सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Adv Amey pradeep malshe_1


संघ व सावरकर या नात्यातही काही काळ उणे अधिक प्रमाणात प्रसंग आले असतीलही. परंतु, या निवडक प्रसंगांमुळे थेट या पवित्र नात्यालाच दुय्यम किंवा अयोग्य ठरवण्याचा काही अंशी झालेला प्रयत्न साफ चुकीचा वाटतो. संघाला आजवर सावरकर कुटुंबाचा कधीही विसर पडलेला नाही आणि भविष्यात कधीही पडणार नाही हेही तितकंच खरं आहे.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक कुटुंबांनी आपलं शतप्रतिशत जीवन हे मातृभूमीच्या यथोचित स्वातंत्र्यासाठी वाहिलं आणि म्हणूनच आपल्या भारतमातेला परकियांच्या गुलामगिरीतून बाहेर पडता आलं. यातील काही कुटुंबं तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही देशाला सुराज्य मिळवून देण्याकरिता सतत कार्यरत होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि संपूर्ण कुटुंब हे त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण होय. याच सावरकर कुटुंबाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यात असलेल्या घनिष्ठ संबंधांबाबत आजही अनेकजण अनभिज्ञच आहेत. म्हणूनच तर आजही सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोहोंच्या विचारसरणीत, वाटचालीत पराकोटीचा फरक आहे वगैरे अशी तत्सम विधानं अनेकांच्या अपूर्ण अभ्यासातून प्रकट होत असतात किंवा यापूर्वी प्रकट झाली आहेत. कोणत्याही नदीच्या उगमानंतर पुढील वाटचालीत वेळोवेळी तिच्या पात्राचे विभाजन होऊन पाणी दोन मार्गांनी मार्गक्रमण करू लागते. परंतु, त्यामुळे नदीच्या वाहण्याची क्रिया संपत नसते. हीच गोष्ट सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा अभ्यास करताना सर्वांनी लक्षात घ्यायला हवी.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा पाया सावरकर बंधू किंवा प्रामुख्याने बाबाराव सावरकर म्हणजेच गणेश दामोदर सावरकर यांनीच रचला व त्यावर डॉ. हेडगेवार यांनी संपूर्ण संघाची इमारत उभी केली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

डॉ. हेडगेवार हे तत्कालीन हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉ. मुंजे यांचे मानसपुत्र अर्थात त्यांच्या मुशीत तयार झालेले प्रखर राष्ट्रभक्त व सावरकर बंधूंच्या हिंदुत्वाच्या तेजाने न्हाऊन निघालेले प्रखर हिंदुत्ववादी म्हणून नावारूपाला आले. आपलं डॉक्टरकीचं शिक्षण संपवून नागपुरात आल्यानंतर त्यांचा हा सारा प्रवास सुरु झाला.

सन १९१४ साली हेडगेवार आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कोलकाता येथून कायमस्वरूपी नागपुरात परतले व तिथेच स्थायिक झाले. वैद्यकीय शिक्षण घेऊनही वैद्यकीय व्यवसाय न करता अखंड भारताच्या स्वातंत्र्याच्या कामी स्वतःला वाहून घेण्याचा दृढनिश्चय डॉक्टरांनी केला आणि नागपुरात तरुणांच्या एकत्रीकरणासाठी १९१८ मध्ये ‘नॅशनल युनियन’ची स्थापना केली. १९२३ मध्ये त्यांना नागपूरच्या हिंदू सभेचे सचिवपद बहाल करण्यात आले. याच दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकरांनी १९२३ मध्ये ‘तरुण हिंदू सभे’ची स्थापना केली व त्याच्याच प्रचार आणि प्रसारासाठी १९२४ साली बाबाराव नागपुरात आले होते. त्यानिमित्ताने नागपुरात बाबाराव सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांची पहिली भेट घडून आली. बाबाराव सावरकर हे व्यक्तिमत्त्व एखाद्या ज्वलंत ज्योतीप्रमाणे होतं. ज्योत कुठेही गेली तरी सभोवार आपले तेजोवलय ती उत्पन्न करतेच!!

