सर्वांभूती आत्मभाव, करी सुखाचा वर्षाव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |

vedhah_1  H x W
खरे तर जगातील सर्व मानव आणि इतर पशुपक्षी, जीवजंतू या सर्वांचे देह भिन्न भिन्न जरी असले किंवा प्रत्येकाची वृत्ती वेगळी जरी असली तरी आत्मे मात्र एकसमान आहेत. कर्माची फळे भोगण्याकरिता आत्म्यांनी वेगळी शरीरे धारण केली आहेत. याकरिता बाह्य आकृतीकडे न पाहता, त्या देहाचा आधारभूत घटक असलेल्या आत्म्याचा विचार करावयास हवा.
यस्मिन्त्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद् विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकऽ एकत्वमनुपश्यतः ॥
(यजुर्वेद - ४०/७ )


अन्वयार्थ
(यस्मिन्) ज्या ज्ञानयुक्त स्थितीत, आध्यात्मिक अवस्थेत (विघ्नानतः) विशेष ज्ञानी विद्वान-धर्मात्मा माणसांसाठी जेव्हा (सर्वाणि) सर्व (भूतानि) चेतन प्राणी व पदार्थ (आत्मा एव) आपल्या आत्म्याप्रमाणेच (अभूत्) होतात, (तत्र) त्या पवित्र अवस्थेत (एकत्वम् अनुपश्यतः) आत्म्याच्या एकत्वाची अनुभूती घेणार्‍या, एकात्मदृष्टीने पाहणार्‍या साधक सत्पुरुषाला (कः मोहः) कोणता मोह आणि (कः शोकः) कोणता शोक होणार? अर्थातच नाही!


विवेचन
मानव जन्माची सार्थकता ही केवळ भौतिक पदार्थांच्या उपभोगाने सिद्ध होत नाही, तर त्यासोबतच आत्मिक कल्याणाकरिता काहीतरी प्रयत्न करीत राहण्याने ती सफल ठरते. असंख्य जन्मांच्या पुण्याईने मिळालेला हा श्रेष्ठ मानव देह जर फक्त स्वतःच्या स्वार्थप्रिय कार्यासाठीच व्यस्त राहू लागला, तर मग त्याच्यात आणि पशूंमध्ये कोणते अंतर? हेच वेगळेपण विशद करताना नीतीकार आचार्य भर्तृहरी म्हणतात-
आहारनिद्राभयमैथुनं च
सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम्।
धर्मो हि तेषांमधिको विशेषो
धर्मेण हीनाः पशुभिः समानाः।
म्हणजेच आहार, निद्रा, भय आणि स्त्रीसहवास या चार गोष्टी पशू व माणसांमध्ये एकसारख्या आहेत? पण, या चारांपेक्षाही मानवात ‘धर्म’ हे तत्त्व विशेष रुपाने जास्त (पाचवे) विद्यमान आहे. त्यामुळे त्याची मनुष्य म्हणून वेगळी ओळख ठरते. पण, या धर्मतत्त्वाच्या अभावी सर्व मानव पशुतुल्य समजले जातात. याकरिता मानवाने वरील चार तत्त्वांबरोबरच, ‘धर्म’ या पाचव्या तत्त्वाचेदेखील पालन केले पाहिजे.

