दिल्लीलाच उद्धव नकोसे...?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2020   
Total Views |

 


Uddhav Thackeray_1 &

 

 


पृथ्वीराज चव्हाण काही अन्य वाचाळवीर नेत्यांप्रमाणे नाहीत. काँग्रेसची हायकमांड संस्कृती आणि ‘ल्यूटन्स दिल्ली’च्या दरबारी राजकारणात मुरलेले नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणे यात सर्वांत मोठा इशारा म्हणजे काँग्रेसला आता सत्तेत राहण्यात रस उरलेला नाही, असाच असू शकतो.

 

 


भोंगा वाजला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याभोवती वादळ घोंघावू लागण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या हातातून निसटत असतानाच राजकीय आघाडीवरही तसेच काहीतरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अरुण साधू आणि जब्बार पटेलांच्या ‘सिंहासन’ सिनेमात जशा पडद्यावर एक आणि पडद्यामागे दुसर्‍याच घटना घडत असतात, त्याचप्रमाणे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडताना दिसत आहे काय, अशी शंका येते. त्यात तथ्य असल्यास उद्धव ठाकरे काही ‘सिंहासन’मधले मुख्यमंत्री जीवाजीराव नाहीत. त्यामुळे चित्रपटात मुख्यमंत्री जीवाजीराव ज्याप्रमाणे अर्थमंत्री दाभाडे यांचे कारस्थान उधळून लावतात, तसे काही उद्धव यांना जमेल, असे दिसत नाही. एक मात्र आहे, चित्रपटात मुख्यमंत्री जीवाजीरावांना त्यांच्याविरोधात कारस्थान सुरू असल्याचा एक निनावी फोन येतो आणि जीवाजीराव सावध होतात. अगदी तशाचप्रकारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ठाकरे कुटुंबाचे हितचिंतक - मित्र डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला दिला आहे. आता उद्धव ठाकरे त्यावर काय भूमिका घेतात, यावर सर्व काही अवलंबून आहे; मात्र आता भोंगा वाजला आहे.

 



महाविकास आघाडी सरकार कसे आकारास आले, एकेकाळी धर्मांध असलेली शिवसेना काँग्रेसला अचानक प्रिय कशी झाली, अजित पवारांनी कसे बंड वगैरे केले, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची कशी खोड मोडली या सर्व गोष्टी आता चघळून कंटाळा आला आहे. कारण, त्यातले नाट्य आता संपले आहे आणि नव्या नाट्याचा भोंगा वाजला आहे. (नाटकाच्या सुरुवातीला एरवी घंटी वाजते, पण इथे भोंगा वाजतोय). नव्या नाट्याच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते उत्तम छायाचित्रकार तर आहेतच. मात्र, ते आता ते उत्तम अभिनेतेही असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण, कॅमेर्‍यासमोर अगदी निर्विकार चेहर्‍याने यायचे, मुद्द्याचे न बोलता भोंगळ काहीतरी बोलायचे आणि निघून जायचे, असा सध्याचा मुख्यमंत्र्यांचा दिनक्रम. कोरोनाचे नेमके गांभीर्य त्यांना आहे की नाही, हे समजायला मार्ग नाही.

 


कारण, मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी आता व्हेंटिलेटरवर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रात आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव व्हायला लागला आहे आणि अशा परिस्थितीत अनेक जणं आता म्हणायला लागले आहेत की, ‘कोरोनासोबत जगायला शिका.’ म्हणजे काय करायचे? बरं! ‘आमची तयारी आहे कोरोना सोबत जगायची, पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची? कोरोना जर का तयार नसेल तर आपण तरी कसं त्याच्या सोबत जगणार?’ अशा शब्दात मुख्यमंत्री बोलत असतील तर जनतेने राज्य सरकारवर विश्वास ठेवू नये, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या मुंबईवर शिवसेनेचे दीर्घकाळपासून राज्य आहे, ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे,’ यावरच ज्यांचे राजकारण पोसले गेले, त्याच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मुंबई धोक्यात येणे हा शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणाचा पराभवच म्हणावा लागेल. असो.

