सावरकर नास्तिक आणि अध्यात्मविरोधी होते का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Veer Savarkar _1 &nb

वीर सावरकर नास्तिक, अध्यात्मविरोधी तर नव्हतेच, उलट ते मनाने, कार्याने उच्चप्रतीचे अध्यात्मवादी होते. प्रथम आपण अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्मवादी कोण? याची संक्षिप्त चर्चा करून हे विशेषण सावरकरांना किती प्रमाणात लागू पडतं, याचं परीक्षण करू.


‘अध्यात्म’ या शब्दातला प्राणभूत घटक आहे आत्मा, ‘अधि’ म्हणजे विशेष. काय आहे आत्मा? समजायला अवघड आणि आत्मसात करायला कठीण अशी ही संकल्पना. यात असं अनुस्यूत आहे की, अणूपासून ब्रह्मांडापर्यंत अवघी जडसृष्टी आणि मन बुद्धी अंत:करण चेतनायुक्त अशी यच्चयावत् जीवसृष्टी, सर्व एकाच ‘आत्मा’ या अंतिम सत्याचे निरनिराळे आविष्कार आहेत. ज्यांना आत्म्याहून वेगळं अस्तित्व तत्त्वतः नाही. व्यवहारत: त्यांचं वेगळेपण लाटांचं समुद्राशी असतं तसं आहे. प्रत्येक लाट स्वतंत्र वस्तू म्हणता येईल, ती उद्भवते, उसळते, लय पावते. पण, वस्तुतः समुद्राहून वेगळी नसते. सर्व जीव निर्जीव आत्मसमुद्रावरच्या लाटा आहेत, त्यांना उत्पत्ती-स्थिती-लय आहे, पण समुद्र म्हणून त्या अखंड, एकरस आहेत.


आता अध्यात्म म्हणजे आत्म्याचं शास्त्र, जे प्रतिपादन करतं की मनुष्य एकदा का स्वतःच्या आत्मरूपाशी एकरूप झाला की, त्याची जन्ममरणपरंपरा संपून तो मोक्षपदाला जातो. त्यासाठी त्याला आपण हे क्षणभंगुर शरीर नसून आपलं अस्तित्व या चराचराला व्यापून उरणार्‍या आत्म्याएवढं आहे याची अनुभूती घ्यावी लागते. या अनुभूतीसाठी शरीर, मन, बुद्धी आणि स्वतःच्या सर्व क्षमता एखाद्या उदात्त ध्येयाला समर्पाव्या लागतात, जीवनाचा होम करावा लागतो. या प्रकारचा ज्याचा आचार असतो त्याला ‘आध्यात्मिक प्रकृतीचा’ असं भारतीय अध्यात्मशास्त्रात मानलं जातं. ज्ञानाच्या असीम ओढीसाठी जीवापाड परिश्रमून जगाला रेडियम देणारी, मनुष्यजातीला त्याचा मुक्त उपयोग होण्यासाठी पेटंटही न घेणारी मेरी क्युरी, या व्याख्येनुसार आध्यात्मिकच ठरते.


चंदनाला जसं आपण सुगंधी आहोत हे सांगावं लागत नाही, तसचं आध्यात्मिक व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक असल्याचा डांगोरा पिटावा लागत नाही, उलट त्यानं तो तसा पिटला तर ते त्याचं ढोंग असण्याचीच शक्यता असते. आध्यात्मिकतेच्या या अर्थाच्या प्रकाशझोतात सावरकरांचं अवघं आबाल्यवार्धक्य जीवन सूक्ष्मदृष्टीनं न्याहाळलं तर त्यांचं निरपवाद अध्यात्मवादित्व निश्चित लक्षात येईल.

