पालघर साधूहत्या : दत्तात्रय शिंदेकडे पालघरच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा

    23-May-2020
Total Views |

palghar _1  H x





पालघर
: पालघर साधू हत्याकांड प्रकरणात पालघर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंह  यांना सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले होते. त्यानंतर आज सिंग यांची पोलीस अधीक्षक पदावरून उचलबांगडी करत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची धुरा दत्तात्रय शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दत्तात्रय शिंदे हे सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) मुंबई येथे कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत आहेत. तिथून कार्यमुक्त होऊन तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. शिंदे यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग, सांगली आणि जळगाव येथे समर्थपणे काम पाहिलेले आहे.




पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी रात्री जमावाच्या हल्ल्यात दोन साधू व त्यांच्यासोबत असलेल्या वाहनचालकाला प्राण गमवावे लागले होते. पोलिसांच्या हजेरीत ही घटना घडल्याने या घटनेचे गांभीर्य आणखीच वाढले होते. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यांनतर या प्रकरणी राज्य सरकारने संबंधित हल्लेखोर तसेच पोलिसांवरही कारवाईचा बडगा उगारला.



palghar_1  H x



गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले गावात जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्याचदिवशी पालघर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून स्थिती योग्यरितीने हाताळण्यात अपयशी ठरल्याने पोलीस अधीक्षक गौरव सिंह गृहमंत्र्यांच्या आदेशाने सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले होते. या पदाचा तात्पुरता कार्यभार उपजिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान, गौरव सिंह सक्तीच्या रजेवर असतानाच त्यांची पालघरमधून उचलबांगडी करण्यात आली. याबाबतचा आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढला आहे. सिंह यांची बदली करताना त्यांच्याजागी दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सिंह यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांचं नाव प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले आहे. तूर्त सिंह सक्तीच्या रजेवरच असणार आहेत.