कर्नाळ्यात 'तिबोटी खंड्या'चे आगमन; पक्षीप्रेमी-पर्यटकांना प्रवेश बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |
bird_1  H x W:
 
 
 

विणीमधला व्यत्यय टाळण्यासाठी संचारबंदीचा फायदाच

 
 
 
मु्ंबई (विशेष प्रतिनिधी) - पावसाची चाहूल लागली नसली तरी, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात तिबोटी खंड्या (Oriental dwarf kingfisher) पक्ष्याचे आगमन झाले आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे अभयारण्य बंद असल्याकारणाने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना या पक्ष्याचे दर्शन घेता येणार नाही. एकाअर्थी या पक्ष्याच्या विणीमध्ये हौशी छायाचित्रकारांची होणारी लुडबुड लक्षात घेता लाॅकडाऊनमुळे लागू असलेल्या संचारबंदीचा फायदाच झाल्याचे मत वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 

bird_1  H x W:

 
 
पाऊसाची चाहूल लागल्यानंतर साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या हरितक्षेत्रात आकर्षक अशा तिबोटी खंड्या पक्ष्यांच्या आगमनाला सुरूवात होते. कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. याठिकाणी हे पक्षी दरवर्षी काही संख्येने प्रजननाकरीता दाखल होतात. कर्नाळा अभयारण्यात यंदाच्या हंगामातील पहिल्या तिबोटी खंड्याचे आज आगमन झाले. अभयारण्याचे वनरक्षक युवराज मराठे यांनी आज सकाळी या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. दरवर्षी कर्नाळ्यात तीन ते चार तिबोटी खड्यांच्या जोड्या विणीसाठी दाखल होत असून आज केवळ एकच पक्षी निदर्शनास आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये आणखी पक्षी अभयारण्यात दाखल होण्याची शक्यता त्यांंनी वर्तवली. लाॅकडाऊनमुळे अनायसे अभयारण्य बंद आहे. संचारबंदी असल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी अभयारण्य बंद असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी अभयारण्यात तिबोटी खड्यांच्या घरटांच्या परिसरात हौशी छायाचित्रकारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे विभागाने अभयारण्यातील पक्ष्यांच्या प्रजननाच्या काही जागांवर प्रवेश बंदी केली होती.
 
 

bird_1  H x W:  

 
भारतात आढळणाऱ्या खंड्या पक्ष्यांच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकाराने सर्वात लहान खंड्या आहे. या पक्ष्यांच्या समावेश स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होत असला तरी तो केवळ प्रजननासाठी मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात येतो. त्यानंतर सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्याच्या दरम्यान पुन्हा दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. मुंबईतील त्याच्या विणीचा काळ अत्यंत नाजूक मानला जातो. कारण, याच कालावधीत हे पक्षी प्रजनन करुन आपली संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, बऱ्याचदा उत्साही छायाचित्रकार आणि पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांच्या प्रजननामध्ये व्यत्यय ठरतात. या पक्ष्याला मानवी हस्तक्षेपाची जाणीव झाल्यावर तो त्याठिकाणी आपले घरटे बांधत नाही. तिबोटी खंड्या मातीमध्ये बीळ खोदून आपले घरटे तयार करतो. सर्वसाधारणपणे नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस कडेला असणाऱ्या मातीमध्ये हे पक्षी बीळ खणून त्यामध्ये आपले घरटे तयार करतात.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@