‘अम्फान’ चक्रीवादळ : पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |

PM_1  H x W: 0

अम्फान चक्रीवादळ : पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा


नवी दिल्ली: बंगालच्या खाडीत उत्पन्न झालेल्या आणि देशाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणाऱ्या अम्फान चक्रीवादळाच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आढावा घेतला. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ)च्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 

बंगालच्या खाडीमध्ये अम्फान चक्रीवादळ उत्पन्न झाले असून येत्या ४८ तासात ते बंगाल आणि ओडिशाच्या किनारी प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस देशाचे गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी. के. सिन्हा, कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांच्यासह एनडीएमए आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेण्यासोबतच नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासंबंधी एनडीआरएफच्या तयारीचीही त्यांनी समिक्षा केली. यावेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, याची ग्वाही दिली.

 

एनडीआरएफच्या महासंचालकांनी बचावकार्याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, एनडीआरएफच्या २५ तुकड्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे, तर अन्य १२ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे संभाव्य आवश्यकता लक्षात घेऊन देशाच्या विविध भागांमध्ये एनडीआरएफच्या अन्य २४ तुकड्यादेखील तयार ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

अकरा लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणार

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर महाचक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे प. बंगाल आणि ओडिशामधील सुमारे ११ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. येत्या ४८ तासात पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांच्या गंगा नदीलगतच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २० रोजी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने प. बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ प. बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावरून पुढे सरकताना १५५ – १६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, त्यांचा वेग १८५ किमी प्रतितास एवढादेखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@