...यातच सर्वांचे भले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020
Total Views |
T-20 _1  H x W:


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वही थंडावले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले क्रिकेटचे हे चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) पुन्हा प्रयत्नशील आहे. आयसीसीची आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढील महिन्यात होणे हे नियोजित होते. मात्र, जगभरातील सध्या कोरोनाची स्थिती पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत आयसीसीने अद्याप अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. मात्र, अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी केलेल्या विधानांवरून आयसीसी ही स्पर्धा पुढे ढकलेल, असाच कयास बांधला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर ही स्पर्धा खेळविण्याचे नियोजन आयसीसीने केले होते. मात्र, इतर देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही स्पर्धा येथे होणे फार कठीण मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर आयसीसीने तातडीने निर्णय जाहीर करण्याची मागणी अनेक देशांकडून होत आहे. आयसीसीने याबाबत निर्णय घेतल्यानंतरच अनेक देशांना आपल्या मालिका आणि घरगुती क्रिकेट खेळविण्याच्या बाबतीत निर्णय घेणे सोपे जाणार आहे. ज्या देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे, अशा ठिकाणी काही अटी-शर्तींसह क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, केनिया आदी काही देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांसह इतर अटी-शर्तींसह क्रिकेट सुरु करण्याची मागणी केली जात आहे. ज्या ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणे निश्चित आहे, त्या धर्तीवर क्रिकेट लवकर सुरु होणे कठीण असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मार्क टेलर यांनी व्यक्त केले आहे. टेलर यांच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या तरी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणे कठीण असून आयसीसीने याबाबतचा स्पष्ट निर्णय जाहीर करावा, जेणेकरून इतर देशांना आपले पुढील नियोजन आखता येईल. टेलर यांच्या या म्हणण्याचे अनेकांनी स्वागत केले असून ही स्पर्धा पुढे ढकलण्यातच सर्वांचे भले असल्याचे मत अनेक क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केले आहे.



... हा तर बिनसाखरेचा चहा!


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थंडावलेले क्रिकेटविश्व पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. आयसीसीच्या एका समितीने यासाठी विविध शिफारसी आयसीसीला सुचविल्या असून ‘सोशल डिस्टन्सिंग’सह अनेक नियमांच्या आधारावर काही देशांत क्रिकेट खेळणे शक्य असल्याचे म्हटले आहे. चेंडू ओला करण्यासाठी लाळेचा वापर न करणे, घामामुळे ओले झालेल्या कापडांचा वापर टाळणे, खेळाडूंमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवणे, घोळका न करणे, जल्लोष सामूहिकरित्या न करणे आदी प्रकारच्या विविध नियमांसह क्रिकेट काही देशांमध्ये सुरु केले जाऊ शकते, अशा प्रकारच्या शिफारशी समितीने सुचविल्याची माहिती आहे. समितीच्या या शिफारशींनंतर जगभरातील क्रिकेट समीक्षकांनी याबाबत आपली मते नोंदवली आहेत. या नियमांसह सुरु केलेले क्रिकेट किती काळापर्यंत सुरु राहील, याची कोणतीच शाश्वती नसल्याचे मत अनेक क्रिकेट समीक्षक नोंदवतात. अनेक समीक्षकांना ही संकल्पनाच पटलेली नसून हा प्रयोग यशस्वी होण्याबाबतच त्यांनी शंका उपस्थित केली आहे. अनेक समीक्षकांच्या मते, या समितीने खेळाडूंचा विचार केला, मात्र प्रेक्षकांचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे. समितीच्या शिफारशींमध्ये प्रेक्षकांविनाच सामने सुरु करण्याच्या तरतुदी आहेत. समितीने यासाठी पर्यायही दिला असून प्रेक्षकांबाबतचा निर्णय ज्या त्या देशातील आयोजकांनी घ्येण्याची मुभाही दिली आहे. मात्र, खेळाडूंच्या मते प्रेक्षकांविना क्रिकेट खेळणे म्हणजे बिनसाखरेचा चहा घेण्यासारखे आहे. प्रेक्षकांविना क्रिकेटचे सामने खेळणे म्हणजे क्रिकेटच्या भवितव्यासाठी ते मारक ठरण्यासारखे आहे. अनेक देशांतील नागरिकांच्या पसंतीचा हा खेळ असल्याने प्रेक्षकांशिवाय मैदानातील सामने कधीच ‘हाय व्होलटेज ड्रामा’ ठरणार नाही. त्यामुळे क्रिकेटचे महत्त्वच नाहीसे होईल. म्हणून प्रेक्षकांविना सामने हे क्रिकेटच्या भवितव्यासाठी मारक ठरतील, असे अनेकांचे मत आहे. दुसरीकडे प्रेक्षकच सामन्यांसाठी न आल्यास तिकीटवारीतून येणार्‍या नफ्याची उणीव भरून तरी कशी काढायची, हादेखील एक महत्त्वाचा प्रश्न आयोजकांपुढे उभा ठाकला आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या या नियमांसह क्रिकेटचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास आयसीसी पुढील क्रिकेट स्पर्धांना परवानगी देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, समीक्षकांच्या या तिखट प्रश्नाच्या मार्‍यासमोर सध्या तरी याबाबत निर्णय होण्याची शक्यता धूसरच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@