सावरकर, गांधीहत्या आणि कपूर आयोग - आक्षेप आणि वास्तव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Adv Prasanna Malshe_1&nbs



गांधीहत्येच्या प्रकरणात सावरकरांवर फक्त संशयित आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि नंतर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हीच खरी वस्तुस्थिती असल्याची जाणीव या संदर्भातील अनेक पुस्तकांचा आणि साहित्याचा विचारपूर्वक अभ्यास केल्यानंतर सातत्याने होत राहते.





काळाच्या सहस्र पावलं पुढे चालणारा आणि काळाशी (मृत्यूशी) सहनशीलतेने, पण तितक्याच निर्धाराने यशस्वी झुंज देणारा ‘मृत्युंजय’ म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वीर सावरकरांच्या साहित्यातून तसेच त्यांच्याविषयी अनेकांनी लिहिलेल्या पुस्तकांतून त्यांच्या प्रखर देशभक्तीची जाणीव आपणास सातत्याने होत राहते.


गांधीहत्येच्या आरोपात सात आरोपींवर न्यायालयात खटला चालला. त्यातल्या प्रमुख आरोपींना म्हणजेच नथुराम विनायक गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी आणि उर्वरित पाच जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली गेली.


गांधीहत्येच्या कटात ‘संशयित आरोपी’ म्हणून हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर यांच्यावरदेखील खटला चालवला गेला होता. या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगलेले गोपाळ गोडसे, जेव्हा १९६४ साली पुण्यात परतले तेव्हा त्यांची तुरुंगातून सुटका झाली. या निमित्ताने पुण्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.


ग. वि. केतकर यांच्या एका वक्तव्यामुळे १६ वर्षांनंतर गांधीहत्येचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. केतकर यांच्या म्हणण्यानुसार, “गांधीहत्येच्या सहा महिने आधीच त्यांना याबाबतची आगावू सूचना मिळालेली होती आणि त्यावेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी. जी. खेर यांना त्यांनी त्वरित याबाबतची संभाव्यता सांगून सतर्कता बाळगण्याचा सल्लाही दिलेला होता.” केतकरांच्या या वक्तव्यानंतर संसदेसहित महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ माजायला सुरुवात झाली. विविध वृत्तपत्रांत सतत वृत्तांकन केले जाऊ लागले की, जर गांधीहत्येचा कट रचला जात असण्याबाबतची पूर्वकल्पना राज्य सरकारला मिळालेली होती, तर सरकारला याबाबतीत विशेष सुरक्षेची अंमलबजावणी करून सतर्कता का दाखवता आली नाही? या परिस्थितीत केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील असलेले गोपाळ स्वरूप पाठक यांच्या नेतृत्वाखाली गांधीहत्येच्या कटाची नव्याने सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु, त्यानंतरच्या काही दिवसानंतरच गोपाळ स्वरूप पाठक हे केंद्रीय मंत्री बनले. मग केंद्र शासनाकडून १९६६ साली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली. सामान्यतः न्यायसंस्था म्हणजे न्यायालयीन कामकाजात गुन्ह्यांचा न्यायनिवाडा केले जाणारे ठिकाण होय, तर आयोग म्हणजे ‘चौकशी आयोग कायदा १९५२’ अन्वये एखाद्या प्रकरणाबाबत सखोल शोध घेऊन चौकशी करून त्यातून मिळालेले पुरावे न्यायालयात प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान सादर करण्यासाठी स्थापन केलेली संस्था किंवा समिती होय. परंतु आयोगाने एखाद्या प्रकरणात मिळवलेले पुरावे किंवा दस्तावेज आणि त्यावरील काढलेले निष्कर्ष ग्राह्य धरणे हे न्यायालयावर कधीच बंधनकारक नसते. कपूर आयोगाने तब्बल तीन वर्षे या प्रकरणाची सखोल चौकशी केली. यावेळी सदर कपूर आयोगाने सावरकरांच्या दोन सहकार्‍यांच्या शपथपत्रांचा चौकशीत समावेश केला. परंतु, ही शपथपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाहीत.