नागपुरात बाबाराव त्यांचे मित्र विधिज्ञ विश्वनाथराव केळकर यांच्याकडे वास्तव्यास होते. बाबाराव आपल्या कार्यातून नागपुरातील असंख्य तरुणांना आपल्याकडे आकर्षित करत होते. बाबारावांना भेटण्यासाठी तरुणांचे जत्थेच्या जत्थे केळकरांच्या घरी दररोज येत असत. बाबाराव त्यांच्याशी हिंदू संघटन कार्याच्या विविध प्रश्नांची चर्चा करीत आणि माहिती देत असत. हे सर्व बाबारावांच्या मुखातून ऐकून तरुण वर्ग प्रेरित होत व बाबारावांचे विचार घरोघरी जाऊन सांगत असत. त्याच तरूणांमधील एक नाव डॉ. हेडगेवार. तेही तासन्तास तिथे येऊन बसायचे, बाबारावांचे विचार मन लावून ऐकायचे. मात्र, ते कधीही काहीही बोलत नसत वा बाबारावांना कोणतेही प्रश्न विचारीत नसत. पुढे नागपूरच्या वास्तव्यात हिंदुत्वनिष्ठांचे एक तरुण मंडळ बाबारावांसभोवती तयार झाले. त्या सगळ्यांना बाबारावांनी ‘तरुण हिंदू सभे’च्या प्रतिज्ञा दिल्या. बाबारावांनी नागपूर सोडताना तेथील ‘तरुण हिंदू सभे’ची संपूर्ण जबाबदारी डॉ. हेडगेवारांकडे सोपवली आणि डॉक्टरांनी आपल्या कार्यातून आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.

हेच काम करत असताना डॉक्टरांच्या मनात एखादी अखिल भारतीय सुसूत्र आणि सुबुद्ध विचारांच्या तरुणांची किंवा स्वयंसेवकांची संघटना उभारण्याबाबत विचार येऊ लागले. डॉक्टरांनी आपल्या मनातील कल्पना बाबारावांसमोर बोलून दाखवली. बाबारावांना ती यथोचित वाटली, पटली, आवडलीही आणि त्यातूनच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा खराखुरा मुहूर्त झाला. ‘तरूण हिंदू सभे’ची हिंदुत्वाचे कंकणं बांधलेली माणसे आपोआप संघाच्या ध्वजाखाली उभी राहिली.


केवळ हिंदूहित आणि हिंदूंचा अभ्युदय हेच ध्येय असल्यामुळे हिंदूंच्या उत्कर्षासाठी स्थापन होणार्‍या संघाला हिंदू सभेच्या सभासदांनी साहाय्य केलंच पाहिजे, अशी बाबारावांनी ठाम भूमिका मांडली. बाबारावांच्या मार्गदर्शनाने पुढील गोष्टी ठरल्या. संघाच्या ध्येयधोरणांविषयी चर्चा करण्यासाठी डॉ. हेडगेवार रत्नागिरीत तात्यारावांच्या भेटीला गेले. तात्यारावांचा प्रसिद्ध ’हिंदुत्व’ हा ग्रंथ हेडगेवारांनी आधीच वाचला होता. त्या ग्रंथाच्या विचारांनी डॉक्टर खूप प्रेरित झाले आणि त्या ग्रंथाचा त्यांनी सर्वत्र जोरदार प्रसार करण्यास सुरुवात केली. त्या भेटीतच डॉक्टरांनी संघाविषयी सर्व हेतू-उद्देश तात्यारावांसमोर मांडले. तात्यारावांची संमती मिळताच सन १९२५ साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर नागपुरातील साळूबाई मोहित्यांच्या वाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली संघशाखा भरवून संघाची स्थापना झाली.

पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्वजनिर्मितीत आणि संघाच्या प्रतिज्ञेतही सावरकरबंधूंचा अत्यंत महत्त्वाचा किंवा सिंहाचा वाटा दिसून आला. संघाच्या पहिल्यावहिल्या शाखेवर लावण्यात आलेला त्रिकोणी भगवा ध्वज हा डॉ. नारायणराव सावरकरांनी बाबाराव सावरकरांच्याच हातून बनवून घेतला होता. ध्वजाप्रमाणेच संघाची प्रतिज्ञाही डॉ. हेडगेवारांनी बाबारावांकडूनच लिहून घेतली. बाबारावांनी पूर्वी ‘अभिनव भारत’ व ‘तरुण हिंदू सभे’ची प्रतिज्ञा सिद्ध केली होतीच. त्याच धर्तीवर संघाची प्रतिज्ञा बाबारावांनी सिद्ध केली. डॉ. हेडगेवारांनी त्यात थोड्याफार शब्दांची फेरफार करून ती प्रतिज्ञा स्वीकृत केली.


डॉक्टरांचे अविरत कार्य पाहून भारावलेल्या बाबारावांनी सन १९३१ मध्ये ‘तरुण हिंदू सभा’ ही संघात विलीन करण्याचा निर्णय डॉक्टरांजवळ बोलून दाखवला आणि लागलीच हिंदू सभेच्या सर्व शाखांना पत्रव्यवहाराने तसा आदेशही पाठवला. काशीच्या तीर्थक्षेत्री हा पवित्र संगम जुळून आला.