धर्म म्हणजे तरी का? ‘धृ-धारणे’ या धातूपासून बनलेला हा शब्द ‘सत्य धारण करणे’ या अर्थास प्रकट करतो. जे जे पवित्र, शुद्ध, कल्याणकारक व आत्म्याला प्रसन्नता प्रदान करणारे कृत्य असेल, ते ते सर्व ‘धर्म’ होय. वरील मंत्रात आत्मधर्माचे विवेचन करण्यात आले आहे. या जगात तीन अनादी सत्ता आहेत. परमात्मा, आत्मा व प्रकृती! यातील परम आत्मा म्हणजे ईश्वर हा एक, सर्वव्यापक, निराकार, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व सच्चिदानंदस्वरूप आहे, तर आत्मतत्व हे अनेक, एकदेशी (शरीरी), निराकार, अल्पशक्तिमान, अल्पज्ञ व सच्चित् स्वरुपी. पण, प्रकृती तत्व मात्र जड व वेगवेगळ्या रुपातून प्रकट होणारी विकृतस्वरुपाची निसर्गशक्ती आहे. यातील ‘आत्मा’ हा सर्व जीवांमध्ये एकसारखाच आहे. म्हणून सर्वांनी सर्वांशी आत्मभावनेने वागले पाहिजे. महाभारतात महर्षी व्यासांनी एक दुसर्‍यांशी आपुलकीने व्यवहार करण्याचा ‘आत्मधर्म’ सांगताना म्हटले आहे-
श्रुयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम् ।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत् ॥
अर्थात, लोकहो! धर्माचे सार हे ऐका आणि ते जीवनात धारण करा. प्रत्येकाने आपल्या आत्म्याला प्रतिकूल (वाईट) वाटेल, असा व्यवहार इतरांशी करू नये. कारण, या आत्मभावनेमुळे माणूस सर्वांचा मित्र बनू शकतो. अशा सद्व्यवहाराने माणूस कधी कोणत्याही मोहात गुरफटत नाही की, शोकमग्नदेखील होत नाही. पण, ही आत्मभावना उत्पन्न होते ती ज्ञानी व अध्यात्ममार्गावर चालणार्‍या धर्मात्म्यांमध्ये! याचसाठी प्रत्येकाला निःस्वार्थवृत्ती जोपासावी लागते. अहिंसा, दया, करुणा, परोपकार, प्रेम, वात्सल्य यांसारखे सद्गुण अंगिकारावे लागतील. यालाच ‘संतपदी प्राप्त होणे’ असे म्हटले जाते.
खरे तर जगातील सर्व मानव आणि इतर पशुपक्षी, जीवजंतू या सर्वांचे देह भिन्न भिन्न जरी असले किंवा प्रत्येकाची वृत्ती वेगळी जरी असली तरी आत्मे मात्र एकसमान आहेत. कर्माची फळे भोगण्याकरिता आत्म्यांनी वेगळी शरीरे धारण केली आहेत. याकरिता बाह्य आकृतीकडे न पाहता, त्या देहाचा आधारभूत घटक असलेल्या आत्म्याचा विचार करावयास हवा. एकमेकांशी शत्रुत्वाची दुर्भावना निर्माण होतेच ती मुळात मन व इंद्रियांच्या दोषांमुळे! काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, ईर्ष्या इत्यादी आंतरिक शत्रू हे वरचढ झाले की, मानवाचा ‘दानव’ बनतो आणि मग त्याच्यात क्रूरता, हिंसा, भांडण-तंटे, स्वार्थ इत्यादी दोषांचे मळभ साचते. पण, जेव्हा हे विकारांचे आवरण नाहीसे केले की आत स्वच्छ व पवित्र असा ‘आत्मा’ उरतो.
मग आपण आता हे ठरवावे की, ‘बाह्य इंद्रिय दोषांना बळी पडावे की आतील शुचिर्भूत अशा आत्मशक्तीला?’ ‘वि जानतः’ म्हणजे विशेष जाणते, जाणकार, ज्ञानी लोक मात्र नेहमी प्रत्येक जीवांमधील याच आत्मतत्वाला पाहतात. ते समदर्शी होतात. आपण सारे एकच आहोत, अशी एकात्मभावना त्यांच्यामध्ये दृढ होते. मग ते कोणासही आपला विरोधक वा शत्रू मानत नाहीत. सर्वांशी त्यांचे आप्तत्वाचे नाते असते. जसे स्वकीयजन, तसेच परकेदेखील आपलेच! क्षुद्र अशा स्वार्थाचा लवलेशही त्यांच्यात नसतो. त्यांचे जगणे हे समाज, राष्ट्र व विश्वाच्या कल्याणासाठीच असते. आपल्या परिसरातील प्राणिसमूहांच्या दुःख व वेदनांना पाहून त्यांचा आत्मा द्रवतो. संत ज्ञानेश्वरांनी याच भावनेतून सर्व जीवांशी मैत्र जडावे, अशी अभिलाषा पसायदानातून व्यक्त केली होती- ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ।’ परदुःखे पाहून ज्यांची हृदये कळवतात व अंतःकरणे खिन्न होतात, अशा व्यक्तींना संतांची उपमा दिली जाते. एका सुभाषितकाराने म्हटले आहे-
अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा ।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतद् विदुर्बुधाः ॥


म्हणजेच शरीराने, वाणीने व मनाने सर्व प्राण्यांचा द्रोह न करणे, सर्वांवर अनुग्रह (कृपा) करणे आणि सर्वांना दान देणे हे शहाण्या लोकांनी शीलच मानलेले असते. योगेश्वर श्रीकृष्ण स्वतःस प्रिय कोण आहे, हे सांगताना गीतेत म्हणतात-
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥
जो मनुष्य सर्व प्राणिसमूहांशी द्वेषभावनेने रहित स्वार्थविहीन, सर्वांवर प्रेम करणारा मित्र, करुणेने युक्त, अहंकाराने विरहित, सुख-दुःखांना समान लेखणारा, क्षमाशील आणि अपराध करणार्‍यांनादेखील आश्रय देणारा, योगी, नेहमी समाधानी, मन व इंद्रियांसह शरीराला वशीभूत करणारा आहे, तसेच जो माझ्यावर दृढविश्वास ठेवणारा आणि मन व बुद्धी या दोन्ही गोष्टी माझ्यात समर्पित करणारा आहे, असाच सज्जन भक्त मला अत्याधिक प्रिय आहे. इतका उच्च विचार ज्याने अंगिकारला असेल, त्याला कधीही सांसारिक मोहपाश किंवा कोणतेही दुःख व क्लेशाची बंधने गुंतवणार नाहीत. तो तर नेहमी ईश्वरीय आनंदात आपले समग्र जीवन घालवितो. तो सर्वांचा प्रिय होतो. ही आत्मभावना आज लयास गेल्याने समग्र जगात हिंसक कृत्ये घडत आहेत. माणूस माणसांपासून दुरावत चालला आहे. या मंत्राचा उच्च आदर्श सर्व मानवांमध्ये रुजेल तेव्हा नक्कीच जग सुखी होईल!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@