‘चले जाव ’? (भारत सोडा) चळवळीला सावरकरांचा विरोध का होता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |


savarkar_1  H x



१९४२च्या ‘चले जाव’ चळवळीला स्वा. सावरकरांनी विरोध केला अथवा पाठिंबा दिला नाही, हा आरोप त्यांच्यावर केला जातो. सावरकरांनी या चळवळीला विरोध करण्याची कारणे समजावून घेण्यासाठी १९४२ची ‘चले जाव’ ही चळवळ नक्की काय होती? तिचे स्वरूप कसे व किती प्रभावी होते, ही पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे.


‘चले जाव चळवळ’


मुंबईत दि. ७ ऑगस्ट, १९४२ रोजी मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे खुले अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्टला ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला व या चळवळीस सुरुवात झाली. ठराव मंजूर होताना गांधीजींनी मुख्य भाषण हिंदीतून व समारोपाचे भाषण इंग्लिशमधून केले. महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ व ‘करो या मरो’ हा नारा दिला व या चळवळीची सुरुवात झाली. दुसर्‍याच दिवशी गांधी, नेहरू, आझाद, पटेल यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांना अटक करून गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये व नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगर किल्ल्याच्या तुरुंगात टाकले. त्यांच्या भाषणातील मसुदा वृत्तपत्रात छापायला ब्रिटिश सरकारने बंदी घातली. त्यामुळे देशातील बहुसंख्य लोकांपर्यंत हे भाषण पोहोचलेच नाही व आंदोलनाची नेमकी दिशाही उमगली नाही. त्यात गांधीजींनी दिलेला ‘आता प्रत्येकजण पुढारी होईल’ हा संदेश मिळाल्याने व नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन जनतेने आपल्या हातात घेतले. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो अंमलात आणत होता. देशभर मोर्चे, हरताळ, मिरवणुका सुरु होत्या. ब्रिटिशांनी जमावबंदी करूनही लोकांनी त्यांना न जुमानता सरकारी कार्यालय जाळणे, सरकारी खजिना लुटणे, तारयंत्रणा बंद पाडणे हे प्रकार चालू केले, काही ठिकाणी पोलिसांचे खूनही झाले. त्यामुळे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने दडपशाही अवलंबली व जवळपास देशभर अस्थिर वातावरण तयार झाले.


सावरकरांचा चळवळीला विरोध का होता?


सावरकरांचा ‘चले जाव’ चळवळीला विरोध होता, हेच मुळात बेजबाबदार विधान ठरेल. कारण, २ ऑगस्ट १९४२ ला सावरकरांनी शानिवारवाड्यासमोरच्या भाषणात हिंदू महासभेच्या तीन मागण्या मांडल्या होत्या.


) ब्रिटिशांनी हिंदुस्तान सोडावा, पण आपले सैन्य मात्र मागे ठेवावे, या गांधींच्या विधानाचा नेमका अर्थ काय? हा खुलासा करावा.


) ब्रिटिश आणि काँग्रेस यांच्यात तडजोड झाली तर त्यातून हिंदुस्तानच्या अखंडत्वाला बाधा येणार नाही, असे वचन काँग्रेसने द्यावे.


) वरील तडजोड झालीच, तर हिंदुस्तानच्या राज्यघटनेत मुस्लिमांना अधिक अधिकार देण्यात येऊ नये.


या मागण्या काँग्रेस मान्य करत असेल तर हिंदू महासभा काँग्रेसच्या या चळवळीत बरोबरीने सहभागी होणार होती. म्हणजेच चळवळीला विरोध न करता सशर्त पाठिंबा देण्यास सावरकर अनुकूल होते. सावरकरांच्या मागण्या रास्त होत्या. कारण, ब्रिटिशांनी सैन्याच्या जोरावर हिंदुस्तानवर राज्य केले ते सैन्य इथेच ठेवून त्यांनी जावे, हे सांगणे अव्यावहारिक होते. शिवाय हिंदुस्तानचे अखंडत्व जपणे हा सावरकरांना महत्त्वाचा मुद्दा वाटला नसता तरच नवल. कारण, तोवर मुस्लीम लीगच्या राजकारणाची दिशा बदलत होती. मुस्लिमांना अधिक अधिकार देण्यात येऊ नये, या विधानाचा विपर्यास केला जातो. सावरकर मुस्लिमांना अधिकार देऊ नयेत, असे कधीही म्हणाले नाहीत. ‘अधिकचे अधिकार देण्यात येऊ नये, जे अधिकार सर्वांना तेच मुस्लिमांनाही असावेत,’ हा सरळ अर्थ त्यातून ध्वनित होतो आणि तो तसाच घेतला तर या मागणीत चुकीचे काही नव्हते. पण, काँग्रेसने सावरकरांना किंवा हिंदू महासभेच्या नेत्यांना भेटून किमान सहमतीचा मसुदा ठरवण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही. म्हणजेच सावरकरांची सशर्त पाठिंबा देण्याची तयारी असतानाही त्यासाठी काँग्रेसकडून कसलीच हालचाल झाली नाही. मात्र, हीच काँग्रेस मुस्लीम लीगसोबत सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी तयार होती. खाली दिलेल्या गांधींच्या पत्रात त्यांनी हेदेखील नमूद केले की, ब्रिटिशांनी सर्व कारभार जरी मुस्लीम लीगच्या हाती दिला तरी त्यांची याला काही हरकत नसेल व अशा सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागीही होईल..!