ते दोन सहकारी म्हणजे सावरकरांचे सचिव गजानन दामले व अंगरक्षक अप्पा कासार यांची साक्ष. मुळात, दामले व कासार यांच्या साक्षी १९६६ नंतर कपूर आयोगापुढे झाल्याच नव्हत्या. या साक्षी ४ मार्च, १९४८ ला पोलिसांसमोर झाल्या होत्या, स्वत: कपूर आयोगानेही त्याच उल्लेखिल्या आहेत. आता मुद्दा हा आहे की, या साक्षी १९४८-४९ मध्येच न्यायालयापुढे का आल्या नाहीत? याचे कारण असे की, दिलेल्या वा त्यांच्या नावे खोट्याच लिहून घेतलेल्या जबान्यांप्रमाणे त्यांच्या साक्षी होतील, असे पोलिसांना वाटले नसावे. अशा जबान्यांवर साक्षीदारांच्या सह्या नसतात. त्यांनी तोंडी सांगितले म्हणून पोलीसच स्वतः ते लिहून घेत वा ठेवीत असतात. पोलिसांच्या मानसिक छळामुळे, मारहाणीमुळे दडपणाखाली अथवा आमिषामुळे अशा जबान्या लिहून घेता येतात, म्हणून या जबान्या न्यायालयात काहीही कामाच्या नसतात. म्हणून त्या जबान्या पोलीस दप्तरात तशाच राहून देण्यात आल्या व आयोगाला त्या वाचायला मिळाल्या. (मोरे, शेषराव. गांधीहत्या व सावरकरः न्यायालय व आयोगाचे निष्कर्ष परस्परविरूद्ध कसे?, विचारकलह भाग २, अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन, २००८, पृष्ठ २०८) अप्पा कासारांना मुंबई पोलिसांनी अमानुष मारहाण करून त्यांच्याकडून हवा तसा कबुलीजबाब लिहून घेण्याचा प्रयत्न केला, पण अप्पांनी त्या मारहाणीला जुमानले नाही. तसेच मोठ्या रकमेचे आमिष दाखवले, तरी अप्पा त्याला बळी गेले नाहीत. (फडके, य. दि., एका लढवय्याची अखेर, महाराष्ट्र टाइम्स, १४ जून १९९८)


जर पोलीस तपासातील एखादा जबाब एवढा महत्त्वाचा होता, जे आयोग नंतर म्हणतोय, तर त्या साक्षीदाराला खटल्याच्या वेळीच स्वतः न्यायालयाने तपासले असते की! संबंधित कलम - Cr.P.C. sec.३११ आहे, एवढेच की ते १९७३च्या कोडचे आहे. गांधीहत्येच्या वेळी जो कोड होता, तो १८९८ चा होता. त्या वेळचे संलग्न कलम होते ५४०, जे आता ३११ आहे. या कलमामुळे कोणीही, कोणाचीही साक्ष ’दाबून ठेवली’, असे घडणे शक्य नाही.


तब्बल तीन वर्षं या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर चौकशी आयोगाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते की जरी न्यायालयाने सावरकरांना या प्रकरणात निर्दोष ठरवले असले तरी काही व्यक्तींची शपथपत्रे आणि अन्य काही पुरावे अंकित करतात की, गांधीहत्येच्या कटात सावरकर आणि त्यांच्या संघटनेची सक्रिय भूमिका होती. याबाबतीत एखादी गोष्ट ‘अंकित करणे’ म्हणजे ‘सिद्ध होणे’ हा गर्भित अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. गांधीहत्येच्या कटात जरी सावरकरांचे नाव गोवले गेलेले असले, तरी गांधीहत्येत सावरकरांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग होताच, हे ठळकपणे सिद्ध झालेले नाही आणि मुख्यत्वे करून चौकशी आयोगाच्या अधिकार क्षेत्रात गांधीहत्येच्या कटात सावरकरांचा असलेला सहभाग, गांधीहत्येच्या कटाबाबत त्यांना असलेली माहिती अथवा सावरकर या प्रकरणात दोषी की निर्दोष, या गोष्टीच अंतर्भूत केलेल्या नसल्याने कपूर आयोगाने यासंबंधित कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी करणे हे त्याच्या अधिकार क्षेत्राच्याच बाहेरचे होते. विशेषतः तपास यंत्रणेला सावरकरांच्या विरोधात या खटल्यासंदर्भात कोणत्याही बाबतीतला ठोस असा पुरावाच मिळालेला नाही. या प्रकरणात सावरकरांवर फक्त संशयित आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि नंतर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हीच खरी वस्तुस्थिती असल्याची जाणीव या संदर्भातील अनेक पुस्तकांचा आणि साहित्याचा विचारपूर्वक अभ्यास केल्यानंतर सातत्याने होत राहते. 


