द्रष्टा कलासाधक ‘हरिभाऊ वाकणकर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2020
Total Views |
Haribhau Wakankar_1 


जागतिक ख्यातीचे शैलाश्रायाचे अध्ययन करणारे, पाषाणावर काढलेल्या चित्रांचा अभ्यास करणारे, त्यामधून भारताच्या आणि जगाच्या उत्क्रांतीचा इतिहास एकत्रित मांडणारे कलाकार, शैलाश्रायाचे अभ्यासक, चित्रकार, व्यासंगी, ज्ञानी, सतत ज्ञानाची आकांक्षा असणारे ‘हरिभाऊ वाकणकर’ यांच्या बद्दलची ही माहिती.


संस्कार भारतीचे संस्थापक महामंत्री ‘विष्णू श्रीधर’ तथा ‘हरिभाऊ वाकणकर’ यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.या निमित्ताने हरिभाऊंनी पुरातत्व संशोधन,शैलाश्रयातील पाषाण चित्रे, सरस्वती नदी शोध यात्रा,अशा अनेक कार्यात जे आश्चर्यकारक वाटावे असे योगदान दिले, त्याचे या वर्षभरात संस्कार भारतीच्या वतीने देशभरात कृतज्ञतेने स्मरण करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप मा.योगेंद्रजींच्या व्याख्यानाने ४ मे रोजी होत आहे.त्याचे प्रक्षेपण संस्कार भारती च्या फेसबुकवरून होईल.


स्व.नानाजी देशमुख,स्व.मोरोपंत पिंगळे, योगेंद्रजीं, दत्तोपंत ठेंगडी आणि अशाच दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये ‘विश्व हिंदू परिषदेच्या’ स्थापनेसाठी झालेल्या ‘प्रयाग’ येथील अखिल भारतीय संमेलनानंतर एका बैठकीत असे ठरले,की संघाने कलेच्या क्षेत्रात मूलभूत कामाला प्रारंभ करावा.


भारताला हजारो वर्षांपासून कलेच्या क्षेत्रातील परंपरा आहे. गायन, वादन, नर्तन, चित्रकला, शिल्पकला, रंगावली, स्थापत्यकला आणि अशा अनेक प्राचीन कलांच्या पुनरुज्जीवनाची निकड लक्षात घेऊन कामाला सुरुवात झाली. त्यासाठी संस्कार भारती हे नाव या क्षेत्रासाठी निश्चित केले. ‘सा कला, या विमुक्तये’ हे सूत्र धरून काम करताना नेतृत्व कलेच्या क्षेत्रातील असाधारण योगदान आणि जाण असणाऱ्या हरिभाऊ वाकणकरांकडे सोपवण्यात आले.


हरिभाऊ उज्जैनच्या सुप्रसिद्ध विक्रम युनिव्हर्सिटीच्या संग्रहालय विभागाचे प्रमुख होते. पुरातत्व संशोधन हे त्यांचे आवडते क्षेत्र! त्यात झोकून देऊन काम करताना हरिभाऊंना काळ, वेळ, भूक, तहान या कशाचीच जाणीव होत नसे. ते अक्षरशः दिवसरात्र अध्ययन करीत. पुरातत्व उत्खननाच्या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक एक एक प्राचीन अवशेष मातीतून काढताना तो आपल्या शेकडो वर्षांच्या वारशाचा मौलिक ठेवा आहे, या जाणीवेने स्वत: काम करत, आणि त्यांच्या साथीदारांकडूनही त्याच काटेकोरपणे काम करवून घेत. पुरातत्व संशोधनासाठी हरिभाऊ मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, दक्षिण भारत असे जवळपास संपूर्ण भारतात फिरले. त्यातून त्यांनी हजारो नाणी, ताम्रपट, कागदपत्रे, खापराचे अवशेष, जिवाश्म, प्राचीन धातुची भांडी असा प्रचंड अनमोल ठेवा शोधून काढला. त्या त्या वस्तूंची पद्धतशीरपणे नोंद करणे, त्याचा कालनिर्णय करणे, कोणत्या राजघराण्याच्या राजवटीतील तो ऐवज आहे हे अभ्यासणे, त्या वेळच्या सांस्कृतिक तपशीलाची नोंद घेणे, प्रत्येक वस्तूचे छायाचित्र काढून जतन करणे, शक्य तिथे पेन्सिलने स्केच काढणे आणि रोज केलेल्या कामाचे रोज रात्री किमान दोन अडीच वाजेपर्यंत लिखाण करणे, अशी जन्मभर तपश्चर्या हरिभाऊंनी केली.