"Provided the Muslim League co-operated fully with the Congress demand for immediate independence without the slightest reservation, subject, of course, to the provision that independent India will permit the operations of the Allied armies in order to check Axis aggression and thus to help both China and Russia, the Congress will have no objection to the British Government transferring all the powers it today exercises to the Muslim League on behalf of the whole of India, including the so-called Indian India. And the Congress will not only not obstruct any Government that the Muslim League may form on behalf of the people, but will even join the Government in running the machinery of the free State.'' (CWMG VOL. 83: 7 JUNE, 1942 - 26 JANUARY, 1944 187)


काँग्रेसने जनतेच्या पाठिंब्यासोबतच सैन्याचाही पाठिंबा मिळावा, अशी कोणतीही योजना आखली नवहती, फक्त जनतेच्या उठावामुळे ब्रिटिश सरकारवर दबाव येईल, असे सावरकारांना वाटत नव्हते. पुढे आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन ज्यावेळी नौदलाने उठाव केला आणि ब्रिटिशांना जाणीव झाली की केवळ सैन्यावर भिस्त ठेवून आपण भारतावर अजून जास्त सत्ता गाजवू शकत नाही, त्यावेळेस सावरकरांचे हे मत खरे ठरले.

सावरकरांप्रमाणे चळवळीला अजून कुणाचा विरोध होता का?


‘चले जाव’ या आंदोलनाला केवळ सावरकर किंवा हिंदू महासभेनेच विरोध केला असे नाही. जर ब्रिटिशांनी आहे त्या स्थितीत भारतात सोडला (जे अशक्य होते.) तर मुस्लीम लीगला त्यात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही म्हणून मुस्लीम लीगने ‘चले जाव’ला विरोध केला होता. त्याकाळात कम्युनिस्ट पक्षावर बंदी असल्याने त्यांनी बंदी उठवण्याच्या मोबदल्यात ब्रिटिशांना पाठिंबा दिला, म्हणजेच तेही ‘चले जाव’च्या विरोधात होते. शिवाय अनेक संस्थानांनी या काळात ब्रिटिशांना आर्थिक मदत दिली असल्याने त्यांनीही या चळवळीला विरोध केला.

ब्रिटिशांनी काँग्रेस नेत्यांना अटकेत टाकल्यानंतर सावरकरांची भूमिका


काँग्रेस नेत्यांना अटक झाल्यावर दि. १४ ऑगस्ट रोजी सावरकरांनी पत्रक काढून त्यातून आपली भूमिका मांडून सरकारी दडपशाहीचा निषेध केला.


"The inevitable has happened; the foremost and patriotic leaders of the Congress Party, including Mr. Gandhi, are arrested and imprisoned; the personal sympathies of the Hindu Mahasabhaites, and Hindus in general, go with them in their suffering for a patriotic cause. I warn Government once again that the only effective way to begin with, to appease the Indian discontent, cannot but be an unequivocal declaration by the British Parliament to the effect that India is granted a political status of a completely free and equal partner in the Indo-British Commonwealth equal to that of Great Britain herself and this should be immediately met by investing India with actual political power as envisaged in the above declaration.'' (Historic statements by Savarkar)


म्हणजेच काँग्रेस व हिंदू सभेत मतभिन्नता असूनही सावरकरांनी काँग्रेस नेत्यांविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. पुढे ९ सप्टेंबरला सावरकरांनी काढलेल्या पत्रकात भारतीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठीचे प्रयत्न दिसतात.


"I earnestly appeal to all patriotic parties and all prominent leaders in India to join hands with Dr. Shyama Prasad Mookerji, the Working President of the All-India-Hindu Mahasabha and members of the sub-committee who are exerting themselves to bring about an agreement as regards the demand we should place before the Government, on behalf of India.''


नंतर हिंदू महासभेने ७ ऑक्टोबरला ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलला तारेद्वारे काही मूलभूत मागण्या कळवल्या.


) ब्रिटिश संसदेने भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी.
) युद्धकाळापुरते राष्ट्रीय संयुक्त मंत्रिमंडळ नेमावे.
) अन्य घटनात्मक व वादाचे मुद्दे युद्धानंतर सर्वपक्षीय परिषदेने ठरवावे.
या मागण्यांना शीख समाज, मोमीन आणि आझाद मुस्लीम परिषद तसेच अन्य मुस्लीम समाज, ख्रिश्चन समाज, लिबरल फेडरेशन, ओडिशाचे हिंदू मुख्यमंत्री, सिंध नि बंगालचे मुस्लीम मुख्यमंत्री, उदारमतवादी पक्षाचे पुढारी आणि अनेक विचारवंतानी पाठिंबा दिला होता. या सर्व बाबी पाहिल्या तर अगदी सहज काढण्याजोगे खालील निष्कर्ष निघतात.


) सावरकरांनी ‘चले जाव’ला सुरुवातीपासून विरोध न करता सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली, मात्र काँग्रेसने त्याचा विचार केला नाही.


) वेळोवेळी काँग्रेस नेत्यांच्या समर्थनार्थ सावरकरांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीचा विरोध केला होता.


) सावरकरांनी स्वतः याकाळात लढा उभारण्यासाठी प्रयत्न केले व ते अनेकांनी मान्यता दिलेले असल्याने व्यापक स्वरुपात असल्याचे म्हणता येते.

संदर्भ –


) स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय कीर
) Collective works of Mahatma Gandhi - Volume ८२, ८३.
) Historic statements by Savarkar - savarkar.org
) स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०
 

- सागर कुलकर्णी

 
@@AUTHORINFO_V1@@