त्यांनी नाकारलेल्या, फोल ठरवलेल्या स्वर्गनरकादी कल्पना, या पार्श्वभूमीवर तपासल्या तर लक्षात येईल की, ज्याच्या आध्यात्मिक धारणेला ‘मोक्ष’ हे अंतिम ध्येय असतं, तो ‘स्वर्ग’ ही कल्पना थिल्लरच मानतो, ज्या वैदिक ऋषिपरंपरेचा सावरकर अभिमानाने उल्लेख करतात, त्या ऋषिप्रणीत वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये स्वर्ग-नरकाचाच काय, पण कुठल्याही कथित अवतारांचाही उल्लेखही नाही, त्या कल्पनांचा उगमही नाही आणि त्यामुळे निषेधही नाही. पौराणिक वाड्.मयात या गोष्टी आल्यात पण प्रत्येक जीव, आत्म्याचं प्रतिबिंब आहे असं मानल्यानंतर वेगळ्या अवताराची कल्पनाच संभवत नाही.


अध्यात्मवादी हा मुळातच सर्व विश्वात आत्म्यसाम्य पाहात असतो आणि स्वतःच्या पिंडात ब्रह्मांड पाहात असतो, (यो माम् पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति-गीता) त्यामुळे त्याला सर्व जगत् प्रिय असतं, त्यातलं उन्नत, उदात्त, उत्कट ते घेत तो त्याच्या आयुष्याची आत्मपरिक्रमा पूर्णत्वाला नेत असतो. या परिक्रमेसाठी ज्याभोवती फेर धरायचा ते एखादं मानव्य विस्तारणारं महान ध्येय तो त्याच्या प्रकृतीप्रमाणे निवडतो आणि त्याच्या सर्व वृत्ती, क्षमता त्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी वेचतो. मग तो गॅलिलिओ, न्यूटनसारखा महान शास्त्रज्ञ असो, कालिदासासारखा महाकवी असो, मरण समीप येऊन ठेपलं तरी शब्दवेध घेणारे महावैय्याकरण पाणिनी असोत की सीमेवर गोळ्या घालत गोळ्या झेलणारे शूर सैनिक असोत, जे जे देह आणि दैहिक अस्तित्वाच्या पार जाऊन उदात्त जीवन जगतात आणि आपलं मर्त्य जीवन त्याच कार्ययज्ञात आहुती म्हणून अर्पितात ते ते आध्यात्मिक या कोटीत येतात.


उघड आहे की असे महात्मे कुणाचाच द्वेष त्याच्या जातीवरून, भाषेवरून, देशावरून कधीच करीत नाहीत. देशस्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी युद्ध पुकारलेले सावरकर त्या लोकांच्या अनुशासन, देशभक्ती आदी गुणांचे प्रशंसक होते. त्यांची इंग्रजी भाषा त्यांनी इतकी आत्मसात केली होती की, एखाद्या ब्रिटिश प्राध्यापकालाही त्यांचा हेवा वाटावा. उर्दूतही त्यांनी अंदमानमध्ये सुंदर काव्यरचना केली. कुणी कट्टरपंथी असं आचरण करेल का?


आता सावरकर हे जर अध्यात्मवादी होते, तर अशा व्यक्तीला शत्रू-मित्र समानच असले पाहिजेत, अशी व्यक्ती ’साप विषारी मातृभूमिचा ये घेऊ चावा, ठकवुनि भुलवुनि मारुनि ठेचुनि कसाही चेचावा’ अशी ’भयानक’ हिंसेची शिकवण कशी देऊ शकते? असा भोळसट प्रश्न, आध्यात्मिकतेची अतिरेकी अहिंसेशी सांगड घालणं ज्यांच्या हाडीमाशी रुळलं आहे अशा आपल्याला पडेल. पण, ही शत्रुमित्रांमधली समता ज्या गीतेसारख्या आध्यात्मिक ग्रंथात सांगितली आहे (सम: शत्रौ च मित्रे च) तिच्यातच त्या परमआध्यात्मिक श्रीकृष्णाने अर्जुनाला भीष्मद्रोणांसह कौरवांचा शिरच्छेद करायला प्रवृत्त केले आहे, ते न करणं म्हणजे षंढता आहे, असं म्हणत दुष्टांसाठी अहिंसेचा उमाळा आलेल्या अर्जुनाचा निषेध केला आहे. समर्थ रामदास तर ’ठकासी व्हावे ठक’ म्हणतात. श्रीकृष्णसमर्थांची आध्यात्मिकता आणि सावरकरांची आध्यात्मिकता एकच नाही का? सावरकर अश्या भव्य भविष्याचा वेध घेत होते की ज्यावेळी देशधर्मभाषावंशाच्या पलीकडे जाऊन मनुष्यजाती एकविध एकरस एकरूप झालेली असेल.


