‘पॅराऑलिम्पिक’ पदकविजेती पलक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

palak kohali _1 &nbs
शारीरिक अपंगत्वातून खचून न जाता आपल्या जीवनात जीवापाड मेहनत आणि संघर्ष करत अवघ्या १२व्या वर्षी ‘पॅराऑलिम्पिक’ स्पर्धेचे तिकीट मिळविणार्‍या पलक कोहलीच्या आयुष्याविषयी...

जगात विविध क्रीडाप्रकार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाचे राष्ट्रीय खेळ वेगवेगळे असले तरी सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांना जगभरातील नागरिकांची पसंती आहे. भारतातही या क्रीडा प्रकारांना काही प्रमाणात प्रसिद्धी असून या खेळांतील भारतीय खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करत जगभरात आपले नाव कमावले आहे. या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाच्या जोरावरच भारताचा क्रीडाक्षेत्रात एक वेगळा दबदबा आहे. त्यामुळे क्रीडा प्रकारांतील सर्वोच्च अशा ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी केवळ क्रिकेटमधील खेळाडूंचीच नव्हे, तर अन्य खेळांमधील खेळाडूंनाही भारत सरकारकडून प्राधान्य दिले जाते. ऑलिम्पिकमधील अनेक खेळांच्या प्रकारात भारतीय खेळाडूंनी पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात या क्रीडा प्रकारांनाही भारतात मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ऑलिम्पिकपासून ते पॅराऑलिम्पिकपर्यंतच्या सर्व खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करत भारताची मान जगभरात उंचावली आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे तितुके कमी म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशाला पदक मिळवून देण्यासाठी हे खेळाडू जीवापाड मेहनत करतात. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला जातो.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. या ‘लॉकडाऊन’काळात संपूर्ण क्रीडाविश्व स्थिरावले आहे. ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्पर्धाच होत नसल्यामुळे अनेक खेळाडूंनी आपला सरावही बंद केला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही आगामी पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी एका दिव्यांग खेळाडूने आपला सराव कायम ठेवला आहे. १७ वर्षीय दिव्यांग बॅडमिंटनपटू दिव्यांग कोहलीने ‘लॉकडाऊन’ काळातही आपला सराव सुरु ठेवला असून नित्यनियमाने ती पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. तिचे हे वागणे प्रेरणादायी असून अनेक खेळाडूंनी तिचे याबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. आपल्या घरापासून लांब असतानाही सराव न थांबवता पलक बॅडमिंटन स्पर्धेची तयारी करत आहे. आपल्या घराजवळच कोर्ट तयार करून दिवस-रात्र ती सराव करत आहे.


पलक कोहली ही मूळची पंजाबी आहे. १६ नोव्हेंबर २००२साली तिचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. लहानपणापासूनच तिला विविध क्रीडा प्रकारांत रस होता. मात्र, का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते. पलकच्या डाव्या हाताला जन्मतःच अपंगत्व आहे. त्यामुळे विविध क्रीडा प्रकारांत इच्छा असूनही तिला सहभागी होण्यात अडचणी येत होत्या. अपंगत्व असले तरी खचून न जाता, आपण इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करायची आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटनपटू व्हायचेच, असा चंग तिने मनाशी बांधला होता. यासाठी ती लहानपणापासूनच कसून सराव करत असे. शालेय अभ्यासक्रमासोबतच बॅडमिंटनचाही ती नित्यनियमाने सराव करत असे. दिव्यांग असल्याने अनेकदा सराव आणि सामन्यांदरम्यान पलकसोबत दुजाभाव केला जात असे. येथे शरीराने तंदुरुस्त असणारे खेळाडू पदक आणण्यात अपयशी ठरतात, तर दिव्यांग व्यक्तींचा या खेळांमध्ये कसा काय निभाव लागू शकतो, अशा प्रकारचे टोमणे अनेकांकडून मारले जात असे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करत पलकने आपला सराव सुरुच ठेवला. बोलणारे बोलत राहिले. मात्र, पलकने सुवर्ण अक्षरांमध्ये आपल्या यशस्वी कारकिर्दीची नोंद केली.

जालंधरकडून खेळताना पलकने अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये यश मिळवले. शालेय वयातच पलकने अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर ती सर्वत्र प्रकाशझोतात आली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यशस्वी झाल्यानंतर पलकने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणखीन कसून तयारी केली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर पलकला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून पॅराऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळाले. आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळण्याची संधी मिळाल्यानंतर पलकचा आनंद गगनात मावेनासा झाला. ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळविताना अनेकांचे संपूर्ण आयुष्य खर्ची जाते. मात्र, ती संधी मिळत नाही. पलकने मात्र वयाच्या १२व्या वर्षीच ही किमया केली असून याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.



सध्या बारावीत असलेली पलक जालंधरमधील डीएव्ही शाळेत शिकत असून गेल्या वर्षी तिने राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. टोकियो पॅरालिम्पिक पात्रता स्पर्धांत तिने चार पदके जिंकली आहेत. तिने पारुल परमारसह युगांडा पॅरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गेल्या वर्षी दुहेरीचे सुवर्ण जिंकले होते. त्यामुळे आगामी स्पर्धेत ती भारतासाठी पदक नक्कीच जिंकेल, अशी आशा तमाम भारतीयांना असून पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा...
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@