दुरितांचे तिमिर जावो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020
Total Views |
together-everything-is-po




आपले संवाद जर निर्मळ आणि मोकळे असतील, तर ‘लॉकडाऊन’नंतरचा ‘कोविड- १९’बरोबरचा प्रवास सोपा होईल. माणसांची नाती अभंग राहतील. नात्यांमधला घरंदाजपणा आणि माननीयता शाबूत राहतील.



‘कोविड-१९’ने आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर एक अविस्मरणीय छाप सोडली आहे, हे निश्चितच. अर्थात, अशा गोष्टी अनपेक्षित आणि त्रासदायक असल्याने आापले मन त्या झेलायला तयार नसते. जग आधुनिक झाले आहे. आपण तांत्रिक जगातल्या ऐहिक गोष्टींचा जबरदस्त मनस्वी लाभ घेत असतो. हे जरी सत्य आपण मानले तरी ‘कोविड’ महामारीच्या भीषण उपस्थितीत आपण इतके नक्कीच जाणून घेतले की, आधुनिक युगाच्या गुंतागुंतीत आपण अनेक प्रकारची अनिश्चितता आणि संकटांच्या मालिकेतूनसुद्धा जात असतो. 

जैविक दहशतवाद, वातावरणातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग आहेच ; पण शिवाय आपली जुनी दुखणी जसे की धर्म, जात व आर्थिक भेदभाव यांचे अस्तित्व आजही वादातीत आहे. कोरोना विषाणूच्या दुर्दैवी आगमनाने आपले दिवसाचे संपूर्ण गणितच बदलून गेले. दिवसाच्या गणिताने आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी बिघडली आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याने सभोवतालचे जगही बदलायला लागले.


बुद्धाच्या तत्वज्ञानात प्रत्येक गोष्टीत एक बंधन असते. या महामारीत विश्वाचे हे अतूट बंधन आपण अनुभवतोच आहोत. आपल्या स्वतःच्या बाबतीतही आपण जी स्वच्छता बाळगणार आहोत, भौगोलिक दूरी बाळगणार आहोत, त्यामुळे केवळ आपलेच नाही, तर इतर विश्व बांधवांचेसुद्धा रक्षण होणार आहे. बुद्धाचे तत्वज्ञान मूलभूत आहेच. पण, त्यात दयाभाव आणि परानुभूती आहे. आपलं ऐहिक अस्तित्व एकमेकांच्या अस्तिवावर अवलंबून आहे. आपण जेव्हा एकमेकांबद्दल आपली जबाबदारीची जाणीव प्रामाणिकपणे समजतो, तेव्हा आपल्याला जगातल्या एकमेकांबरोबरच्या या अतूट बंधनाची संकल्पना हे एक गंभीर आणि ज्ञानी सत्य आहे हे पटतं.

प्रेमाने ओथंबलेले दयाळूपण, परानुभूती, आनंद आणि समताभाव या महत्त्वाच्या गोष्टींमुळे आज आपल्या मनात जी अनामिक चिंता आणि मृत्यूची अविरत भीती दाटली आहे, ती नक्कीच निघून जाईल. आपल्या मनात भीतीदायक आणि निराशेच्या विचारांचे ढग दाटले आहेत, पण जेव्हा परानुभूतीचा व दुसर्‍यांबद्दल वात्सल्याची जाणीव आपल्या मनात प्रकाशित होईल, तेव्हाच आपल्या मनाचे आकाश निरभ्र होईल, हे खरे. आपण ‘सोशल डिस्टन्सिंग’ आज ‘कोविड-१९’च्या विळख्यात सापडलो असल्याने पाळत आहोत. पण, तरीही सहृदयता या काळात खूप मोलाची आहे, हे निश्चितच! या काळात खरे तर आपण आपल्या नात्यांची खूप काळजी घ्यायला हवी. आपण कोरोनानंतरचे जे ‘नवे दैनंदिन’ ‘New Normal' राहणार आहोत, त्या प्रवासात आपल्या सर्व जुन्या नात्यांचे संगोपन आणि संवर्धन हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. या धकाधकीच्या अस्वस्थ आणि अनिश्चिततेच्या प्रवासात आपण एकमेकांची साथ दिली, तर या निबर संकटातून आपण एकजुटीने आणि समर्थपणे बाहेर पडू! 

त्यासाठी आपल्याला खूप कठीण आणि न पचणारे निर्णय स्वीकारावे लागतील. एकमेकांची साथ देण्याचे जुने मार्ग बदलायला लागतील. पृथ्वीच्या दोन टोकांवर आपण कदाचित राहणार असू, तर दुरूनच आपले प्रेम व्यक्त कसे करायचे आणि ते कसे टिकवायचे, याचा नवा मार्ग आपल्याला शोधायला लागेल. गावभोजनाची संकल्पना आता मोडीत काढून गावाचा विकास कसा करायचा, ग्रामबंधूभगिनींचे आरोग्य कसे राखायचे, या गोष्टींकडे आपल्याला समर्पित लक्ष द्यावे लागेल. जमीनदार, इनामदार, शेतकरी आणि मजदूर सगळ्यांनी एकत्रित होऊन सगळ्यांच्याच भल्यासाठी निर्णय घ्यायची वेळ आली आहे. एखादा न पटणारा कठीण निर्णय सगळ्यांनाच कारण किंवा लॉजिकनुसार पटवून सांगायची गरज आज महत्त्वाची भासत आहे. ‘मी आणि मीच’, ‘माझे आणि फक्त माझेच’ हे गणित आता तरी काही कामाचे नाही, हे ‘कोविड-१९’ने स्पष्ट आणि साध्या भाषेत आपल्याला सांगितले आहे. 

ते आपल्या ज्ञानेंद्रियांना व्यवस्थित कळले तरी खूप आहे. आपले संवाद जर निर्मळ आणि मोकळे असतील, तर ‘लॉकडाऊन’नंतरचा ‘कोविड- १९’बरोबरचा प्रवास सोपा होईल. माणसांची नाती अभंग राहतील. नात्यांमधला घरंदाजपणा आणि माननीयता शाबूत राहतील. काही नाती दुर्दैवाने टिकतील, याची आज ग्वाही देता येत नाही. असुरक्षितता, अवसावधानघातकी आणि आत्मकेंद्रित प्रवृत्तीसुद्धा आपल्या दुर्भाग्याने बळावल्या आहेत. सुबक आणि सुंदर नात्याची काच खळकन फुटते आहे. ज्यांनी ही काचेची नाती तेवढ्याच संवेदनशीलतेने हाताळायला हवीत, तशी हाताळली नाहीत, तर मात्र खूप कठीण आहे. आज नात्यांमधली बांधिलकी खूप महत्त्वाची आहे. ती बांधिलकी जपली, तरच नवीन दैनंदिन जगता येणं शक्य आहे. हे नात्याचं अस्तित्व खरं तर भेसूर भोगातून घट्ट आणि अभेद्य होतं असं म्हणतात. आपण त्या नात्यांमधली लवचिकता आणि जागरूकता विश्वाला जीवनप्रकाश देवो, ही प्रार्थना देवाकडे करुया. माऊलींच्या शब्दांत म्हणायचे तर




ममम_1  H x W: 0


दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥

- शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@