सावरकरांच्या समाजसुधारणेमागील हेतू - मानवता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |


savarkar_1  H x


होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला - स्वातंत्र्यवीर सावरकर (ऐक भविष्याला) सावरकरांचे मानवतेच्या स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न होते. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. समाजसुधारक म्हणून ते अल्प परिचित आहेत.



समाजसुधारक म्हणून मी सावरकर अभ्यासायला लागले आणि मी अवाक झाले. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने परिपूर्ण अभ्यास कसा करावा, हा सावरकरांच्या बाबतीत एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. कोणत्या सुधारणा करायच्या आणि त्यांच्या महत्त्वानुसार त्यांची केलेली क्रमवारी, प्रत्येक सुधारणेमागची त्यांची भूमिका आणि विचार, सूत्र, सूत्रांचा क्रम, सुधारणांचे टप्पे, अपेक्षित यशाची टक्केवारी, सुधारकांचे वर्ग अशा अनेक गोष्टींवर सावरकरांनी सविस्तर लिहिले आहे. ते एक क्रियाशील सुधारक होते. पण, या सुधारणांमागचा त्यांचा हेतू केवळ ‘मानवता’ हाच होता. हिंदूराष्ट्र, हिंदू संघटन हे त्यांचे धोरण असले तरी गंतव्य मात्र ‘मानवता’ हेच होते.
 

‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही,’ याची जाणीव त्यांना होती. हिंदू समाजाच्या प्रगतीला पायबंद घालणार्‍या सात शृंखला तोडून टाकण्यासाठी सावरकरांनी हिंदूंना आवाहन केले होते. या सात शृंखला म्हणजे वेदोक्त बंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी. पु. ल. देशपांडे एका भाषणात म्हणतात की, “विज्ञाननिष्ठ मानवतावाद सावरकरांनी प्रचारात आणला आणि मानवतावाद जेव्हा विज्ञाननिष्ठ असतो, तेव्हा तो कृतिप्रवण होतो. समाजसंस्थेचा जुना पाय उद्ध्वस्त करून आधुनिक बुद्धिवादाच्या तत्त्वावर, म्हणजेच सावरकरी भाषेत विज्ञाननिष्ठेच्या आधारावर समाजाची उभारणी केली पाहिजे, ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ प्रवृत्ती उद्ध्वस्त केली पाहिजे,” असे त्यांचे मत होते.
 
त्यांचे सामाजिक सुधारणेमागचे ध्येय मानवता नसते आणि केवळ हिंदुत्व, हिंदूराष्ट्र आणि हिंदू संघटन एवढेच असते, तर त्यांनी धर्मशास्त्रांना विरोध केला नसता. त्याकाळच्या कर्मठ, सनातनी लोकांचा रोषही पत्करला नसता. सावरकरांना केवळ हिंदू संघटनच करायचे असते, तर त्यांनीही सनातन्यांचीच ‘री’ ओढली असती. ते करणं जास्त सोपं होतं. त्यांचा धर्मशास्त्राला विरोध करणं असो, गोरक्षणाच्या बाबतीत त्यांची असलेली भूमिका असो किंवा मनुस्मृतीतील स्त्रियांवरील टीकेचा विरोध असो, त्यांची समाजसुधारणा ही केवळ बुद्धिवादी आणि मानवतावादी होती हेच दर्शवतो. सावरकर म्हणतात की, समाजसुधारकाला लोकप्रियतेचा बळी द्यावा लागतो. ‘सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत.’
 


की घेतले न हे व्रत अंधतेने।
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने।
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे।
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥


हे सतीचे वाण घेतलेल्या सुधारकांना ते म्हणतात की, “सुधारणा म्हणजेच कोण्यातरी दुष्ट रुढीचा उच्छेद. ही करताना सुधारकाची धिंड ही निघणारच.” ५० वर्षांची दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यावर जे सावरकर भावनिक झाले नाहीत, ते १९३१ ला ‘मला देवाचे दर्शन घेऊद्या, डोळे भरून देवास मला पाहूद्या’ हे पूर्वास्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाचे गीत लिहिताना भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते. ही मानवता नाही तर काय आहे!

