देशविकासासाठी ग्रामविकास...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020   
Total Views |
Manasa_1  H x W
 
 


ग्रामविकास साधताना गावातले पर्यावरण आणि पारंपरिक सकारात्मक संस्कृती संपवायची नाही. देश, मानवविकासासाठी ग्रामविकास करायचा आहे, अशा विचारांनी काम करणारे संतोष गायकवाड...




“अखिल भारतीय स्तरावरची रा. स्व. संघाची बैठक ‘केशवसृष्टी’मध्ये होती. त्यावेळी मला अचानक विमल केडियाजी म्हणाले, “आपल्या ग्रामविकास कामाची माहिती तुला द्यायची आहे.” क्षणभर मी गोंधळलो. कारण, समोर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत होते. सरकार्यवाह भैय्याजी जोशीही होते. पण, विमलजींनी धीर दिला. मी ग्रामविकासाची माहिती दिली. आपल्या ध्येयनिष्ठ कामाची माहिती आपल्या आदरणीय प्रेरणास्थानासमोर मांडली. तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस होता,”


‘केशवसृष्टी’चे विश्वस्त संतोष गायकवाड सांगत होते. संतोष यांना सामाजिक कार्याबद्दल आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक मुख्य संघटनांचे ते पदाधिकारी आहेत. अध्यात्म आणि साहित्यक्षेत्राचीही त्यांना आवड असून आतापर्यंत ‘तिरूमला तिरूपती मार्गदर्शिका’, ‘अमृतगाथा ज्ञानगुरू श्री शक्ती अम्मा’ आणि ‘उत्तुंग भरारी’ अशी त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘केशवसृष्टी’च्या ग्रामविकास योजनेत त्यांनी भरीव कार्य केले आहे.


संतोष यांचे मूळ गाव वाडा. त्यांचे वडील चंद्रकात गायकवाड आणि आई शालिनी, हे दोघेही सुसंस्कृत आणि सुविद्य कुटुंबातले. चंद्रकांत बँकेत कामाला, तर शालिनीबाई शिक्षिका. वाडा परिसरात हे जोडपे सामाजिक कार्यात अगदी धडाडीने सहभागी होत. सत्तरच्या दशकात वाडा परिसर तसा दुर्गमच म्हणावा लागेल. पण, त्यावेळी वाडा येथे वाचनालय, सामाजिक संस्था यामध्ये चंद्रकात यांचे योगदान खूप मोठे होते. शालिनीबाई तर घर आणि शाळा सांभाळून परिसरातील सामाजिक कार्यात पूर्णत: समरस झालेल्या. चंद्रकात यांच्या अंगी सामाजिक कार्याचा वसा कसा आला असेल? तर त्याचे उत्तर आहे, त्यांच्या पालकांमुळे त्यांच्यामध्ये समाजभान निर्माण झाले.



एका घटनेचा संतोष यांच्यावर खूपच परिणाम झाला. एकदा संतोष शाळेतून घरी आले. पाहतात तर काय? दोन वनवासी स्त्रिया, अंगावर धड कपडे नाहीत, चेहर्‍यावर अत्यंत दुखी भाव. त्या दोघी शालिनीबाईंना काही तरी सांगत होत्या. त्या महिलांपैकी एकीच्या अल्पवयीन मुलीला गावगुंडाने जबरदस्तीने पळवून नेले होते. त्या महिलांची दाद कुणीच घेत नव्हते. मात्र, शालिनीबाईंनी नीडरतेने हा विषय हातात घेतला. त्या महिलेला तिची मुलगी परत मिळवून दिली. त्या गुन्हेगाराला शिक्षाही मिळाली. त्या गरीब महिलेला न्याय मिळाला तो केवळ शालिनीबाईंमुळे.




मुलगी परत मिळाल्यावर त्या महिलेचे आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू खूप काही सांगून गेले. त्यावेळी संतोष यांच्या मनात आले की, आपणही शोषित- वंचितांना हक्क न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा. पुढे पाचवी-सहावीला असतानाच त्यांचा संपर्क रा. स्व. संघाच्या शाखेशी आला. गावात पुराणिक गुरूजी होते. ते शाखा चालवत. वस्तीतील मुलांना स्वत: शाखेत घेऊन जायचे. संतोष यांचे मन शाखेत रमले. खेळ, गाणी, बौद्धिक यातून त्यांच्यावर देशसेवेचे संस्कार होत गेले. त्यांचे आजोळ जव्हारचे. सुट्टीमध्ये जव्हारलाही जाणे होई.




जव्हारमध्ये आजीआजोबांचे घरही असेच समाजशील. तिथे तर रात्री कुणाची एसटी चुकली की कुणाच्या घरी राहायचे, हा प्रश्न बाहेरून आलेल्या लोकांनाही पडत नसे. त्यांचे हक्काचे घर म्हणजे संतोष यांच्या आजीआजोबांचे घर. त्यामुळे संतोष यांना वाटे की, आपण गावपाड्यासाठी, खेड्यासाठी काहीतरी केले पाहिजे. त्यातूनच मग त्यांनी ठरवले की, ग्रामविकास क्षेत्रात शिक्षण घ्यायचे. दहावीनंतर ते भिवंडीला महाविद्यालयात जाऊ लागले. पहाटे पाचची एसटी असे. पण, शिक्षण घेणे गरजेचे होते. पुढे ग्रामविकास विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईच्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पण, तिथे राहाण्याची सोय नव्हती. त्यामुळे दोन-तीन महिने वाडा ते मुंबईतील ग्रँट रोड असा प्रवास त्यांनी केला. शिक्षण पूर्ण झाले. त्यांना ‘बेस्ट’मध्ये नोकरी लागली. पण, नोकरीत त्यांचे मन रमेना. कारण, ग्रामविकासाचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना.





संतोष यांनी ठरवले की, कुटुंबाबाबतची आपली जबबादारी पूर्ण होईल इतके उत्पन्न मिळवायचे आणि बाकीचा पूर्ण वेळ समाजकार्याला वाहून घ्यायचे. विचाराअंती संतोष यांनी नोकरीचा स्वेच्छेने राजीनामा दिला. उत्पन्नासाठी एक पेट्रोल पंप मिळवला. दिवसाचा २० टक्के वेळ ते पेट्रोलपंपाच्या कामासाठी देतात, बाकी ८० टक्के वेळ ग्रामविकासासाठी. ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’साठी काम करण्याचा सल्ला, सूचना आणि मार्गदर्शनही त्यांना अरविंद मार्डिकर यांच्याकडून मिळाले. पुढे ते ते ‘केशवसृष्टी’चे विश्वस्तही झाले. हे सगळे करत असताना संतोष यांनी समाजासाठी काम करणेही सुरू ठेवले.




जातीय भेदभावाविषयी संतोष गायकवाड सांगतात, “मी चर्मकार समाजात जन्माला आलो असलो तरी मला कधीही जातीय विषमतेचे चटके बसले नाहीत की, माझ्यावर कधीही अमुक एक जातीचा म्हणून अन्यायही झाला नाही. आपला समाज खूप चांगला आहे. यात जातीय द्वेषाची तेढ न माजवता केवळ माणसासाठी काम करायचे आहे. देशविकासासाठी ग्रामविकास करायचा आहे.”


 
 
@@AUTHORINFO_V1@@