श्रीरामद्रोही शिवसेना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |

agralekh_1  H x


बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचा जाहीर पाणउतारा केला त्यांच्या तालावर नाचत असल्याने शिवसेनेच्या करारी बाण्याची सध्या रया गेल्याचे दिसते. हे करारीपण काँग्रेसच्या चुलीत घातल्याने शिवसेनेला आता मोगली बाबराची बिर्याणी हवीहवीशी वाटते. जिभल्या चाटण्यासाठी त्यातला एक एक घास मिळावा म्हणून शिवसेनेला अयोध्येचा नि श्रीराममंदिराचा विसर पडतो.


सत्तेची लालसा इतकी वाईट की राजकारण्यांना प्रत्यक्ष भगवंताशी बेईमानी करण्यातही शरम वाटत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेच्या कैफात बुडालेल्या शिवसेनेला हे विधान तंतोतंत लागू पडते आणि त्याचा दाखला त्याच पक्षाच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी दिला. “कोरोना संकटाच्या काळात राम मंदिर, भारत-पाकिस्तानसारख्या मुद्द्यांना बाजूला ठेवले पाहिजे. आता देशासमोर सर्वात मोठे संकट कोरोना विषाणू असून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे वक्तव्य शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांच्या शब्दांतून असा भास होऊ शकतो की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील तिघाडी सरकारने कोरोनाचा कोथळा बाहेर काढला नि आता घाबरागुबर्‍या झालेल्या कोरोनाने जीव वाचवण्यासाठी चंबुगबाळ आवरत थेट मुंबई-महाराष्ट्रातून धूम ठोकली.



परंतु, तसे अजिबात नाही, नावापुरते ‘महाविकास’ असलेल्या पण प्रत्यक्षात ‘महाभकास’ ठरलेल्या सरकारच्या नाकावर टिच्चून कोरोनाने राज्यात ठाण मांडले असून दररोज दीड-दोन हजार रुग्ण मुंबई-महाराष्ट्रात आढळत असल्याचे, शेकड्यांनी मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरुन समजते. कित्येक रुग्णांना तर रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकादेखील नाहीत आणि त्यामुळे अनेकांचा रस्त्यावर तडफडून जीव गेल्याचा दुर्दैवी प्रकारही घडला. अनेक रुग्णालयांतील डॉक्टर्स-परिचारिकांना पुरेशा ‘पीपीई किट्स’ नाहीत, चाचण्या करण्यासाठीची पुरेशी साधनसामग्री नाही. परिणामी, कोरोना संक्रमणात राज्य देशात पहिल्या क्रमांकावर गेल्याचे, ठिकठिकाणी वैद्यकीय अराजक माजल्याचे आणि महाराष्ट्र कडेलोटावर उभे असल्याचे स्पष्ट होते.



मात्र, राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना डोळ्यावर काळी पट्टी बांधलेल्या शिवसेनेच्या संजयाने त्याकडे दुर्लक्ष करत रणांगण गाजवल्याचा आव आणला. परंतु, संजय राऊत यांनी आधी कोरोनामुळे उजाड झालेले स्वतःचे अंगण पाहावे आणि नंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेशची-अयोध्येची काळजी करावी. तिकडे योगी आदित्यनाथ समर्थ आहेत, एकाचवेळी कोरोनाशी झुंजण्यासाठी आणि श्रीराम मंदिरनिर्मितीसाठीही! तुमच्यासारखे घरात बसून गरम पाणी प्या आणि गाण्याच्या भेंड्या खेळण्याचे सल्ले ते देत नाहीत, तर प्रत्यक्ष मैदानात उतरुन कोरोनाला आळा घालण्याची हिंमतही बाळगतात. म्हणूनच संजय राऊत यांनी कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना व मित्रपक्षाच्या आरोग्यमंत्र्यांना-गृहमंत्र्यांना द्यावा. त्यामुळे निदान महाराष्ट्राची जी वाट लागलीय, त्यात झाली तर थोडीफार सुधारणा तरी होईल.