 
 
 
‘माझ्या आठवणी’ या आपल्या आत्मचरित्रात सावरकर म्हणतात, “आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानव धर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर.” सावरकरांनी त्यांचे समग्र आयुष्य अस्पृश्यता निर्मूलनासाठी खर्ची घातले. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे.’ ज्या लोकांना गांधीजी ‘हरिजन’ म्हणत होते, त्याच लोकांना सावरकर ‘पूर्वास्पृश्य’ म्हणत होते. ‘जन्मजातजात्युछेदानार्थ साह्भोजनं करिष्ये’ अशी गर्जना करीत सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना सहभोजनांना आरंभ केला. या सहभोजनांची सुरुवात त्यांच्या बालपणीच झाली होती, हे मानवतेचे स्फुल्लिंग त्यांच्या समानतेच्या संस्कारांमध्ये दडलेले आहे. अंदमानात हालअपेष्टा सहन करीत असताना दरवर्षी केवळ एकच पत्र लिहिण्याची अनुज्ञा त्यांना होती. त्यांच्या लहान भावाला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “ज्यात सर्व मनुष्य जातीचा समावेश होईल आणि जेथील एकूण एक स्त्रियांना आणि पुरूषांना ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी आणि हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी आहेत. यापासून मिळणार्‍या लाभासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील, असे संपूर्ण जगाचे एक राष्ट्र हे आमचे ध्येय आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे.”
 
१९३१ साली भागोजी कीर यांच्या मदतीने सावरकरांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली. पूर्वास्पृश्यांसहित सकल हिंदूंना थेट गाभार्‍यात जाण्याची मुभा देणारे भारतातील हे प्रथम मंदिर. एवढेच नाही तर सावरकरांनी कमीत कमी ५०० मंदिर पूर्वासृश्यांकरिता मुक्त केली आहेत. स्थानबद्धतेत असताना त्यांनी महारवाड्यात भजने घडवून आणली, स्त्रियांकडून सार्वजनिक हळदी कुंकवाचे कार्यक्रम घडवून आणले. अंदमानात असताना सावरकर हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविरोधात लढले, तर दुसरीकडे त्यांनी साक्षरतेचा प्रसारही घडवून आणला. ते जेव्हा अंदमानातून बाहेर पडले, तेव्हा ९० टक्के कैदी साक्षर झाले होते. जेल अधिकार्‍यांचा तीव्र विरोध असतानाही त्यांनी दोन हजार पुस्तकांचे वाचनालय सुरु केले. १९२५ साली त्यांनी अस्पृश्य मुलांना शाळेत सरमिसळ बसविण्याचे आंदोलन हाती घेतले. समाजसुधारणेच्या कार्याला पूरक म्हणून त्यांनी लेख लिहिले, भाषणे केली. अस्पृश्य समाजातील मुलांचा व्रतबंध विधी घडवून आणला आणि त्यांना यज्ञोपवीत घातले.
 
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “सावरकरांची तत्त्वमीमांसा निरपवादपणे मानवतावादी आहे, हिंदुत्ववादी नाही.” तसेच डॉ. धनंजय कीर म्हणतात, “राष्ट्रवाद हे मानवतेच्या मार्गावरचे पाऊल आहे आणि अखिल मानावराज्य हेच मानवाचे ध्येय आहे अशी सावरकरांची श्रद्धा होती.” ‘सर्वाभूत हिते रतिः’ हे हिंदू धर्माचे ध्येय आहे. हिंदू हा केवळ धर्म नाही, ती ‘संस्कृती’ आहे, आणि हिंदूंना मानवता वेगळी शिकवावी लागत नाही. जोवर मुसलमान मुसलमानच राहू इच्छितो, तोवर हिंदूला हिंदूच राहिले पाहिजे. ‘जर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी ‘त्वे’ इतर सोडत असतील, तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल,’ असे ते म्हणतात. डॉ वि. म. शिंदे आणि आ. ग. साळवी यांनी सावरकरांच्या वैयक्तिक आठवणी सांगताना, मानवतावादी वर्तनाची अनेक उदाहरणे दिली आहेत. ते एकदा रत्नागिरीस बोटीने जात होते. बोटीचा नाविक लालखान नामक मुसलमान होता. तो सावरकरांना पाहून घाबरला, मात्र सावरकरांनी त्यास जवळ बोलावून घेतले व त्याच्या सोबत एका ताटात जेवण केले. मुसलमानांप्रमाणे ब्रिटिशांबद्दलही त्यांचे केवळ तात्त्विक मतभेद होते, द्वेष नव्हता. धर्म हा ‘वाद’ म्हणून न राहता मानवतेच्या समान पायावर विश्वाची उभारणी करायला हवी, हे त्याचं स्वप्न होतं. विश्वकल्याणासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर आणि मानवतेसाठी स्वतःचे आयुष्य खर्ची घालणारे सावरकर दोघांचीही अंतःप्रेरणा एकच!


 
(संदर्भ: स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)
 

- अश्विनी जांभेकर-पितळे

 
@@AUTHORINFO_V1@@