सावरकर निर्वाह भत्ता : वाद-प्रतिवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
manasi magare_1 &nbs


सावरकरांच्या निर्वाह भत्त्याविषयी माहिती घ्यायची असेल, तर त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यावर प्रकाश टाकावा लागेल. रत्नागिरीत वास्तव्याला असताना सावरकरांची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांनी ब्रिटिशांकडे निर्वाह भत्ता का मागितला, या प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे.


हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा इतिहास अधोरेखित करत असताना त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अढळ स्थान द्यावे लागेल. विसाव्या शतकातील राजकीय-सामाजिक घडोमोडींचा ऊहापोह करतानादेखील सावरकरांचे या क्षेत्रांतील योगदान अभ्यासावे लागेल. त्या वेळेच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांनी आपला विचार देशापुढे ठेवला, त्यामुळे त्याला फारसे बळ मिळाले नाही. उलट अनेक अर्थाने त्यांच्यावर उठणारी बोटे मात्र तयार झाली. परकीय सत्ता असलेल्या सरकारने क्रांतिकारी कारवायांसाठी सावरकरांचा विरोध करणे, त्यांच्यावर आक्षेप घेणे हे साहजिक होते. मात्र, स्वतंत्र भारताच्या राजकारण्यांनीही केवळ वैयक्तिक द्वेषापोटी सावरकरांना यातना दिल्या. परंतु, या सगळ्याला पुरून उरले नसते तर ते सावरकर कसले...!!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एकूणच जीवन आणि त्यानुसार घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व हे संमिश्र स्वरुपाचे आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या एखाद्या भूमिकेबद्दल समाजमनात-जनमानसात मतभिन्नता असू शकते. बर्‍याचदा त्यांची विचारशक्ती आणि आपली आकलन शक्ती यातही भेद असू शकतो, ज्यातून मतभिन्नता निर्माण होऊ शकते. एखाद्या महापुरुषाचे विचार समजून घेताना, त्या वेळेसची परिस्थिती, सामाजिक-राजकीय अवस्था आणि समाजमन या गोष्टींचे भान ठेवून ते समजून घेणे आवश्यक असते. त्याला चालू वर्तमानाच्या फूटपट्ट्या लावणे उचित ठरणारे नाही. परंतु, हाच बाळबोधपणा करत आजही आपल्याच देशवासीयांपैकी अनेकजण सावरकरांच्या कित्येक विचारांवर तथा भूमिकांवर आक्षेप घेताना दिसतात. खरेतर सावरकरांच्या लेखनातील शब्दयोजना अत्यंत स्पष्ट आणि काटेकोर आहे. परंतु, त्यांना काय म्हणायचे आहे, हे लक्षात घेऊन अथवा ते गुण अंगी बाणवून ते लिखाण वाचले गेले, तर त्याला आपण न्याय देत आहोत, असे म्हणता येईल. कित्येकांच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही.

सावरकरांची अंदमानातील शिक्षा आणि त्याच्या जवळपासचा काळ यादरम्यान घडलेल्या घटनांवर बहुतांश आक्षेप नोंदवले गेल्याचे दिसून येते. अंदमानातील शिक्षा भोगत असताना सावरकरांनी स्वतःच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न, त्यामागची त्यांची भूमिका आणि देशाच्या कामी येण्यासाठीची त्यांची धडपड यांतही अनेकदा गैरसमजांचे इमले रचून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसते. मागील २५ वर्षांत तर समाजातील तथाकथित निवडक पुरोगामी मंडळींनी सावरकरनिंदेचे बीज रोवून ते रोपटे डोक्यावर घेऊन मिरवण्याचे आणि इतरांनाही त्या छायेखाली घेण्याचे अभियान अगदी नियोजनपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक चालवले असल्याचे लक्षात येते. यामध्ये त्यांच्या वर्मी लागलेली बाब म्हणजे, ‘सावरकरांचे हिंदुत्व.’ देशाच्या केंद्रस्थानी आलेले हिंदुत्व हेदेखील गेल्या काही वर्षांत सावरकरांच्या विरोधात वाढ झाली असल्याचे प्रमुख कारण म्हणावे लागेल. सावरकरांनी नेहमीच राष्ट्रहिताचे, लोकहिताचे विचार मांडले, त्यामुळेच कदाचित ते टीकेचे धनी झाले. गैरसमज, अज्ञान, राजकीय आकस, द्वेष अशा अनेक कारणांनी सावरकरांवर वेळोवेळी टीका झाली आहे, अनेक आक्षेप नोंदवले गेले आहेत. अज्ञानामुळे अथवा हेतुपुरस्सर घेतलेल्या आक्षेपांमुळे समाजाला भ्रमित करण्याचे कामही वेळोवेळी करण्यात आले आहे. यापैकीच एक सर्वसाधारणपणे नोंदवला जाणारा आक्षेप म्हणजे सावरकरांना त्या काळात मिळणारा निर्वाह भत्ता.