या विशदीकरणाला दशसहस्रशब्दमर्यादाही अपुरी पडेल म्हणून एवढच सांगते, इथे सूत्ररूपात चर्चा केलेली अध्यात्मवादातली प्रमुख लक्षणं सावरकरांच्या चरित्रात विपुल आढळतील. काही दुर्लक्षू नयेत अशी लक्षणं थोडक्यात सांगते. स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमधील, ‘अरतिर्जनसंसदि’, जनसंमर्दाविषयी आवड नसणं हे एक. लाखोंच्या सभा गाजवणारे सावरकर अगदी लहानपणापासून एकाएकी शांत एकांत सेवीत असत, ‘जयासी एकांत मानवला अवघ्या आधी कळे त्याला’ हे समर्थवचन आहे. अंदमानच्या भयानक काळकोठडीत महाकाव्य स्फुरण्यासारखी ओजस्विता या अध्यात्ममूलक एकांतप्रियतेत असावी. आध्यात्मिक व्यक्तीला लौकिक व्यवहार, भातुकलीच्या खेळासारखे बालिश वाटतात. डोंगरीच्या कारागृहात ते पत्नीची समजूत काढतानाही, ते जे गमवत होते ते, ते जे मिळवू इच्छित होते त्याच्या मानानं क्षुल्लक होतं हे उल्लेखितात. पुढे काथ्या वळताना ते योगसूत्रांचं तासन्तास चिंतन करीत, तेव्हा त्यांना ही समुद्रापासून पृथ्वीसुद्धा एखाद्या कणासारखी वाटून सगळ्याच गोष्टी तुच्छ वाटू लागत.



एक गौण असलं तरी थेट गीतेतच उल्लेखिलेलं लक्षण सांगते, योग कुणाला दुःखहारक ठरतो? ‘युक्तस्वप्नावबोधस्य’, ज्याची निद्रा आणि जागृती युक्त म्हणजे नेमकी, वेळेवर असते त्याला. अंदमानच्या यमयातनांच्या काळातही वीर सावरकरांना पाठ टेकताच झोप येई आणि पहाटे ते त्या प्रगाढ निद्रेतून जागे होत. “कविता आणि निद्रा यांनी माझी साथ कधीच सोडली नाही,” असं ते सार्थपणे म्हणत. अंती त्यांच्या बहुचर्चित नास्तिकतेविषयी थोडक्यात सांगते. जगातल्या सगळ्यात अव्याख्येय, गोंधळलेल्या कल्पनांमध्ये ‘नास्तिकतेचा’ समावेश होईल. आपल्याकडे थेट अद्वैती शंकराचार्यांना, ‘द्वैती आचार्य नास्तिक’ म्हणतात, आस्तिकतेची सर्वमान्य व्याख्या नसल्यामुळे नास्तिकतापण अत्यंत सापेक्ष कल्पना ठरते.

‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ या अत्यंत तत्त्वपरिप्लुत निबंधात सावरकर सहजच लिहून जातात की, ‘भोगात रुचि आहे, योगात समाधी आहे.’ त्यांना अभिप्रेत अर्थ असा आहे की, सर्वसामान्यपणे भोगात असलेली अत्यंत आस्वाद्य रुची, गोडवा जो सुखकर आहे, तशीच एक उच्च प्रकारची सुखकारकता समाधीत आहे. त्याच निबंधात ते म्हणतात, ‘’हे पंचेंद्रियग्राह्यजगत् ज्या योगायोगानं घडलं किंवा घडवलं, त्यातील आपल्याला असलेला जो अनुकूल भाग आहे, त्यासाठी तरी त्या विश्वाच्या देवाला एखादं कृतज्ञतेचं सुमन अर्पिण्यास काही प्रत्यवाय नाही.” असं उद्घोषिणार्‍या वीर सावरकरांना ‘आस्तिक’ आणि ‘आध्यात्मिक’ का म्हणू नये?


- गीता उपासनी
@@AUTHORINFO_V1@@