि त्यागाबद्दल आदरयुक्त गौरवोद्गार व्यक्त केले आहेत. सावरकरांचे बालपण, क्रांतिप्रेरणा चापेकर बंधू, मित्रमेळा, अभिनव भारत, टिळकांशी जवळीक, इंग्लंडमधले क्रांतिकार्य, अटक आणि शिक्षा अशा स्वरूपाचे लघुचरित्र या लेखात आपणास आढळतं. पुढे बोस यांनी सावरकरांच्या सुटकेबद्दल संपूर्ण भारतातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या अभिनंदनपर संदेशांचे उतारे नमूद केले. त्यांचे मराठी भाषांतर मी पुढे देत आहे:



चक्रवर्ती राजगोपालाचारी, तत्कालीन कॅबिनेट मंत्री, मद्रास प्रेसिडेन्सी, काँग्रेसचे नेते: 
सावरकरांची ऊर्जा आणि त्यांचे संघटनात्मक सामर्थ्य विसरून चालणार नाही. त्यांनी आयुष्यभर कठोर संघर्ष करून स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली आहे. सावरकर म्हणजे शौर्य, धैर्य, साहस आणि राष्ट्रप्रेमरूपी दैवी अवतार आहेत. पुढे श्री राजगोपालाचारी यांनी सावरकरांच्या मार्सेलिस उडीबद्दल त्यांचे तोंडभरुन कौतुक केले व त्यांच्या ‘सुटके’बद्दल अभिनंदनकर्ते झाले.


मानवेंद्र नाथ रॉय, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संयुक्त संस्थापक

सावरकर हे विसाव्या शतकातील असे निवडक आघाडीचे नेते आहेत, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आयुष्य वेचले आहे. आमच्यात परस्पर राजकीय मतभिन्नता आहे, पण त्यांची राष्ट्रभक्ती आणि त्याग आदरणीयच आहे. पुढे त्यांनी सावरकरांना ‘सुटके’बद्दल शुभेच्छा दिल्या.


मुकुंद रामराव जयकर, तत्कालीन भारतीय संघराज्य न्यायालयाचे न्यायाधीश

सावरकरांची स्तुती म्हणजे त्याग आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेचीच स्तुती होय. इतकेच नव्हे तर सावरकर सहनशक्ती आणि साहस यांचे मूर्तिमंत अवतार आहेत.

आता एक अत्यंत महत्त्वाचा संदेश



सुभाषचंद्र बसू, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, काँग्रेस


ही अतिशय आनंदाची बाब आहे की, श्री सावरकांची अखेर ’सुटका’ झाली आहे. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. मी आशा करतो की, ते काँग्रेसमध्ये सामील होऊन स्वातंत्र्य लढ्याला बळकट करण्यास मदत करतील. सावरकरांनी काँग्रेसशी आपले वैचारिक मतभेद हे स्थाबद्धतेत असतानासुद्धा कधीच हातचे राखून ठेवले नव्हते. त्यांनी गांधींच्या धोरणांवर वेळोवेळी टीका केली होती. तरी सुभाषबाबू अशा व्यक्तीस काँग्रेस पक्षात आमंत्रण देते झाले. अशी व्यक्ती जिच्याबद्दल आज तिरस्काराचे अवडंबर माजवले आहे की, ते माफी मागून सुटले. एवढेच नव्हे, तर आजच्या काळात ‘माफीपत्र’ या वरून थेट सावरकरांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल वेडेवाकडे प्रश्न उभे का केले जातात? आलोचकांनो, तुम्हाला जे संशय आज येतात आणि जे गलिच्छ निष्कर्ष तुम्ही काढता, तसले निष्कर्ष तत्कालीन कुठल्याही राष्ट्रीय नेत्यानेदेखील काढले नवह्ते. उलटपक्षी वैचारिक मतभेद असलेले नामवंत पुढारीदेखील सावरकरांच्या राष्ट्रकार्याबद्दल आणि राष्ट्रप्रेमाबद्दल त्यांचा आदर करीत असत. आरोपांचा बाजार हा आज होत आहे, हेतुपुरस्सर आणि निंदनीय.

