निष्काम कर्मयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020
Total Views |


rugveda_1  H x

 

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ् समाः ।

एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥

(यजुर्वेद - ४०/)


अन्वयार्थ

 

मानवाने (इह) या जगात (कर्माणि) कर्मे (कुर्वन् एव) करीतच (शतम्) शंभर (समाः) वर्षांपर्यंत (जिजीविषेत्) जगण्याची इच्छा बाळगावी. (एवम्) अशा प्रकारे कर्मे करीत राहिल्यास (हे मानवा!) (त्वयि नरे) तुझ्यासारख्या माणसामध्ये (न कर्म लिप्यते) कर्मबंधनाचा लेप चढणार नाही. (इतः) याखेरीज (अन्यथा) दुसरा कोणताही मार्ग (न अस्ति) नाही.



विवेचन


कर्म करणे हा मानवी जन्माचा उद्देश आहे. याकरिता कर्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या मानवाला शरीर हे साधन मिळाले आहे आणि हे सारे जग म्हणजे त्याची कर्मभूमी होय. यालाच
कुरुक्षेत्रअसेदेखील म्हणतात. यर्जुवेदाला कर्मकांडपर वेद मानले जाते. पहिल्याच मंत्रात श्रेष्ठतमाय कर्मणे।असा संदेश देऊन मानवाला सर्वश्रेष्ठ कर्म करण्याची प्रेरणा दिली, तर शेवटच्या अध्यायातील वरील दुसर्‍या मंत्रात कर्माशिवाय गत्यंतर नाही. त्याने सतत काही ना काही उत्कृष्ट कामे केलीच पाहिजेत. याशिवाय तरणोपाय नाही’, असे निःसंदिग्धपणे सांगितले आहे. पहिल्या चरणात सत्कर्म करीत शतायुषी होण्याची इच्छा प्रकट केली आहे. कार्य कोणतेही असो, त्याकरिता अगोदर इच्छा-आकांक्षा असावी लागते. इच्छाच नसेल तर माणूसच काय सामान्य मुंगीसारखा जंतूदेखील काहीच करू शकत नाही. कर्म कशासाठी? तर शंभर वर्षांचा जीवनप्रवास सुकर व्हावा, यासाठी! वेदांनी माणसाकरिता अधिकाधिक ४००, तर न्यूनातिन्यून १०० वर्षांची आयुमर्यादा आखून ठेवली आहे.



यजुर्वेदात (३६
/) ही लक्ष्मणरेषा ओढताना स्पष्टपणे म्हटले आहे- पश्येम शरदः शतं, जीवेम शरदः शतम्।अर्थात, हे मानवांनो! आपण सर्वजण शंभर वर्षांपर्यंत पाहत राहू, शंभर वर्षांपर्यंत उच्चतम आदर्श जीवन जगत राहू..., बोलत राहू, ऐकत राहू...! इतकेच नव्हे तर शताधिक्य - शंभरपेक्षाही अधिक वर्षे जगत राहू! ही शतायुषाची म्हणजेच दीर्घजीवनाची कामना कशी पूर्ण करावयाची? त्यासाठी कोणते माध्यम असेल? तर हा तो वैदिक कर्मसिद्धांत! जो की मानवी जीवनाला सर्वार्थाने सफल करतो. जगणे कसेही नको, तो तर शुभच असावा. कारण, अशी उत्तम कर्मे करीत जगणे हे सार्थक ठरते. पण, कर्मे तर अनेक प्रकारची आहेत. चांगलीपण व वाईटपण कर्मे समोर नेहमी दिसतातच! जगात चांगल्या पवित्र कर्मांपेक्षा वाईट अपवित्र कर्मांकडेच लोकांचा ओढा अधिक असतो. ही सर्व कर्मे पाहून ज्ञानवंतदेखील गोंधळून जातात. याबाबतीत गीतादेखील सांगते- किं कर्म किम् अकर्म इति कवयोऽपि अत्र मोहिताः ।कर्म व अकर्म या दोन्हींबाबत कवी व विद्वान लोकसुद्धा मोहीभूत झाले आहेत. अशा प्रसंगी योगेश्वर श्रीकृष्णांनी १) कर्म, ) विकर्म व ३) अकर्म अशा कर्माच्या तीन गती सांगितल्या आहेत.



