सावरकर आणि गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Aniket Ghivalikar_1 



आजच नव्हे तर ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हयात असतानाही ‘सावरकर-गांधी’ नांवं उच्चारताच भुवया उंचावून आणि मग आपसूक ’लेबल’ जोडले जात. या दोघांविषयी पूर्वग्रह मनात ठेवल्याने एक साचेबंदपणा त्यांच्या विचारांना चिकटला. तथापि सापेक्ष बुद्धीने तौलनिक अभ्यास करण्याची वृत्ती आवश्यक आहे.



“आमच्यामध्यें मतभेद असले तरी स्नेहात उणीव नाहीं आणि मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हें,” असें महात्मा गांधींचे सावरकरांविषयी उद्गार होते नि सावरकरांच्या मनातही त्याच प्रतीचा आदर गांधींसाठी होता. तथापि गांधींच्या प्रयोगात हिंदूंचा नाहक बळी जात आहे, असे सावरकरांचे म्हणणे होते.

पदोपदी त्यांच्या योजना, चळवळी साफ कोलमडूनही गांधी त्यांचा हेका न सोडता, सोईस्कररीत्या परस्पर विरोधी वक्तव्ये देऊन त्यामुळे हिंदूंची दिशाभूल कशी करत आहेत, याचा मुद्देसूद पंचनामा ‘गांधी गोंधळ’ यात सावरकरांनी त्यांच्या लेखनाद्वारे मांडला आहे. योगायोगही केव्हा केव्हा असे विचित्र असतात बघा. १९१६ साली काशीमध्ये झालेल्या भाषणातून भारताच्या राजकारणात गांधींचे पदार्पण हांहां म्हणता झाले. तेव्हा सावरकरांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काल अंदमानामध्ये खितपत पडून आणि नंतर रत्नागिरीत स्थानबद्धतेत गेला. म्हणजे त्यांच्या उमेदीची १९१० ते १९३७ ही २७ वर्षे राजकारणापासून पूर्णतः खंडित झालेली. १९२० साली लोकमान्य टिळक निवर्तल्यानंतर अखिल भारताच्या राजकारणाची सूत्रे आपसुकच गांधींकडे आली. सावरकर संपूर्ण बंधमुक्त होईपर्यंत राजकारण कमालीचे गुंतागुंतीचे आणि गढूळ होऊन गेले होते.

सावरकर-गांधींची प्रत्यक्ष भेट केवळ दोनदा घडली. पहिली लंडनच्या ‘इंडिया हाऊस’मध्ये आणि शेवटची रत्नागिरीत. पहिल्या भेटीतच उभयतांची खात्री पटली की ध्येय, उद्दिष्टे जरी भारताला परदास्याच्या विळख्यातून स्वतंत्र करणे असले तरी, त्यांच्यात राजकीय विचारप्रणालीत कमालीची दरी होती.

१९१७ सालात गांधींनी मुदतबंद मजूर पद्धतीला विरोध करुन आणि चंपारण्य मोहिमेत त्यांनी नियोजिलेल्या सत्याग्रहाच्या तंत्राने यश प्राप्त करुन मने जिंकून प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि जनतेचा विश्वास हेरला. परंतु, गाडं बिघडले ते १९२०च्या खिलाफत आंदोलनाने. तुर्कस्तानाचा सुलतान म्हणजे ‘खलिफा’ याचा बादरायण संबंध हिंदुस्तानाच्या स्वातंत्र्याशी जोडून या प्रश्नातून मुसलमानांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करुन त्यांचे पाठबळ मिळवता येईल, असा गांधींचा विचार होता. ती चळवळ पार धूळीस मिळाली. त्याच वेळी सावरकरांनी ’‘ही खिलाफत नाहीं, आफत आहे,” असे भाकित केले होते. ते खरे ठरुन केरळ प्रांतात मोपल्यांनी हिंदूंवर घृणास्पद अत्याचार आणि कत्तलीत त्याचे रुपांतर झाले. एवढे होऊन गांधींनी या कृत्याचे समर्थन करत “शूर मोपले,” असे उद्गार त्यांच्या ‘यंग इंडिया’मधून काढले, ज्याचा सावरकरांनी खरपूस समाचार घेतला.

शुद्धिकरणातही गांधी-सावरकरांच्या विचारात फरक होता. मुसलमान नेते उघड धर्मांतराकरिता प्रोत्साहन देत असता, गांधींनी त्यावर केव्हाही अवाक्षर काढून निषेध व्यक्त केला नाहीं. बळाने बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात शुद्ध करुन घेण्यासाठी सावरकर आयुष्यभर तत्पर राहिले. गांधींचे म्हणणे असे होते की, “अनेक पिढ्या आधी जे परधर्मात गेले आहेत, त्यांना पुन्हा हिंदू करणे म्हणजे नसते झेंगट गळ्यात बांधण्यासारखे!” यावर सावरकरांचे मत तीव्र झाले नि म्हणाले, “जर एखाद्याला अनेक पिढ्यांनंतर उपरती होऊन स्वेच्छेने हिंदू व्हायचे असेल, तर त्याचा तो अधिकारच म्हणावयास हवा!!” तेथे गांधी ‘स्वधर्मे निधनं श्रेयः’ हा गीता श्लोक म्हणून ज्याने त्याने ’त्याच’ धर्मात राहाण्याचे सूचित करतात. त्याला प्रत्युत्तर ‘कृण्वन्तो विश्वमार्यम’ या वेद ऋचेचा दाखला सावरकर देतात. शुद्धीवर झालेल्या चर्चेच्या शेवटी गांधी म्हणाले, ‘’मला माझ्या तत्वांचा एक प्रयोग तरी करु द्याल ना?” त्यावर सावरकर उत्तर देते झाले, ‘’तुमचा प्रयोग होईल, पण लोकांचा मात्र फुकट जीव जाईल!”