‘माफीपत्र’ आरोप किती व्यर्थ, निराधार आणि त्यापुढे जाऊन ‘आकसयुक्त’ आहेत, हे अनेक सावरकर अभ्यासकांनी यापूर्वी सिद्ध केले आहेच. मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून हा विषय मांडू पाहतो आहे. वरील सर्वपक्षीय नेत्यांनी सावरकरांचे ‘सुटके’साठी अभिनंदन केले आहे. याचाच अर्थ ते त्यापूर्वी बंदिवासी होते. स्थानबद्धतेत. शिक्षामाफीचे अंदमानातून शेवटचे निवेदन १९२० सालचे आणि सुटका १९३७ साली? याचा अर्थ ‘सावरकर माफी मागून सुटले’ असा होतो का? वास्तव हे आहे की, सावरकरांचे अंदमानहून फक्त स्थलांतर झाले १९२१ साली. ते पुढे अलीपूर तुरुंगात गजाआड होते. तिथून त्यांना रत्नागिरी तुरुंगात डांबले गेले. या दोन्ही तुरुंगात त्यांचे अतोनात हाल झाल्याचेच उल्लेख आहेत. या पुढे १९२४ साली त्यांना तुरुंगाबाहेर आणून स्थानबद्धतेत ठेवण्यात आले, पुढील पाच वर्षांकरिता. हा कालावधी १९२९ साली आणि १९३४ साली दोन वेळा पाच-पाच वर्षांकरिता वाढवण्यात आला आणि शेवटी १९३७ साली त्यांची सुटका झाली.

१९१० साली अटक झालेल्या सावरकरांना १९३७ सालापर्यंत बंदिवास भोगावा लागला. त्यांच्या शिक्षामाफीच्या निवेदनांना इंग्रज सरकार एका वकिली डोक्याचा युक्तिवाद याखेरीज कवडीचीही किंमत देत नसे. गंमत म्हणजे, आलोचक फक्त माफीची निवेदने दाखवतात, इंग्रज सरकारची त्याला आलेली उत्तरे दाखवीतच नाहीत. तसे केल्यास आरोपांमधला फोलपणा उघड होण्याचा संभव आहे. हा सगळा निवेदन आणि उत्तरांचा पत्रव्यवहार आपणास ‘Source Material for History of Freedom Movement in India Vol II' मध्ये मिळेल. इच्छुक अभ्यासकांनी जरूर वाचून आपला स्वतःचा कयास लावा.

गंमत म्हणजे, सावरकरांनी जे जे निवेदनात मांडले, त्यावर इंग्रज सरकारचा यत्किंचितही विश्वास नव्हता. तत्कालीन भारतीय राजकीय वर्तुळात त्यांची कोणीही वल्गना केली नाही आणि आजच्या आलोचकांना त्या पत्रांमधील सावरकरांनी दिलेल्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास आहे? बरं पुढील गंमत म्हणजे, आलोचकांचा त्या पत्रातील काही मजकुराव्यतिरिक्त बाकी कुठल्याच सावरकर साहित्यावर विश्वास नाही. किती सोयीस्कर नाही का? यावरूनच चिखलफेक करणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरी अधोरेखित होते.

ज्या आरोपांतर्गत सावरकरांना तब्बल पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, त्या अर्थी सावरकरांना इंग्रज सरकार किती धोकादायक समजायचे हे लक्षात येतं. संपूर्ण जगावर राज्य करणारे इंग्रज सरकार, अशा सावरकरांना निवेदनांवर सोडायला खुळे होते की बाळबोध? अंदमानहून स्थलांतर झाल्यावरही ज्यांना इंग्रज सरकारने तब्बल १६ वर्षे बंदिस्त ठेवले, त्यांची सुटका केली नाही, याचाच अर्थ सावरकरांबद्दल किती धास्ती इंग्रज बाळगून होते, हे ध्यानात येते. ‘सावरकर’ नावाचे वादळ आटोक्यात ठेवता ठेवता इंग्रज सरकारच्या नाकी नऊ आलेत हेच यावरून सिद्ध होते. ‘विनायक दामोदर सावरकर’ नावाचा आपल्याकडे एक झंझावात होऊन गेला, हे नि:संदेह मान्य करावेच लागेल.
- अमेय रानडे


@@AUTHORINFO_V1@@