दरम्यान, गुरुवारी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी सपाटीकरण-खोदकामावेळी मंदिराचे अवशेष, खांब, तोरण, मूर्ती आणि भव्य शिवलिंग तिथे काम करणार्‍या कामगारांना सापडले. स्वातंत्र्यानंतर गेली ७० वर्षे श्रीरामजन्मभूमीस्थळी मंदिर नव्हतेच, असे छाती ठोकून सांगणार्‍या डाव्या इतिहास लेखकांच्या आणि पुरातत्त्ववेत्त्यांच्या थोबाडावर यामुळे सणसणीत चपराक बसली. देशाची संस्कृती आणि वारसा मिटवू पाहणार्‍या समाजद्रोही-हिंदुद्रोही प्रवृत्तीने गाडून टाकण्याचा प्रयत्न केलेला हिंदूंवरील अत्याचाराचा-मुस्लीम आक्रमकांचा क्रूर इतिहास यातून जगासमोर आला. सर्वोच्च न्यायालयाने तथ्यांच्या आधारे नव्हे, केवळ भावनेच्या आधारे श्रीरामजन्मभूमीबद्दल निर्णय दिला, असा आरोप करणार्‍यांचे दावे फोल ठरले. पण तरीही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, या तत्त्वाने वागणार्‍या प्रवृत्ती देशात आहेत. त्यापैकीच एक असलेल्या अयोध्या खटल्यातील सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील आणि ऑल इंडिया बाबरी मशिद कमिटीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी हा सगळा ‘प्रपोगंडा’ असल्याचे म्हटले.



अर्थात, जफरयाब जिलानी मुस्लीम असल्याने आणि त्यांची संबंधित ठिकाणी बाबराने अत्यंत पवित्र भावनेने मशीद बांधल्याची श्रद्धा असल्याने ते असेच काहीतरी बरळणार. पण संजय राऊत किंवा शिवसेनेच्या डोक्यावर परिणाम होण्याचे कारण काय? एकेकाळी ‘श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलनातले म्होरके आम्हीच,’ अशा शब्दांत श्रेय घेण्याची संधी शोधणार्‍या शिवसेनेला आज श्रीराम मंदिर नकोसे होण्याचे कारण काय? तर त्याचे उत्तर दिल्लीत ‘१०, जनपथ’समोर सत्तेसाठी घातलेल्या मुजर्‍यातच दिसेल. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचा जाहीर पाणउतारा केला, त्यांच्या तालावर नाचत असल्याने शिवसेनेच्या करारी बाण्याची सध्या रया गेल्याचे दिसते. हे करारीपण काँग्रेसच्या चुलीत घातल्याने शिवसेनेला आता मोगली बाबराची बिर्याणी हवीहवीशी वाटते.



जिभल्या चाटण्यासाठी त्यातला एक एक घास मिळावा म्हणून शिवसेनेला अयोध्येचा नि श्रीराममंदिराचा विसर पडतो. कोरोना आल्यानंतर ‘देव मैदान सोडून पळाले’ म्हणणारी शिवसेना ऐन मोक्याच्या वेळी हिंदुत्वापासून पळ काढते. गेली कित्येक वर्षे हिंदू हिंदू केलेल्यांना हिंदूंची, हिंदूंच्या आराध्य दैवताची आठवण राहिली नाही नि सत्तेत चूर झालेल्यांनी आता तुष्टीकरणाचे राजकारण आरंभल्याचेच हे लक्षण. अर्थात ज्यांना सत्तेच्या खुर्चीवरुन जनतेने हाकलून लावले, त्यांच्याशी पाट लावल्याने शिवसेनेला आता बाळासाहेबांच्या भक्तीपेक्षा दिल्ली-बारामतीची गुलामी श्रेष्ठच वाटणार म्हणा! नि त्यातूनच सत्तेचे पंख लावलेल्या शिवसेनेने शतकानुशतकांपासून आसावलेल्या हिंदूंच्या भावभावनांवर वार करत थेट श्रीराम मंदिरनिर्मिती बाजूला ठेवा म्हणण्यापर्यंत मजल मारल्याचे स्पष्ट होते.