राजकारण वगळता सावरकर नि गांधी तत्त्वज्ञानात काही प्रमाणात साम्य आढळते, पण तुरळकच! स्वभावतः हे दोघेही उत्तर ध्रुव-दक्षिण ध्रुवच होते. तरी एकमेकांवर टीका करणार्‍या उभयतांनी प्रसंगी माणुसकीही जपली. गांधींनी २६ मे १९२०च्या ’यंग इंडिया’च्या अंकात सावरकर बंधूंच्या सुटकेची मागणी केली होती. दि. १२ फेब्रुवारी, १९४३ ला गांधींनी दिल्ली येथे २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. त्या वेळी दिल्लीला एका परिषदेनिमित्त जमलेल्या सर्व नेत्यांनी गांधींना आपले उपोषण सोडण्याबाबत स्वत:च्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन द्यावे, अशी तार सावरकरांनी सर तेज बहादूर सप्रू यांना धाडली होती. तसेच दि. २० फेब्रुवारी १९४३ ला विस्तृत पत्रक काढले- “गांधीजींचा प्राण हा नुसता त्यांचा नसून ती राष्ट्रीय मालमत्ता आणि राष्ट्रीय संपत्ती आहे. आपले प्राण पणाला लावून उपोषण करून, ज्या राष्ट्राची सेवा गांधीजी करू पाहत आहेत, त्या राष्ट्राला त्यांचे प्राण या क्षणी, ते त्यागण्याच्या तुलनेत अगणित पटीने त्याच्या (राष्ट्रा) साठी मौल्यवान वाटतात.” दि. ६ मे १९४४ या दिवशी ब्रिटिश सरकारने गांधींची आगाखान पॅलेसमधून सुटका केली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी पत्रक काढून, गांधीजींचे उतारवय, ढासळत असलेली प्रकृती आणि नुकतेच झालेला तीव्र आजार लक्षात घेऊन सरकारने केलेल्या सुटकेमुळे संपूर्ण राष्ट्राला हायसे वाटत असल्याचे सावरकरांनी नमूद केले.

धर्माविषयी विचार मांडताना शब्दप्रामाण्य दोघेही नाकारतात. पण, त्यातही गांधी त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या दगडावर घासून नंतर त्यातले तत्त्वज्ञान निवडतात, तर सावरकर विज्ञाननिष्ठ प्रमेयांच्या कसोटीवर टिकणारे तत्त्वज्ञानास प्राधान्य देतात. सावरकरांचा बुद्धिवादी तर्कनिष्ठ विचार आजही भल्याभल्यांना न झेपणारा ही वस्तुस्थिती आहे. गांधींचे तत्त्वज्ञान सामान्य लोकांना समजण्यास तेव्हाही सोप्पे होते. कारण, ‘सत्य’ या तत्त्वाचे रुपांतर ‘लोकशक्ती’त करुन हेच अस्त्र सत्याग्रह म्हणून वापरायचे, असे होते. सावरकरांना विशिष्ट मर्यादेपर्यंत असहकार मान्य होता, पण स्वाभिमान कुठल्याही स्थितीत गहाण ठेवणे हे त्यांच्या प्रकृतीला धरुन नव्हते.

आजच नव्हे तर ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हयात असतानाही ‘सावरकर-गांधी’ नांवं उच्चारताच भुवया उंचावून आणि मग आपसूक ’लेबल’ जोडले जात. या दोघांविषयी पूर्वग्रह मनात ठेवल्याने एक साचेबंदपणा त्यांच्या विचारांना चिकटला. तथापि सापेक्ष बुद्धीने तौलनिक अभ्यास करण्याची वृत्ती आवश्यक आहे. किंबहुना, आताची आमची पिढी काहीही आंधळेपणाने न स्वीकारता किंवा कुणालाही भक्तिभावाने केवळ नमस्कार न करता चौकस विचाराने या विषयाकडे पाहतात.

अखेरीस, सावरकर आणि गांधींच्या कार्याचा पाया ‘त्याग’ या तत्त्वावर आधारित होता, हे कोणालाही नाकारता येणार नाही. तथापि, राजकारणाचा मामला लक्षात घेता नाईलाजास्तव असे म्हणावे लागते की, सावरकरांना आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीतच झुंजावे लागले, तर गांधींना नेहमी अनुकूल दान पडूनदेखील त्याचे फळ सकारात्मक झाले नाहीं हे दुर्दैवाने सत्य होय!
- अनिकेत घिवलीकर




@@AUTHORINFO_V1@@