तब्बल दोन महिन्यांनी देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020
Total Views |

flight_1  H x W



विमानतळावरील विशेष खबरदारीसह पहिले विमान दिल्लीहून पुण्याला रवाना!


दिल्ली : देशात लॉकडाऊनदरम्यान बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सोमवारपासून सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४ मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती. ६२ दिवसांनी म्हणजेच तब्बल दोन महिन्यांनंतर विमानांनी आज टेकऑफ केले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इंडिगो विमानाने पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याच्या दिशेने पहिल्या विमानाने उड्डाण केले. तर, मुंबईवरुन पहिल्या विमानाने पाटणाच्या दिशेने सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण केले.


देशांतर्गत विमानसेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यात २८०० उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून प्रवाशांची ये-जा सुरु झाली होती. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. परंतु मनात कोरोनाची भीती असल्याचेही काही प्रवाशांनी सांगितले.


या उड्डाणांसाठी विमानतळांवर विशेष तयारी करण्यात आली होती. रात्रीपासूनच विमानतळावर प्रवाशांची गर्दी दिसली. सोशल डिस्टन्सिंगसाठी विमानतळावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. प्रवाशांना सातत्याने सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. विमानतळावर सातत्याने उद्घोषणा केल्या जात होत्या. यावेळी विमानतळावरील सर्व प्रवाशांनी मास्क परिधान केले होते.


सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी आसनव्यवस्थेतही बदल केला गेला आहे. प्रवाशांना एक खुर्ची सोडून बसण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्व प्रकारच्या तपासणी करुनच प्रवाशांना आत सोडले जात आहे. विमानतळावर सॅनिटायजर, पीपीई किट्स, मास्क्स यांसारखी साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


विमान प्रवास करताना उड्डाणाच्या किमान दोन तास आधी विमानतळावर हजर राहणे गरजेचे आहे. तसेच प्रवास करताना मास्क, हॅण्ड ग्लोव्ह्ज परिधान करणे आवश्यक असणार आहे. कमीत कमी सामानासह एक व्यक्तीला १ हॅण्ड बॅग आणि एक मोठी बॅग सोबत घेण्याची परवानगी देण्यात आले आहे.

विमान प्रावासादरम्यान ‘या’ सूचनांचे पालन करणे गरजेचे...
विमान प्रवास करत असताना दोन वेळा थर्मल स्क्रीनिंग करुन विमानात प्रवेश दिला जाणार आहे. तर, लक्षण आढळणाऱ्या व्यक्तीसाठी काही विमानतळावर क्वॉरन्टाईन सेंटरची सुविधा देण्यात आली आहे. या प्रवासादरम्यान खाण्याची सोय नसणार, मात्र पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. १४ वर्षांवरील व्यक्तीला आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असून, ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, गर्भवती, आजारी व्यक्तींना विमानप्रवास न करण्याचा सल्ला मुंबई विमानतळ प्रशासनाने दिला आहे. तसेच विमान प्रवास केल्यास दुसऱ्या शहरात गेल्यावर कमीत कमी ७ ते १४ दिवस क्वॉरन्टाईन राहणे बंधनकारक असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@