रामदासांचे फटकारे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |

samarth ramdas swami_1&nb
सामान्य माणसांचे ज्ञान हे लोकपरंपरेनुसार अनुमानाने आलेले असते. ते खरे असतेच असे नाही. एखादा धाकटा बुद्धी व गुणांच्या जोरावर भाग्यपदावर पोहोेचला तर त्याच्या निकटचे लोक त्याला महत्त्व देत नाहीत, त्याला तुच्छ समजतात. अशावेळी त्या धाकट्याने जवळच्या लोकांना दूर सारावे, असा सल्ला देऊन स्वामींनी तुच्छता दर्शविणार्‍या त्या लोकांना फटका दिला आहे.



समर्थांची भूमिका लोकशिक्षणाची होती, हे अनेक उदाहरणांनी दाखवता येईल. स्वामींच्या मनात लोकांना शहाणे करावे व प्रपंच विज्ञानाला लायक करावे असे होते.
जे जे आपणासि ठावें। तितुके हळूहळू शिकवावे।
शहाणे करून सोडावें। बहुत जना॥
स्वामींचे अनुभवविश्व अफाट असल्याने जनमानसाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. स्वामींना माहीत होते की, समाजात अनेक माणसे स्वतःला शहाणे समजतात. त्यांना कळते की, मलाच सर्व माहीत आहे. इतरांना काही कळत नाही, अशी त्यांची धारणा असते. अशा लोकांबरोबर राहून त्यांना शहाणे करायचे, हे कठीण काम होते. समाजाची सुधारणा करायची असे एकदा ठरले की, मग स्वामींचे प्रतिपादन त्या दृष्टीने सुरू होत असे. मुलांना शिकवताना जसे त्यांच्या चालीने त्यांना हळूहळू शिकवावे लागते, तसे लोकांना शिकवावे लागते, असे मत स्वामींनी व्यक्त केले आहे. तथापि प्रत्येकवेळी लोकांच्या कलाने आपण वागत राहिलो, तर लोकांना जे सांगितले गेले, त्याचे महत्त्व वाटणार नाही आणि त्यांना शहाणे करण्याचे कार्य नीटपणे साधता येणार नाही, याची समर्थांना जाणीव होती. म्हणून प्रसंगी कठोर भूमिका पत्करून शाब्दिक तडाखे द्यायला स्वामींनी कमी केले नाही. काही जुन्या कल्पना लोकांच्या मनात वर्षानुवर्षे घर करून बसलेल्या असतात. त्या कल्पना तार्किक बुद्धिप्रामाण्यावर तपासणे जरूरीचे असते. अशावेळी स्वामींनी वैचारिक फटके देऊन लोकांना शहाणे केले आहे. त्यापैकी काहींचा विचार या लेखात केला आहे.


सर्वसाधारण माणसांना नेहमी वाटत असते की, अमुक केले तर लोक काय म्हणतील. लोकांच्या बोलायला माणसे घाबरतात आणि लोकांच्या मतांचे पालन करतात. सध्याच्या काळात तर बहुमताला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाहीत बहुमत मिळवणार्‍याला राजकीय सत्ता हस्तगत करता येते. परंतु, संतांची दृष्टी निराळी असते. संतांचा अभिप्राय असा आहे की, बहुमताने व्यक्त झालेल्या लोकमताला प्रत्येक वेळी मानले पाहिजे असे नाही. याचे कारण असे की, जनसमुदायाचा साकल्याने विचार केला तर त्यात अपरिपक्व, अविवेकी लोकांचा भरणा अधिक असतो. जनसमुदायात जाणते विचारी लोक थोडे असतात. त्यामुळे बहुमताने झालेला निर्णय सर्वकाळी योग्य असेल, असे म्हणता येणार नाही. सर्व लोक शहाणे आहेत, असे गृहीत धरले, तर बहुमताला काहीतरी अर्थ असतो. पण, प्रत्यक्षात जनसमुदायातील सर्व लोक शहाणे आहेत, असे आढळून येत नाही. याउलट जनसमुदायात शहाण्या व विवेकी लोकांचा गट लहान असतो. त्यामुळे ते नेहमी अल्पमतात असतात. त्यामुळे संतांचे, तसेच रामदासांचे मत सामान्य लोकांच्या बहुमताला अनुकूल नाही.

रामदासांप्रमाणे तुकारामबुवासुद्धा बहुमताला अर्थात लोकमताला कंटाळले होते. अशा लोकांना उद्देशून तुकारामबुवा म्हणतात की, ‘लोक जैसा ओक धरिता धरवेना.’ कारण, उघड आहे. बुवांचा लोकांविषयी अनुभव चांगला नाही. या जगात सन्मार्गाने चालणार्‍यांना लोक धडपणे आयुष्य जगू देत नाहीत. असा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. सन्मार्गाने जगणार्‍या माणसाच्या प्रत्येक कृतीत लोकांना म्हणजेच निंदकांना विपरीत अर्थ दिसतो, हे तुकाराम महाराजांनी एका अभंगात स्पष्ट केले आहे. सज्जन माणसाने काहीही केले तरी लोकांना ते वेगळेच दिसते.
संसार करिता म्हणती हा दोषी।
न करिता आळशी। पोटपोसा॥
बहु बोले जाता म्हणती हा वाचाळ ।
न बोलता सकळ। म्हणती गर्वी॥
लग्न करू जाता म्हणती हा मातला।
न करिता झाला। नपुंसक॥


