ऑलिम्पियन बलबीर सिंग सिनिअर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020   
Total Views |


balbir singh sr_1 &n


ज्येष्ठ हॉकीपटू आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तीनवेळा सुवर्णपदक जिंकणारे बलबीर सिंग सिनिअर यांच्या जीवन संघर्षाबद्दल...


भारतामध्ये हॉकीला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नसली, तरीही या खेळाबद्दल भारतीय तरुणांमध्ये तेवढेच प्रेम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हॉकीमध्ये ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने केलेली कामगिरी. भारतीय क्रीडा इतिहासामध्ये अनेक असे हॉकीपटू आहेत, ज्यांच्यामुळे या खेळाला एक वेगळे महत्त्व आहे. भारताचे सर्वात प्रसिद्ध हॉकीपटू ध्यानचंद यांच्यानंतर हॉकीमध्ये अनेक प्रसिद्ध नावे होऊन गेली. उधम सिंग, धनराज पिल्ले, रूप सिंग ते आताच्या घडीचे सरदार सिंग, मनप्रीतसिंग, अमित रोहिदास अशी अनेक नावे भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र, ध्यानचंद यांच्यानंतर आणखी एक महान खेळाडू त्याकाळी होते, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय हॉकी संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ते म्हणजे पंजाबच्या मातीतले ‘बलबीर सिंग दोसांज’ अर्थात त्यांना हॉकीविश्वात ‘बलबीर सिंग सिनिअर’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले, याशिवाय त्यांनी नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणूनही काम केले. चला तर मग पाहूया त्यांच्या जीवनसंघर्ष...
 

बलबीर सिंग दोसांज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९२४ मध्ये पंजाब प्रांतातील हरिपूर खालसामध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. देव समाग हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डी. एम. महाविद्यालय आणि अमृतसरमधील प्रसिद्ध खालसा महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९३६ साली बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीमध्ये पदक जिंकले होते. यावरूनच बलबीर सिंग यांना हॉकीमध्ये खेळण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी शालेय जीवनात हॉकी खेळण्यास सुरुवात केली. पुढे खालसा महाविद्यालयातील हॉकी संघाचे प्रशिक्षक हर्बेल सिंग यांनी त्यांच्यातील हॉकीतील प्रतिभा हेरली आणि त्यांना पुढे खालसा महाविद्यालयाकडून खेळण्याची संधी दिली. पुढे बलबीर सिंग यांनी पंजाब विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये पंजाब विद्यापीठ संघाने सलग तीन वर्षं या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. पुढे फाळणीनंतर बलबीर सिंग कुटुंबासहित लुधियाना येथे स्थायिक झाले. तिथे त्यांना पंजाब पोलीसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांनी १९४७ ते १९६१ या कालावधीमध्ये पंजाब पोलीस हॉकी संघाचे कर्णधार पद भूषवले. दरम्यान, हॉकीमधील कामगिरीमुळे बलबीर सिंग यांना ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बलबीर सिंग यांनी अर्जेंटिनाविरुद्ध सहा गोल केले. हा सामना भारताने ‘९-१’ असा जिंकला होता. पुढे सिंग यांनी अंतिम सामन्यात दोन गोल करून ब्रिटनविरुद्ध सामन्यामध्ये विजय मिळवला आणि एक सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा झाले. पुढे १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाचे उप-कर्णधार पद भूषवले होते. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यामध्ये ब्रिटनविरुद्ध खेळत असताना सिंग यांनी सलग तीन गोल करून हॅट्ट्रिक साजरी केली. पुढे नेदरलँड्सविरुद्ध अंतिम सामन्यामध्ये भारताने सहा गोल करून पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले होते. विशेष म्हणजे, या सहा गोलपैकी पाल गोल हे बलबीर सिंग यांनी केले होते. पुढे त्यांनी मेलबर्न ऑलिम्पिक १९५६ मध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार पद भूषवले. याच वर्षाच्या सलामीच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळताना पाच गोल केले. पुढे त्यांनी उपांत्य अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून सलग तिसर्‍यांदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. भारतीय संघातर्फे त्यांनी आठ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्यांनी भारतासाठी तब्बल २२ गोल केले.
 
१९५७ मध्ये बलबीर सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातून ‘पद्मश्री’ जिंकणारे ते पहिलेच खेळाडू ठरले. पुढे १९५८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचेदेखील ते सदस्य होते. बलबीर सिंग आणि गुरदेव सिंग यांची प्रतिमा ही डोमिनिकन रिपब्लिकने जारी केलेल्या पोस्टल तिकिटावरदेखील छापण्यात आली होती. हे टपाल तिकीट १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्मरणार्थ देण्यात आले होते. १९७१ मध्ये झालेल्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय संघाने यामध्ये कांस्यपदक जिंकले होते. पुढे त्यांनी भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पहिले. त्यानंतरही भारतीय संघाने अनेक विक्रम रचले. बलबीर सिंग व्यवस्थापक असताना भारताने १९६२ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. पुढे १९७० मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदक, तर १९७१ मध्ये बार्सोलीना येथे झालेल्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले. पुढे १९८२ मध्ये जागतिक हॉकी स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले. २०१५ मध्ये त्यांना ‘मेजर ध्यानचंद लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भारतीय हॉकी इतिहासामध्ये त्यांचे नाव हे सुवर्णअक्षरात कोरले गेले आहे. त्यांच्या या कामगिरीला दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून मानवंदना...

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@