सावरकरांच्या निर्वाह भत्त्याविषयी माहिती घ्यायची असेल, तर त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यावर प्रकाश टाकावा लागेल. रत्नागिरीत वास्तव्याला असताना सावरकरांची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांनी ब्रिटिशांकडे निर्वाह भत्ता का मागितला, या प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. त्यावेळी रत्नागिरीला सावरकरांच्या घरात त्यांच्या पत्नी माई, कन्या प्रभात व मुलगा विश्वास अशी दोन मुले आणि मदतीसाठी दोन नोकर एवढी माणसे होती. दरमहा १५ रुपये असलेल्या घरभाड्यासहित कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी एकूण अंदाजे १०० रुपये खर्च येत होता. परंतु, ‘बॅरिस्टर’, ‘बीए’ अशा पदव्या कमावलेल्या असूनही सावरकर हतबल होते. कारण, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ब्रिटिश सरकारतर्फे त्यांना ‘बॅरिस्टर’ची पदवी नाकारण्यात आली होती. त्यामुळे वकिली करण्यास त्यांना परवानगी नव्हती. शिवाय मुंबई विद्यापीठानेही त्यांची ‘बीए’ची पदवी काढून घेतली होती. त्यामुळे ते इतर कोणती नोकरीही करू शकत नव्हते. त्यावेळच्या रत्नागिरीसारख्या दुर्गम परिसरात एखादा व्यवसाय अथवा खासगी नोकरी करणेही त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत चरितार्थ चालवणे हा त्यांच्यासमोर एक यक्षप्रश्न होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर व बंधू बाबाराव यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. शिवाय तिन्ही बंधूंच्या मालकीची भगूर येथे असलेली मालमत्ताही गहाण पडून होती. अशा परिस्थितीत त्यांचे सासरे रामचंद्र त्र्यंबक तथा भाऊराव चिपळूणकर यांचाच त्यांना आधार होता. परंतु, सावरकरांमुळे भाऊरावांनाही जव्हार संस्थानच्या अधिकारपदावरून बडतर्फ करण्यात आले होते. शिवाय त्यांची मिळकतही जप्त करण्यात आली होती. त्यामुळे तेदेखील सावरकरांना आधार देऊ शकणार नव्हते. सावरकरांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून निर्मिलेले आत्मवृत्त व नाटक लिहून प्रसिद्ध केले होते, त्याचाच काय तो मिळणारा तुटपुंजा नफा त्यांना त्या वेळी कामी आला. नटवर्य चिंतामण कोल्हटकर व गायक-नट दीनानाथ मंगेशकर यांनी १९२९ मध्ये आपल्या बलवंत नाटक मंडळी संस्थेंतर्गत सावरकरांकडून ‘संन्यस्त खड्.ग’ हे नाटक लिहून घेतले होते, त्याचे एक हजार रुपये त्यांनी आधीच सावरकरांना दिले होते. त्याचाही सावरकरांना आधार झाला. त्यांच्या या सर्व आर्थिक स्थितीची नोंद ब्रिटिश अधिकार्‍यांनीच लिहून ठेवल्याचे सापडते. सावरकरांवर कोणतेही कर्ज नव्हते, हेदेखील त्या नोंदीत लिहिलेले आहे.

सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर हे दंतवैद्य होते. त्या वेळी दरमहा २५० रुपये इतकी त्यांची मिळकत होती. १९२४ला कारावासातून सावरकरांची मुक्तता झाल्यानंतर नारायणरावच स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबाचे पालनकर्ते झाले होते. नारायणरावांनाही त्यांचा संसार असल्याने दोन कुटुंबांचा भार त्यांनी एकट्याने उचलावा, हे सावरकरांना योग्य वाटले नाही. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीनुसार १९२९ ला ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्थानबद्धतेच्या निर्बंधात आणखी दोन वर्षांची वाढ केली. दुष्टचक्र संपत नव्हते. आणखी दोन वर्षे पुन्हा बंधूंवर विसंबून राहणे त्यांना पटणारे नव्हते. तेव्हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला निर्वाह भत्ता देण्यात यावा, असा अर्ज सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे केला.

त्यांचा हा अर्ज फेटाळून लावत त्यावर, ‘सावरकरांनी स्वतःहून काही अटी मान्य केल्या आहेत, तेव्हा सावरकरांना हवे असल्यास त्यांनी पुन्हा कारागृहात जावे व उरलेली शिक्षा पूर्ण करावी. त्यांचे अशा प्रकारचे निर्वाह भत्ते मान्य करणे अनिष्ट ठरेल, यावरून ते सामान्य गुन्हेगार नसून राजबंदी आहेत, असे समजले जाईल’, अशी कारणे गृहखात्यातील सचिव हेन्री नाईटने दिली. परंतु, मुंबईचे गव्हर्नर सर फ्रेडरिक साईक्स यांनी, “गृहसचिवांनी सांगितलेल्या कारणांमध्ये जरी तथ्य असले, तरी देशाच्या एका अनोळखी भागात त्यांना ठेवून, त्यांच्या निर्वाहाच्या सर्व वाटा आपण बंद केल्या आहेत, हे ही तितकेच खरे आहे,” असा अभिप्राय दिला आणि सावरकरांच्या आर्थिक स्थितीचा आढावा दिला जावा, असे सुचवले. यानुसार रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी गिलिगन यांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब मांडत, सावरकरांना निर्वाह भत्ता म्हणून दरमहा १५० रुपये दिले जावेत, अशी शिफारस केली. मात्र, ‘७५ रुपये पुरेसे ठरतात’ असे म्हणत नवे सचिव ट्राटमननी त्यात कपात केली व पुढे गव्हर्नर साईक्सने त्यात आणखी कपात करून दरमहा ६० रुपये दिले जावेत, असे सुचवले. त्यानुसार १ ऑगस्ट १९२९ पासून सावरकरांना दरमहा ६० रुपये निर्वाह भत्ता देण्यास सुरुवात केली. पुढे १० मे १९३७ म्हणजे संपूर्ण मुक्तता होईपर्यंत सावरकरांना हा निर्वाह भत्ता दिला जात होता.

आणखी एक महत्त्वाची बाब इथे नोंदवली गेली पाहिजे, ती म्हणजे निर्वाह भत्ता मिळणारे सावरकर हे काही एकमेव क्रांतिकारक नव्हते. १९२८ पासून स्थानबद्ध असलेल्या अनेकांना त्या काळातील ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्थितीनुसार निर्वाह भत्ते दिले होते. याचाच अर्थ ही कृपादृष्टी केवळ सावरकरांवरच होती असे नाही. ‘शत्रूचा दारूगोळा शत्रूलाच पराभूत करण्यासाठी वापरला, तर त्यात जसे काही गैर नाही, तसेच ब्रिटिशांचाच पैसा चरितार्थासाठी वापरून उरलेले पैसे त्यांच्याविरोधातील कारवायांसाठी वापरले, तर त्यातही नक्कीच काही गैर नाही,’ असे सावरकरांना वाटे. यानुसार निर्वाह भत्ता हादेखील आपला एक अधिकारच आहे, असेही त्यांना वाटे.

बंकिमचंद्र चटोपाध्याय, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखी मोठी माणसेही त्या काळात सरकारी नोकरीत होती. तेव्हा ब्रिटिशांकडून पगार, पेन्शन, निर्वाह भत्ता घेतल्यावर यांच्या देशभक्तीकडे जसे कोणीही बोट दाखवले नाही, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचेही आहे. पगार, पेन्शन, निर्वाह भत्ता या बाबींवरून कोणत्याही प्रकारे देशभक्तीचे मूल्यमापन होऊ शकत नाही.


(संदर्भ: स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)

- मानसी मगरे
@@AUTHORINFO_V1@@