सज्जन माणसाला लोक धडपणे जगू देत नाहीत. अशा लोकांना पाहून तुकारामांनी ‘लोक जैसा ओक’ म्हटले तर बिघडते कुठे? समर्थांनीसुद्धा अशा लोकमताबद्दल, म्हणजे बहुमताबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बहुमताला सर्वकाळ श्रेष्ठ मानण्याच्या लोकांच्या सवयीबद्दल स्वामींनी फटका दिला आहे.
बहुत भ्रमिष्ट मिळाले । तेथे उमगल्याचे काय चाले ।
जगामध्ये उमगले । ऐसे थोडे ॥
भ्रमिष्ट लोकांनी बहुमताच्या जोरावर काहीतरी ठरवायचे, त्यात समजदार माणसांच्या मताला किंमत राहत नाही. बहुमत ठरवताना शहाण्यांना किंवा उमजलेल्यांना व त्यांच्या मताला काही अर्थ नसतो. ही बहुमताची शोकांतिका आहे, असे स्वामींना वाटते म्हणून त्यांनी वरीलप्रमाणे लोकांना फटकारले आहे.


समाजातील वडील माणसांना योग्य तो मान दिला पाहिजे, त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, हे ठीक आहे. स्वामी हा विचार विवेकाच्या कसोटीवर तपासून पाहतात. सर्वसाधारणपणे वडिलांच्या मताला आदराचा मान का मिळतो, हे वयाने वडील असलेल्या माणसांच्या लक्षात येत नाही. बर्‍याच वेळा आपल्याला ज्यातील फारसे कळत नाही, हे माहीत असूनही ही वयाने मोठी माणसे आपल्या मताचा आग्रह धरतात आणि वडिलकीच्या नात्याने लहानांना ते मत स्वीकारायला भाग पाडतात. तेव्हा अनवस्था प्रसंग उद्भवतात. लोकांचा असा समज असतो की, ‘आधी जन्मले तयासी थोर म्हणती.’ परंतु हे विधान विवेकाच्या कसोटीवर टिकणारे नाही म्हणून स्वामींना ते मान्य नाही. कोण आधी जन्मला आणि कोण नंतर जन्माला आला, यावर थोरपण, लहानपण ठरवता येत नाही. स्वामींच्या मते, वयापेक्षा गुण आणि बुद्धी यावर थोरपण ठरवावे. केवळ वयाने मोठा झाला, त्यावरून त्याचे वडिलपण सिद्ध होत नाही. तत्कालीन समाजाला हे विचार स्वीकारायला अवघड होते. ‘आधी जन्मले ते थोर’ हे लोकांच्या मनात घट्ट बसले होते, त्यांना शहाणे करण्यासाठी स्वामींनी फटका दिलाय.
गुणेविण वडिलपण। हे तो अवघेचि अप्रमाण।
त्याची प्रचीत प्रमाण। थोरपणीं॥ (15.3.17)


गुणांशिवाय माणसाचे खरे थोरपण असू शकत नाही. गुण नसले तरी वडीलपण येते, हे समजणे चूक आहे. असे असले तरी स्वामी पुढे सांगतात की, वयाने वडील असणार्‍यांना आपण योग्य तो मान द्यावा आणि वडिलांनीदेखील आपले हे मिळालेले वडीलपण खरे नाही हे ओळखून त्याप्रमाणे वागावे. असे जर त्यांनी केले नाही, तर पुढे त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो.
तथापि वडिलांस मानावे । वडिलें वडिलपण जाणावें ।
नेणता पुढें कष्टावें । थोरपणीं ॥


सामान्य माणसांचे ज्ञान हे लोकपरंपरेनुसार अनुमानाने आलेले असते. ते खरे असतेच असे नाही. एखादा धाकटा बुद्धी व गुणांच्या जोरावर भाग्यपदावर पोहोेचला तर त्याच्या निकटचे लोक त्याला महत्त्व देत नाहीत, त्याला तुच्छ समजतात. अशावेळी त्या धाकट्याने जवळच्या लोकांना दूर सारावे, असा सल्ला देऊन स्वामींनी तुच्छता दर्शविणार्‍या त्या लोकांना फटका दिला आहे.
धाकुटा भाग्यास चढला। तरी तुच्छ करिती तयाला।
याकारणें सलगींच्या लोकांला। दुरी धरावे॥


समाजात निंदकांची काही कमी नाही. हे निंदक द्वेष-मत्सराने पछाडलेले असल्याने त्यांना जगात काही चांगले दिसत नाही. आपण तेवढे शहाणे, इतरांना काही कळत नाही, अशी त्यांची कल्पना असते. या निंदकांना लोक घाबरून असतात. कारण, आपण जर त्यांच्या विरोधात बोललो तर आपण त्यांच्या टीकेचे लक्ष्य होऊ, असे लोकांना वाटत असते. समर्थांच्या काळीही असे निंदक होते. त्यांनी समर्थांवरही टीका केली होती, त्यांची निंदा केली होती. त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला होता. पण, समर्थ अशा टीकेला अथवा निंदेला भीक घालणारे नव्हते. स्वामींनी एक जोरदार फटका या निंदकांना लगावला आहे.
नरे भत्सरे पामरें पापरुपें। अतीकर्कशी जल्पती वागजल्पे।
तया वाजरा मर्कटा कोण पुसे । सदासर्वदा भूंकती श्वान जैसे ॥
निंदकाचे कृत्य ‘कुत्र्याचे भुंकणे’ समजून त्याकडे लक्ष देऊ नये, हा स्वामींचा फटकारा, मत्सराने निंदा करणार्‍यांना चांगला झोंबणारा आहे. रामदासांच्या आणखी काही फटकार्‍यांचा विचार पुढील लेखात पाहू.

- सुरेश जाखडी 
@@AUTHORINFO_V1@@