काँग्रेसची फेकमफाक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020   
Total Views |
INC _1  H x W:




आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कुठलाही व्हिडिओ, फोटो चुकीच्या संदेशासह सर्रास व्हायरल केला जातो. पण, नंतर अवघ्या काही तासांतच त्यातील फोलपणा उघडकीसही येतो. मग ते संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने काश्मीरचे नसलेले फोटो ‘काश्मिरींवरील भारताचे अत्याचार’ म्हणून खपवण्याचा केलेला प्रयत्न असो वा नुकतेच काँग्रेसच्या सुरजेवालांनी स्थलांतरितांच्या वेदना म्हणून नेपाळी महिलेचा शेअर केलेला फोटो असो. गोष्ट शेवटी एकच. आपल्या आजवरच्या चुकांमधूनही हा पक्ष काहीही शिकलेला नाही आणि यापुढेही त्यात काही सुधारणा होतील, अशी अपेक्षाच मुळात बाळगणे मूर्खपणाचे. ‘लॉकडाऊन’च्या या काळात लाखो मजूर शहरे सोडून गावांकडे वळू लागले. राज्य सरकारांनी बसेसची, केंद्राने श्रमिक रेल्वेची सोय करुनही कित्येक मजूर आपला जमेल तसा संसार पाठीवर घेऊन हजारो किमीच्या पायी प्रवासाला निघाले. त्यात दुर्दैवी अपघातांच्या घटनाही घडल्या. यावरुन राज्य सरकारांऐवजी काँग्रेसने सवयीप्रमाणे केंद्रावरच टीका केली. राहुलने स्थलांतरितांची भेट घेऊन डाव खेळला, तर प्रियांका वाड्रा स्थलांतरितांसाठी उत्तर प्रदेशात एक हजार बसचे फुटकळ आश्वासन देऊन फसल्या. दोघांवरही टीका झाली. त्यात काँग्रेसच्या रणदिप सुरजेवालांनी एक गरीब महिला सायकलवर पाठीला आपल्या लेकीला आणि पाठी सामानाचे गाठोडे बांधून रस्त्यावरुन निघाल्याचे छायाचित्र ट्विट केले. त्याला कॅप्शन दिले, ‘न्यू इंडिया का सच.’ कालांतराने तो फोटो भारतीय महिलेचा नसून नेपाळी महिलेचा असल्याचे उजेडातही आले. मोदी सरकारची देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलीन करण्याच्या अश्लाघ्य प्रयत्नांचाच हा भाग. काँग्रेस काही पहिल्यांदा तोंडावर आपटलेली नाही, यापूर्वीही बरेचदा काँग्रेसने असेच विदारक फोटो भारताचे म्हणून फेकमफाक करायचा प्रयत्न केलेला दिसतो. काँग्रेसच्या अमेरिकाई नारायणन या नेत्यानेही असाच 2018 सालचा पाकिस्तानातील काही मुलांचा पायांचा भेगाळलेला फोटो ‘भारतातील मजुरांच्या वेदना’ म्हणून असाच व्हायरल केला होता. आता परत तीच चूक. या चुकांमधूनही हा पक्ष आणि या पक्षाचे नेते सुधारण्याची चिन्हे नाहीत. पण, जर का असेच सुरुच राहिले तर काँग्रेस त्यांच्याच नेते-कार्यकर्त्यांमुळे एक दिवस ‘भारतमुक्त’ होईल, यात शंका नाही.


शिक्षितांचा अशिक्षितपणा...



मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी आता मोहल्लावाल्यांबरोबरच सोसायटीतील काही शिक्षितांचा अशिक्षितपणा नुकताच उघडकीस आला आहे. घाटकोपरच्या पंत नगरमध्ये चक्क अशीच एक समोसा पार्टी रंगली. एक माणूस त्यात चक्क गिटार वाजवतोय. दुसरा समोसे वाटतोय. काहींनी चेहर्‍याला मास्क लावलेला, पण समोसे ठुसायचे म्हटले की मास्कला कोण विचारतयं... हा प्रकार एका झोपडपट्टीतला, कामगार, मजूर वस्तीतला नाही, तर सुक्षिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांच्या परिसरातून उघडकीस आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही समोसा पार्टी आयोजकांना ताब्यात घेतलेच. पण, या अशा घटनेमुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, सुशिक्षित, सर्व खबरदारीचे उपाय समजणारे, त्यांचे पालन करु शकणार्‍यांना असा संकटात सामूहिक समोसा पार्टीचा अडाणीपणा कसा काय सुचू शकतो? ‘लॉकडाऊन’मुळे सगळेच बंदिस्त आहेत. घरात बसून कामधंदे नसलेल्यांना कंटाळा येणेही तसे स्वाभाविक. पण, ‘कोरोनासोबत जगायचयं’ म्हणून मुद्दाम कोरोनाला हात धरुन हे अशाप्रकारे आमंत्रित करण्यात काय हशील? समोसा खायची काही लोकांना एवढीच हुक्की असेल तर त्यांनी आपापल्या घरी बिनधास्त हवे तितके समोसे तळावे. पण, अशी समोशाची पार्टी करुन कोरोनासाठी स्वत:हून दरवाजे उघडण्याचा हा प्रकार निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल! ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरही लगेच सगळे काही पूर्ववत होईल, ही आशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. त्यामुळे ‘लॉकडाऊन’नंतर समुद्रकिनारी एकच गर्दी करणे, हॉटेल-क्लब्समध्ये जाऊन पार्ट्या झोडणे, मॉलमध्ये भटकंती करणे हे सगळे कोरोनाशी गळाभेट करण्यासारखेच. तेव्हा, ‘कोरोनासोबत जगायला शिका’ याचा अर्थ ‘कोरोना आहेच, पण आधीचीच जीवनशैली जशी होती, तशीच चालू द्या,’ असा नव्हे. आपले शिक्षण, व्यवसाय, नोकरी हे फक्त ‘सोशल स्टेटस’पुरते न मिरवता, या शिक्षणातून मिळालेला ‘नागरी शहाणपणा’ दाखवण्याची ही वेळ आहे. तेव्हा, ‘सोशलायझिंग’ची ही ‘झिंग’ सुशिक्षितांनी काही काळ तरी बाजूला ठेवावी. शिक्षणाने दिलेली मती, मतीमुळे प्राप्त वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती, याचे भान ठेवावे आणि जबाबदारीने वागावे, हीच किमान अपेक्षा.




@@AUTHORINFO_V1@@