मे. न्यायालयाने अंतिम निकालात स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘Vinayak Damodar Savarkar is found not guilty of the offences as specified in the charge and is acquitted thereunder: he is in custody and be released forthwith unless required otherwise’ - म्हणजेच सावरकर हे त्यांच्यावर लावण्यात आलेल्या दोषारोपांसंदर्भात दोषी नसून त्यांना निर्दोष ठरविण्यात येत आहे. मे. न्यायालयाने असा स्पष्ट निर्णय देऊनही स्वतःला ‘गांधीवादी’ म्हणवणारे गांधीहत्येत सावरकरांचा सहभाग असल्याबाबतचा सतत उल्लेख आजही करताना दिसतात तिथे गांधींच्या अनुयायांकडून न्यायालयाचा अवमानही होतो आणि तिथेच त्यांचा गांधीवादसुद्धा हरतो. 


एखाद्या आरोपीवरील आरोप सिद्ध झाले की, मगच आरोपी हा दोषी ठरतो. मग सावरकरांवरील हा आरोप त्यांच्या समस्त जीवनात कधीही सिद्धच झालेले नसतानाही ते दोषी कसे?? हा प्रश्नच आजतागायत विरोधकांना पडलेला नाही याचेच एकीकडे आश्चर्य वाटते तर दुसरीकडे यावर त्यांना विचार करावासा कसा वाटत नाही? हा प्रश्न सातत्याने मनात घोंगावत राहतो. गांधीहत्येच्या प्रकरणात सावरकरांचा सहभाग नव्हता हे वास्तव आहे. लेखक अक्षय जोग यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ या त्यांच्या पुस्तकात सावरकरांवरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन केलेले आहे.


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक विचारी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठा असलेले, पुरोगामी, कर्मयोगी पुरुष होते. महाभारतात कृष्णाने सांगितलेली गीता सावरकर खर्‍या अर्थाने जगले. या थोर राष्ट्रपुरुषाने आपले अवघे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले आणि तेही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. आधुनिक जगतात गीता खरोखरीच कोणी जगले असेल, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच होत हे त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. मनातल्या भावना आणि जीवनातील तत्त्वनिष्ठा यामुळे माणूस जीवंत राहतो. आपल्या देशकार्याने जर हे तत्त्व भाव आणि त्याबरोबर मनाला धारण करणारे शरीर अमर राहणार असेल, तर अशा मरणाला थोर पुरुष सिद्ध होतात आणि कवितेच्या पुढील ओळी झरू लागतात-


त्वत्स्थंडिली धाकालीले प्रिय मित्रसंघा
केले स्वये दहन यौवन-देह-भोगां
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवां
त्वत्सेवनींच गमली रघुवीर-सेवा
त्वत्स्थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता
दावानलांत वहनी नवपुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू
केला हवी परमकारुण पुण्यसिंधु
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला
हे काय, बंधू असतो जरि सात आम्ही
त्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मी
संतान या भरतभूमीस तीस कोटी
जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती
हे आपुले कुळही त्यामधि ईश्वरांश
निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश



- अ‍ॅड. प्रसन्न प्रदीप मालशे



@@AUTHORINFO_V1@@