काहीही न करता आळशी बनून जगणे याला
अकर्मम्हणतात, तर विपरीत दिशेने अथवा उलट पद्धतीने कार्य करणे म्हणजे विकर्मआणि या दोन्हींना सोडून जे काही उत्तमोत्तम असे श्रेष्ठ व पवित्र असते, ते म्हणजे कर्महोय. यालाच सत्कर्मकिंवा शुभकर्मअसेही म्हणतात. यालाच वेद, उपनिषद व गीतेने निष्काम कर्मम्हणून संबोधले आहे. कुर्वन्नेवेह कर्माणिअशी पवित्र व शुद्ध कामे, जी की आत्म्याला आनंद देतात, तर समाज, राष्ट्र व मानवतेचे कल्याणदेखील त्यात दडलेले असते. श्रीकृष्णांनी सत्कर्माचे विवेचन करताना म्हटले आहे- योगः कर्मसु कौशलम्।सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये कुशलता, सत्यता व शुद्धता बाळगणे म्हणजेच योग होय. इथे असत्य व हीन कर्मांना अजिबात स्थान नाही. याच सत्कर्मांमुळे दिव्यशक्ती धारण करणारे ऋषिमुनी व विद्वान लोक आपले मित्र बनतात- सखायः कर्तुम् इच्छत ।


भगवंताने मानवाकरिता ही सृष्टी रचली आहे. नानाविध संपदेने नटलेल्या या रत्नगर्भा
, वसुंधरेला श्रेष्ठतम कर्म करणारा कर्मवीरच भोगू शकतो. वीरभोग्या वसुंधरा।याउलट दैव किंवा भाग्यावर विसंबून राहणारे आळशी, निराशेने ग्रासलेले, प्रयत्नविहीन लोक मात्र रडतराऊताप्रमाणे निष्क्रिय बनून इतरांनाच दोष देत राहतील. अशा कर्महीनांकरिता या पृथ्वीवरील सुखाची सर्व साधने कोणत्याच कामाची नाहीत... जे काहीच करीत नाहीत, अशांविषयी आचार्य भर्तुहरी म्हणतात-



येषां न विद्या न तपो न दानं

ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ।

ते मर्त्यलोके भुविभारभूताः

मनुष्यरुपेण मृगाश्चरन्ति ॥


म्हणजेच ज्यांच्याजवळ विद्या
, तपश्चर्या (श्रम), दान, ज्ञान, शील (सच्चारित्र्य), सद्गुण व धार्मिकता या सात गोष्टी नाहीत, किंवा त्यांना मिळविण्याकरिता ज्यांनी प्रयत्न केला नाही, असे ते सर्व कर्महीन लोक या मर्त्यलोकी (इहलोकात) भूमीला भारभूत होऊन मानवाच्या रुपातील पशु म्हणून जगतात. अशा कामे न करणार्‍या आळशी लोकांना वेदांनी राक्षसम्हणून संबोधले आहे- अकर्मा दस्युः ।



पूर्वापार सारे जग कर्मावर आधारलेले आहे. निसर्गातील प्रत्येक तत्व कर्मरत आहे. सूर्य
, चंद्र, पृथ्वी, वायू, झाडे, लता-वेली इतकेच काय, तर सर्व सूक्ष्म व स्थूल प्राणी हे सर्व गतिशील आहेत... कार्यमग्न आहेत. या सृष्टीरुपी यंत्राचा मानवदेखील एक अंश आहे. म्हणून हात, पाय, वाणी, नासिका, डोळे हे सर्व अवयव आपापल्या कार्यात व्यस्त असतात. त्यांना थांबणे म्हणून शक्य नाही. त्यादृष्टीने माणसाने कर्महाच धर्म व कर्महीच पूजा समजून क्रियाशीलतेशी आपले नाते जोडले पाहिजे. मानसिक व शारीरिक हालचाल थांबली की व्याधींना व दुःखांना आमंत्रण! म्हणून ’Motions is Life, Stagnation is death' हा विचार समोर ठेवून थांबायला नको...!



