अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरेंचे राज्यपालांना पत्र!

    26-May-2020
Total Views |

Raj _1  H x W:




विद्यार्थ्यांचा विचार करताना कोणत्याही राजकारणाला थारा देण्यात येऊ नये अशी राज ठाकरेंची विनंती


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना वाढता संसर्ग पाहता सद्य स्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षांचा हट्ट कशासाठी आणि कोणासाठी केला जातोय? या महामारीच्या काळात लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर निघण्यास सांगून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात घालण्याची गरज आहे का?, असे प्रश्नही राज ठाकरे यांनी पत्रातून केले आहेत.


परीक्षांच्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते मात्र आता मे महिना सुद्धा संपत आला तरी याबाबत निर्णय होत नाहीये, असे करून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य काळोखात टाकू नये, अशी विनंती राज यांनी कोश्यारी यांना केली आहे. निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये ही विनंत, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.





एकीकडे राज यांनी परीक्षा रद्द करण्याची विनंती केली असतानाच याचा अर्थ म्हणजे सर्वांना सरसकट पास करणे असा होत नाही, हे सुद्धा स्पष्ट केले आहे. मागील सत्राच्या गुणांवर तसेच आता घरून करता येतील असे काही प्रोजेक्ट्स देऊन परीक्षा व्हाव्यात पण त्यासाठी घराबाहेर पडून लेखी परीक्षा देण्याचा हट्ट करू नये असेही राज यांनी म्हंटले आहे. राज यांच्या पत्रावर आता राज्यपाल कोश्यारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलगुरू या नात्याने भगतसिंह कोश्यारी याबाबत काय निर्णय घेतील याकडे मागील अनेक दिवसांपासून सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय समोर आलेला नाही. यापूर्वी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा यूजीसीला पत्र लिहून पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचाही परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे अनेक शिक्षण तज्ञांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पास केल्यास त्यांच्या पदवीला किंमत उरणार नाही असेही मत व्यक्त केले होते.