हरिभाऊंनी मध्यप्रदेशातील भोपाळजवळ असलेल्या भीमबेटका या ठिकाणी वालुकामय पाषाणाच्या डोंगरात असलेल्या शेकडो गुहांमध्ये काही लाख वर्षांपूर्वीपासून आदिमानवाने काढलेली चित्रे, ज्याला शैलाश्रय असेही म्हणतात, त्यावर पंधरा वर्षे सातत्याने संशोधन केले व अत्यंत परिश्रमपूर्वक हा प्राचीन भारतीय पुरातत्त्वीय वारसा जगासमोर आणला. हरिभाऊंच्या या संशोधनाने साऱ्या जगातील पुरातत्व संशोधक विस्मयचकित झाले, कारण हरिभाऊंनी हे नि:संदिग्धपणे सिद्ध केले, की भीमबेटकाच्या गुहांमध्ये काढलेली चित्रे दहा लाख वर्षांपूर्वी पासून गेल्या काही शतकांपर्यंतच्या कालावधीत चितारली असून भीमबेटका हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे, की जिथे किमान एक लाख वर्षे सातत्याने मानवी अस्तित्व राहिले आहे.


त्या चारशे गुहांमध्ये असलेल्या हजारो चित्रांची चित्रशैली प्रमाणे विभागणी करणे ,त्यांचा कालावधी ठरवणे, त्यात दिसणारी संस्कृती समजून घेणे, पशू, पक्षांच्या लुप्त झालेल्या प्रजातींची त्या चित्रांवरून नोंद घेणे, त्यासाठी वापरलेले रंग कसे तयार केले असतील याचे अध्ययन करणे, आणि हे सर्व काम करताना त्याकाळी निर्जन असलेल्या त्या गुहांमध्ये वास्तव्याला असणाऱ्या हिंस्त्र श्वापदांपासून स्वत:चा बचाव करणे असे अक्षरशः अग्निदीव्य हरिभाऊ पंधरा वर्षे करीत होते. एखाद्या योग्यापेक्षाही खडतर कर्मयोग हरिभाऊ जगले. या पंधरा वर्षात त्यांचा आहार होता काटक्या पेटवून त्या आगीवर उकडलेले बटाटे, आणि दोन जाड कणकेचे रोडगे, बस्स एवढंच. आपण खाण्यासाठी जगतो, हरिभाऊ जगण्यासाठी मोजकंच खायचे.


हरिभाऊंना अनेक शिष्यवृत्ती मिळाल्या, त्यामुळे ते अमेरिका, युरोप, ईजिप्त अशा अनेक देशांत पुरातत्व संशोधनासाठी फिरले. खिशात एकही डॉलर नसताना हरिभाऊ अमेरिकेत चोवीस हजार मैल फिरले. पेन्सिल स्केचेस काढून ती रस्त्यावर बसून विकणे, त्यातून मिळालेल्या पैशातून पुढे प्रवास करणे असा त्यांचा परिपाठ असे. त्यातूनच त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले की कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वी पासून भारतीय नाविक अमेरिकेत व्यापारासाठी जात असत. वास्को-द-गामाने भारताचा कथित शोध लावण्यापूर्वी भारतीय व्यापारी सागरी मार्गाने युरोप, अफ्रिकेपर्यंत संचार करीत असत. त्यातल्याच एका चंदन नावाच्या व्यापाऱ्याच्या मागोमाग पहिल्यांदा वास्क़ो-द-गामा भारतात आला. भारत धातूच्या वस्तू, मूर्ती, मसाल्याचे पदार्थ, उत्तम कापड, सौंदर्य प्रसाधने, शस्त्रे यांची निर्यात करून त्या मोबदल्यात सोनं घेत असे, त्यामुळेच भारत प्रदीर्घ काळ सुवर्णभूमी राहिला, हे हरिभाऊंचे संशोधन.