पुढे तात्यारावांच्या देशभक्तीने आणि हिंदुत्वाच्या प्रेरणेने डॉ. हेडगेवार पूर्णतः सावरकरनिष्ठ झाले असंच म्हणावं लागेल. सावरकरांचे सर्व विचार आणि त्यांची हिंदुत्वाची व्याख्या संघात शिकवली जायची. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सिद्धांत संघात शिकवला जाई. सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या शिक्षणासह अन्य अनेक गोष्टी संघात अंगिकारल्या गेल्या.

दि. १२ डिसेंबर १९३८ रोजी नागपूर येथे तात्याराव सावरकरांनी दिलेल्या संघभेटीत स्वयंसेवकांनी सैनिकी संचलन करून सावरकरांना मानवंदना दिली. त्यावेळी डॉ. हेडगेवारांनी आपल्या भाषणात सावरकरांचा केलेला गौरव संघ व सावरकर यांच्यातील घनिष्ठतेचं आणि सावरकरांबद्दल संघाला असलेल्या आदराचं थोर प्रतीकच म्हणावं लागेल. “बॅरिस्टर सावरकर यांच्यासारख्या अलौकिक आणि अत्यंत श्रेष्ठ अशा राष्ट्रवीराचे दर्शन संघाला घडले, हा संघाच्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा दिवस आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत होणार्‍या या भूमीवरील वायू स्वयंसेवकांच्या श्वासोच्छ्वासाबरोबर त्यांच्या हृदयात जाऊन त्यांची राष्ट्रभक्ती सदैव जागृत ठेवील,” अशा सुस्पष्ट शब्दात डॉक्टरांनी काढलेल्या उद्गारांतून संघ आणि सावरकर यांचं नातं अधिकच दृढ झालं.

सन १९३२ मध्ये बाबाराव आणि डॉ. हेडगेवारांनी उभ्या महाराष्ट्राचा दौरा केला आणि दोघांनी ठिकठिकाणी संघशाखेची बीजे पेरली. जागोजागी बाबारावांच्या ओळखीची माणसं संघाच्या छायेत समाविष्ट झाली. बाबारावांच्या इच्छेनुसार मुंबईत बंधू डॉ. नारायणराव सावरकरांनी संघाचे चालकत्व आपल्या शिरावर घेतलं. सुमारे १९३२ ते १९३५ दरम्यान बाबाराव आणि डॉ. हेडगेवारांनी सिंधमध्ये जाऊन हिंदू संघटनेचा प्रसार केला. नंतरच्या काळात सावरकर ‘हिंदू महासभे’चे अध्यक्ष झाल्यावर उभ्या भारतभर हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार करत असताना प्रत्येक ठिकाणी संघाची एक शाखा स्थापन करत होते. या कार्यात सदैव त्यांच्यासोबत संघाचे प्रमुख प्रचारक दादा परमार्थ असत.

जवळजवळ सबंध भारतात सावरकरांमुळे संघ पोहोचला. पुढेही सावरकर आणि डॉक्टरांच्या पश्चात गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वातही संघ सावरकरांच्या विचारांनीच वाटचाल करत होता, नव्हे तर आजही संघ सावरकरांच्याच देशहितकारक विचारांनीच मार्गक्रमण करत आहे. कोणत्याही कार्यात किंवा वाटचालीत उणेअधिक प्रसंग हे येतातच. तसे संघ व सावरकर या नात्यातही काही काळ उणे अधिक प्रमाणात प्रसंग आले असतीलही. परंतु, या निवडक प्रसंगांमुळे थेट या पवित्र नात्यालाच दुय्यम किंवा अयोग्य ठरवण्याचा काही अंशी झालेला प्रयत्न साफ चुकीचा वाटतो. संघाला आजवर सावरकर कुटुंबाचा कधीही विसर पडलेला नाही आणि भविष्यात कधीही पडणार नाही हेही तितकंच खरं आहे. कारण, शेवटी वर म्हटल्याप्रमाणे संघ आणि सावरकर या दोन्हीचे प्रवाह भारतमातेच्या रक्षणासाठी आणि यशस्वी मार्गक्रमणासाठीच अविरत कार्यरत होते, आहेत व राहतील.


वंदे मातरम्!!

- अ‍ॅड. अमेय प्रदीप मालशे
@@AUTHORINFO_V1@@