कारण थांबला तो संपला! याचकरिता ऐतरेय ब्राह्मण ग्रंथाने
चरैवेति चरैवेतिम्हणजे चालत राहा, चालत राहा!असा अनुपम संदेश दिला आहे. मधल्या काळात भाग्य, दैव, नशीब किंवा तकदीर अशा कपोलकल्पित संकल्पना पुढे आल्या. यांच्यामुळे माणूस कर्महीन बनला. इतकेच काय तर दैववादावर विसंबून राहिलेल्या या माणसाने व्यक्तिगत जीवनासोबतच कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय जीवनदेखील दुःखाच्या खाईत लोटून दिलेले आहे. याच भाग्यवादाने मानवाची विद्या, बुद्धी, श्रम, पुरुषार्थ, प्रयत्न या तत्वांना नेस्तनाबूत केले. यामुळे ऐतखाऊ, आळशी प्रवृत्ती वाढीला लागली. परिणामी समग्र विश्वाच्या गुरुस्थानी असलेला भारत देश-विदेशी आक्रांतामुळे पादाक्रांत झाला व शतकानुशतकांची वैचारिक, धार्मिक व सांस्कृतिक गुलामगिरी आज आपण भोगतोय.



मंत्राच्या उत्तरार्धात निष्काम कर्माचे महत्त्व प्रतिपादिले आहे.
न कर्म लिप्यते नरे ।म्हणजेच आपली कर्मे अशी असावीत की, ज्यांच्यामध्ये मानवाला बंधनांपासून मुक्त करण्याचे सामर्थ्य असावे. मनुष्य कर्मे तर खूप प्रमाणात करतो, पण ती सर्व त्याला सर्वस्वी शाश्वत सुखाच्या दिशेने घेऊन जाणारी नसतात. बहुतांशी दुःख बंधनात गुंतविणारीच असतात. चोर हा चोरीचे कर्म करतो व तुरुंगाची हवा खातो. व्यापारी धान्यात भेसळ करतो, पण पैसा वाढला तरी समाधान नाही. राजकारणी भ्रष्टाचार करतो, पण प्रजेला दुःखात टाकतो व त्यांच्याकडून उःशाप मिळवतो. गृहस्थाश्रमी स्वार्थकर्मात लिप्त होतो. तो कुटुंबाकडे लक्ष देत नाही. परिणामी घरात संस्कारविहीन संततीचा उदय होतो. याउलट निष्काम कर्म असे की, जे बंधनांपासून मुक्त करणारे असावे. याउलट माणूस सकाम कर्मामुळे बंधनात अडकला की, दुःखाकडे वळतो. यासाठी वेदमंत्र मानवास मौलिक आवाहन करतो- एवं त्वयि इतः अन्यथा नास्ति।अशा प्रकारे तुझ्यासाठी यापेक्षा (कमापेक्षा) दुसरा कोणताही मार्गच नाही. याच वेदमंत्राला आधार मानून श्रीकृष्णांनी गीतेत कर्मयोगाचा सिद्धांत मांडला आहे. त्यातील प्रसिद्ध श्लोक निष्काम कर्माचे महत्त्व विशद करणारा आहे-


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

(गीता- २/४७)


हे मानवा! तुझा केवळ कर्म करण्यातच अधिकार आहे व डोळ्यांसमोरपण कर्मशीलता हेच उद्दिष्ट! दुसरा विचारच नको. कर्म करीत असताना त्याच्या मोबदल्यात मिळणार्‍या फळांकडे मात्र दृष्टी नको. असे केल्याने हाती घेतलेल्या कामात लक्षच लागत नाही व ते सफलही होत नाही. आम्ही कर्मफळांपेक्षा कर्तव्यकर्मांचे हेतू (कारण) बनावे. असे केल्याने ते कार्य यशस्वी ठरते. याउलट कामापेक्षा त्याच्या मोबदल्यावर व फळांवर लक्ष केंद्रित केल्यास माणसाला कर्मच करावेसे वाटत नाही. कर्महीनता बळावते. म्हणून निष्काम (निरपेक्ष) कर्माचा अंगिकार करणे मानवाचे कर्तव्य आहे. फळ तर मिळणारच आहे. कारण
कर्मफलसिद्धांतहा भारतीय वैदिक तत्वज्ञानाचा आधार आहे. अशा प्रकारे निःस्वार्थ, निःस्पृह, निष्काम व अनासक्त भावनेने पवित्र, शुद्ध आणि सत्याधारित कर्मशीलता अंगिकारल्यास मानव सर्व प्रकारच्या दुःखबंधनातून मुक्त होऊन धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांचे उच्च ध्येय गाठू शकतो.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@