मात्र, श्रीराममंदिरनिर्मिती थांबवण्यासाठी कोरोनाचा हवाला देणार्‍या संजय राऊत किंवा शिवसेनेने गेल्या दोन-अडीच महिन्यांत कधी राजकारण बाजूला ठेवले नाही. सीएसआर निधी, पीएम केअर फंड, ‘तबलिगी’ जमातीचा कार्यक्रम, पालघर साधूहत्या अशा प्रत्येक मुद्द्यांत शिवसेना किंवा मित्रपक्षांनी राजकारण केले. तेव्हा त्यांना कोरोनाकाळात राजकारण बाजूला ठेवण्याचे सूचले नाही. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा विषय तर अजूनच वेगळा. भाजप नेते कोरोनावर नियंत्रणाच्या चर्चेसाठी राज्यपालांशी संवाद साधत होते तर संजय राऊत आणि शिवसेनेला त्यातही राजकारणच दिसले. खरे म्हणजे उद्धव ठाकरेंवर ‘मी निवडणूक लढवणार नाही,’ असे म्हणण्याची वेळ काँग्रेसने आणली होती, पण शिवसेनेने त्यातही भाजपला ओढले. कोरोनाकाळात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण आपण बाजूला ठेवायला हवे, असे त्यावेळी शिवसेनेला समजले नाही. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचे सांगत सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली.



पण, कोरोनाकाळात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडवणारी दारुची दुकाने उघडण्याचा मुद्दा बाजूला ठेवावे, असे संजय राऊत किंवा शिवसेनेला सूचले नाही. राज्यपालांनी कोरोनाविषयी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारताना कोरोनाने घातलेले थैमान मुख्यमंत्र्यांना दिसले नाही. तिथेही त्यांच्या मनात ‘राज्यपाल हा भाजपचा माणूस’ हेच भिनलेले होते, पण त्यावेळी त्यांना राजकारण बाजूला ठेवावे व बैठकीला हजर राहावे, असे वाटले नाही. भाजपविरोधात सोनिया गांधींनी बोलावलेल्या विरोधी पक्षीयांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मात्र उद्धव ठाकरे अगत्याने सामील झाले. त्यावेळी कोरोनाकाळात राजकारण करण्यासाठी सोनियांनी पाठवलेले बैठकीचे समन्स बाजूला ठेवण्याची हिंमत ठाकरेंनी दाखवली नाही किंवा संजय राऊतांनीही त्यांना तसा मोलाचा सल्ला दिला नाही. आज तेच संजय राऊत कोरोनाकाळात ‘श्रीराम मंदिरनिर्मितीचा मुद्दा बाजूला ठेवा,’ असे अतिशय निर्लज्जपणे सांगताना दिसतात.



परंतु, गेली २५ वर्षे आणि आताच्या निवडणुका होईपर्यंत शिवसेनेने ज्या हिंदुत्वाच्या आणाभाका-शपथा घेतल्या, त्या यातून पायदळी तुडवल्याचे स्पष्ट होते. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाचे कैवारी म्हणत शिवसेनेमागे फिरण्यात आयुष्य झिजवले, त्यांच्या भावना लाथाडायचे काम शिवसेनेने यातून करुन दाखवल्याचे दिसते. शिवसेनेने प्रथमतः भगवंताशी सत्तेसाठी नाते जोडले आणि आता सत्ता येताच धोकाही दिला, पण सर्वसामान्यांचे काय? सर्वसामान्य जनता तुमच्याइतकी निर्ढावलेली, कोडगी अजिबात नाही. सोन्याचे ताट असलेली सत्ता तुम्ही मिटक्या मारत भोगत असाल, पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हिंदुत्वाचा बळी देणार्‍या तुम्हाला सर्वसामान्य जनता शेणात टोची मारणार्‍या कावळ्याहून भिन्न मानत नाही. शिवसेना आज सत्तेसाठी, सोनियांची मर्जी खप्पा होऊ नये म्हणून ‘श्रीराममंदिरनिर्मिती बाजूला ठेवा,’ असे म्हणत असेल. पण, शिवसेनेने हे नेहमी लक्षात ठेवावे की, जनतादेखील तुमच्यासारख्या श्रीरामद्रोह्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून एक ना एक दिवस बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत जो काय फालतूपणा करायचा असेल तो करत राहावा.

@@AUTHORINFO_V1@@