ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला अधिकार नाही- राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

ut and raga_1  

ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला अधिकार नाही- राहुल गांधी


नवी दिल्ली : सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे, यात फरक असतो. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही सरकारला पाठिंबा दिला असली तरीही ठाकरे सरकारमध्ये आम्हाला अधिकार नाही, असे स्पष्ट वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केले आहे. त्यामुळे काँग्रेसला आता राज्याच्या सत्तेत रस उरला नसल्याचाच संकेत राहुल गांधी यांनी दिला आहे.

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक धोरणावर टीका केली. त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारशी काँग्रेसचा केवळ पाठिंबा देण्यापुरताच संबंध असल्याचे त्यांनी अगदी स्वच्छ शब्दात सांगितले.

 

महाराष्ट्रात देशातील एक तृतीयांश रुग्ण आहेत, दररोज तेथे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रात तुमचे (काँग्रेसचे) सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारलाही तुम्ही काही सुचना देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

 

उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा देत आहोत. मात्र, राज्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. आम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि पाँडिचेरी येथे आहेत. त्यामुळे सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे, यातला फरक समजून घेणे गरजेचे आहे. असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्या उत्तरामुळे राज्यात नव्या राजकारणाची सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

यापूर्वी देखील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्या नाही असे वक्तव्य केले होते. अगदी काही दिवसांपूर्वीच हे सरकार आमचे नाही, हे शिवसेनेचे सरकार आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे कोरोनाविरोधातील उपाययोजनांमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अपयशी ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारचा एक घटकत म्हणून अपयशाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह काँग्रेस पक्षाचीही आहे. मात्र, सरकारच्या अपयशात भागिदारी नको, यासाठी आता काँग्रेसने सरकारमध्ये राहुनही सरकारपासून सुरक्षित अंतर राखण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात काँग्रेस पक्ष सरकारमधून आपला पाठिंबाही काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

@@AUTHORINFO_V1@@