त्यानंतर हरिभाऊंनी आणि मोरोपंत पिंगळे यांनी सरस्वती नदीचा शोध घेण्यासाठी चार हजार कि.मी.प्रवास हिमालयातील आदिबद्रीपासून हिमाचल, पंजाब, राजस्थान,गुजराथ असा केला. सरस्वती नदी इसवीसनापूर्वी दोन हजार वर्षे अगोदर लुप्त झाली. तिचा शोध घेण्यासाठी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत,पुराणे अशा प्राचीन ग्रंथामध्ये सरस्वती नदी चे जे वर्णन येते, त्याचा अभ्यास केला. अमेरिकेतून मिळवलेल्या सॅटेलाईटने घेतलेल्या छायाचित्रांशी त्या नोंदीतील सरस्वती नदी च्या तीरावरील गावांची नावे, सध्या त्यांचे अपभ्रंश रूप,त्या संपूर्ण पट्टयात विहिरींना लागणारे गोड पाणी, जुने घाट बांधलेले दगडी अवशेष, प्राचीन काळापासून वापरात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण विटा, सरस्वती नदीच्या पात्राची रुंदी ठरवून, त्या प्रवाहाची आखणी करून मरूभूमी राजस्थानात आजही तेवढ्याच पट्टा आजही हिरवागार वनराईने नटला आहे,याची खात्री करणं, अशी ही आगळीवेगळी शोधयात्रा हरिभाऊंनी यशस्वी केली. भारतीयांसाठी अत्यंत आस्थेचा विषय असलेल्या सरस्वती नदीचा जमिनी खालचा प्रवाह शोधून काढण्याचे ऐतिहासिक संशोधन केल्याबद्दल हरिभाऊंना अनेक पुरस्कार मिळाले. तसेच भीमबेटका येथील मूलभूत संशोधनासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री देवून गौरविण्यात आले.


हरिभाऊ वाकणकर म्हणजे अखंड संशोधन, अध्ययन, ते अनेकांना शिकवणे, प्राचीन वारशाचे जतन करणे, त्याबद्दलचे वस्तूनिष्ठ शास्त्रशुद्ध लिखाण करणे, असा एक चालता फिरता पुरातत्व ज्ञानकोष होता. त्यांना जगातील अनेक देशांमध्ये ‘Father Of Indian Rock Art’ अशा नावाने ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या मौलिक कार्याची ओळख करून देणारी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली.


आपले परमभाग्य, की असे सर्वस्पर्शी प्रतिभेचे धनी असलेले हरिभाऊ आपल्यात सहजतेने वावरत, त्यांच्या मोठेपणाचं दडपण इतरांवर येणार नाही, याची काळजी घेत. त्यांनी संघ स्वयंसेवक म्हणून आणि संस्कार भारतीचे महामंत्री म्हणून केलेल्या कामाबद्दल एक कलासाधक म्हणून आपण निरंतर कृतज्ञ राहून त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे,हीच आपण त्यांना वाहिलेली खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.


जी देवालय, जी शिल्प, जी चित्रकला, आणि अनेक कला, ज्या १२०० वर्षांच्या महाभयंकर परकीय आक्रमणांमध्ये जवळपास नष्ट झाल्या त्यामुळे भारताचा प्राचीन संस्कृतीचा वारसा, आमच्या कलांची हजारो वर्षांची परंपरा जणू काही लुप्त झाली यामुळे व्यथित होवून हरिभाऊंनी या कलांच्या पुनरुज्जीवनाकरता एक कार्यक्रम हाती घेतला आणि भारतीय शिल्प कला आणि वास्तुकलेचा चरम विकास ज्यांत दिसतो असे ‘कोणार्कचे सूर्य मंदिर’, त्या सूर्य मंदिराची जी चक्र होती, त्या ९ फुट व्यासाच्या चोवीस चाकांनी अप्रतिम कोरीव काम केलेल्या, सव्वा दोनशे फुट उंची असलेल्या सूर्य मंदिराची उभारणी, ज्या भारतीयांनी १२ व्या किंवा १३व्या शतकात केली, ती इतकी अभूतपूर्व होती की जगामध्ये त्या तोडीची शिल्प कला, त्या तोडीची वास्तुकला कोठेही सापडत नाही. पण इस्लामी आक्रमकांच्या विध्वंसक मानसिकते मूळे ते जवळपास नष्ट झालं तरी त्यातली शिल्लक असलेली विखुरलेली जी शिल्प आहेत त्याचं अध्ययन करून कोणार्कच्या सूर्यमंदिराचे जे चक्र आहे ते रथचक्र भारतीय कलेचं प्रमाण, कालगतीच प्रमाण, कालगती निरंतर चक्राकार गतीने गतिमान असते, त्याचे पुनरुज्जीवन शक्य आहे, या जाणीवेने संस्कार भारतीचे बोधचिन्ह म्हणून हरिभाऊ वाकणकरांनी कोणार्कच्या सूर्य मंदिराचे रथ चक्र हे प्रतिक म्हणून मांडलं आणि त्यानंतर ‘संस्कार भारतीच्या’ कार्याला सुरुवात झाली. छोट्याशा बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे.




– अभय भंडारी
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@