 

 


भाजपला धोबीपछाड देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्याचे पडसाद देशाच्या राजकारणावरही उमटले होते. कारण, भाजपचा दीर्घकाळापासूनचा वैचारिक साथीदार, कडव्या हिंदुत्वाची भूमिका वगैरे सदैव जपणार्‍या शिवसेनेने भाजपला जो हिसका दिला, त्यामुळे भाजपविरोधकांना जरा धीर आला होता. कारण, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या तडाख्याने प्रादेशिक पक्षांच्या पाठीवरचे वळ तेव्हा ताजेच होते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेमुळे नितीश कुमारांसह अनेकांना नाही म्हटले तरी थोडा आनंदच झाला होता. अर्थात, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार तयार असले तरीही काँग्रेसच्या गोटातून बराच विरोधही झाला होता. विशेषत: राहुल गांधी गटाकडून. कारण, काँग्रेसमध्ये आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नसतात. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐकून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू नये, असे राहुल गांधी गटाचे ठाम म्हणणे होते. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला काहीही मिळू देणार नाही, याची त्यांना खात्री होती. त्यात राहुल गांधीदेखील शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते. मात्र, शरद पवारांची मध्यस्थी, मनधरणी कामी आली आणि सोनिया गांधींनी सरकार बनवायला हिरवा कंदील दिला. मात्र, हा निर्णय मनापासून नव्हता, तर सत्तेत जाण्याविषयीच्या अगतिकतेतून होता, हे विसरता नये.

 



आणि खरा खेळ तर सत्तास्थापनेनंतरच सुरू झाला. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे महत्त्वाची म्हणजे गृह, आरोग्य आदी खाती स्वत:कडे घेतली आणि अन्य खाती काँग्रेस, शिवसेनेसाठी सोडली. म्हणजे सरकारमध्ये केंद्रस्थानी न दिसता पडद्यामागून सूत्रे आपल्याच हाती कशी ठेवावी, हे राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तम जमते. हे सर्व होत असताना उद्धव ठाकरे मात्र नव्या मुख्यमंत्रिपदाच्या आनंदातच गर्क होते. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसनेही हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली. कारण, काँग्रेस फुकट कधीही पाठिंबा देत नाही, पाठिंब्याचा पुरेपूर मोबदला वसूल केला जातो. तसे न केल्यास काय होते, हे कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या रडण्याच्या जाहीर कार्यक्रमांमधून दिसले आहेच. नव्या नवलाईचे चार दिवस संपत नाहीत तोच कोरोनाचे संकट पुढ्यात आले आणि मुख्यमंत्रिपद म्हणजे काय, त्याची जाणीव उद्धव ठाकरेंना झाली. त्यातच पालघर झुंडबळी घटनेनंतर त्याचा त्या भागात चालणार्‍या ख्रिश्चन धर्मांतराशी संबंध आहे, असे दिसू लागल्यावर उद्धव ठाकरे किती दबावात आले होते, हे सर्वांनी पाहिले आहे. आता हा दबाव कोणी आणला, गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असूनही जनरोष हा शिवसेनेच्या वाट्याला का आला, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला नसेल तर अवघड आहे.
 

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परिस्थिती झेपत नसल्यासंदर्भात थेट विधान केले. आता पृथ्वीराज चव्हाण काही अन्य वाचाळवीर नेत्यांप्रमाणे नाहीत. काँग्रेसची हायकमांड संस्कृती आणि ‘ल्यूटन्स दिल्ली’च्या दरबारी राजकारणात मुरलेले नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणे यात सर्वांत मोठा इशारा म्हणजे काँग्रेसला आता सत्तेत राहण्यात रस उरलेला नाही, असाच असू शकतो. कारण, महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात सत्तेत असूनही काँग्रेस कुठेच दिसत नाही. मग त्यापेक्षा थेट विरोधात बसणे काय वाईट, असा विचार काँग्रेस हायकमांड करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील, एक म्हणजे राज्य सरकारच्या अपयशामध्ये भागीदारी घ्यायची वेळ न येणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेतून खाली खेचणे. त्यामुळे सुरुवातीपासूनच सेनेसोबत जाण्यास नाखूश असलेल्या राहुल गांधी गटाने दिल्लीत पुन्हा उचल खाल्ली असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळत आहेत. कारण, कोणतीही जबाबदारी न घेताही सत्तेच्या केंद्रस्थानी राहणे शक्य होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल, याची शक्यता तशी धुसर वाटते. अर्थात, शरद पवारांनी वसंतदादांसारख्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा इतिहास पाहता उद्धव ठाकरे तर फारच नवखे. त्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर राजीनामा देऊन आघाडीतून बाहेर पडण्याची हिच योग्य वेळ आहे. ती न साधल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला उद्ध्वस्त करतील, अशा स्पष्ट शब्दात उद्धव यांना सल्ला दिला आहे. आता त्या सल्ल्याकडे गांभीर्यांना पाहायचे की, आणखी काही महिन्यांनी रडवेला चेहरा करूनच जनतेशी संवाद साधायचा, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. पण, आता भोंगा मात्र वाजला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@