...म्हणून काश्मीरचा राग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |
gambhir vs afridi_1 



पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीने काश्मीरच्या मुद्द्यावर ट्विट करत क्रिकेटसह राजकीय वातावरण तापवले. काश्मीरच्या मुद्द्यावर ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भाष्य करण्याची मजल गेल्यानंतर भारतीय खेळाडूंचाही पारा चढला. भाजप खासदार आणि माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने जशास तसे प्रत्युत्तर देत आफ्रिदीला सुनावले. गंभीरनंतर माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग आणि अन्य खेळाडूंनीही आफ्रिदीला समज दिली. आफ्रिदीने आधी स्वतःच्या देशातील परिस्थितीकडे आधी पाहावे, असा मतप्रवाह जगभरातील क्रिकेट समीक्षकांचा होता. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने वाढत असल्याने क्रिकेटसह सर्व खेळांचे विश्व थंडावले आहे. यातून सावरण्यासाठी जागतिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानलाही याचा मोठा फटका बसला आहे. पैसे नसल्याने पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डही आर्थिक डबघाईला आले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडूंना पैसे देण्यास बोर्डाकडे पैसे नाहीत. आजी-माजी क्रिकेटपटूंचे मानधन थकवण्यापर्यंत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हतबल झाले आहे. महिनोन्महिने मानधनच मिळत नसल्यामुळे माजी खेळाडूंनी प्रक्षिक्षक आणि विविध समित्यांवर काम करणे सोडून दिले आहे. आपापल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर हे खेळाडू आता कायम चर्चेत राहण्यासाठी अशाच प्रकारे काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य करून नागरिकांची पसंती मिळवताना दिसतात. पाकचे विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी स्वतःचा पक्ष काढतानाही काश्मीरच्या मुद्द्यावरूनच सर्वात आधी राग आळवण्यास सुरुवात केली होती. अनेकदा काश्मीरवरून भारतावर आगपाखड केल्यामुळेच ते सर्वत्र चर्चेत राहिले होते. अनेक वर्षांपर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावरून बोंबाबोंब केल्यानंतर ते पंतप्रधान झाले. क्रिकेटच्या मैदानानंतर राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही त्यांची परिस्थिती आजही सक्षम आहे. मात्र, इतर खेळाडूंचे तसे नाही. क्रिकेट बोर्डाकडे मानधन देण्यासाठी पैसे नसल्याने आर्थिक बाजू दिवसेंदिवस कमजोर होत असल्याने खेळाडू पुरते अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाकचे अनेक खेळाडू इतर प्रयत्नांच्या शोधात आहेत.आफ्रिदीलाही आगामी काळात इमरान यांच्या पावलावर पाऊल ठेवायचे आहे. यासाठीच त्याने केलेला हा अट्टाहास आहे. काश्मीरचा मुद्दा तर फार जुनाच आहे. मात्र, आफ्रिदीला आता हे आठवणे म्हणजे यामागे नक्की काहीतरी राजकारण शिजतंय, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.


मूर्खत्वाचे प्रमाणपत्रच!




दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने जवळपास दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका सामन्याबाबत गौप्यस्फोट केला आणि क्रिकेट विश्वातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. डेल स्टेन याने आरोप केले की, २०१० साली ग्वालियर येथे झालेल्या सामन्यादरम्यान भारताचा मास्टर-ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याला मी १९० धावांवर खेळत असताना पायचीत केले होते. मात्र, पंच इयन गोल्ड यांनी प्रेक्षकांच्या दबावापोटी सचिनला नाबाद ठरवले आणि सचिनने एकदिवसीय सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेवहिले द्विशतक साजरे करत इतिहास रचला. स्टेनने दहा वर्षांनंतर याबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर खेळाडू पायचीत (एलबीडब्ल्यू) होण्याच्या नियमांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बदल करण्याच्या मागणीने जोर धरला. मात्र, हा गौप्यस्फोट करत स्टेनने आपल्या मूर्खत्वाचे प्रमाणपत्रच सादर केल्याचे क्रिकेट विश्वातील अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे.२०१० साली जेव्हा सचिनने एकदिवसीय सामन्यांतील पहिले द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला, तेव्हा स्टेनसह दक्षिण आफ्रिकेच्या अनेक गोलंदाजांची त्याने धुलाई केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाला सचिनला बाद करता येत नव्हते. त्यावेळी संघातील एकाही गोलंदाजाला सचिनला रोखता आले नाही. फिरकीपासून ते संघातील प्रत्येक जलदगती गोलंदाज सचिनला धावा करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरला होता. सचिन जेव्हा १९० धावांवर खेळत होता, तेव्हा स्टेनने अपील जरूर केले. मात्र, पायचीत नसल्यानेच आपण त्याला बाद ठरवले नाही. त्यावेळी जर सचिनला पायचीत ठरवले असते, तर कदाचित ते चुकीचे ठरले असते. ‘अ‍ॅक्शन रिप्ले’मध्ये आपण जर पाहिले तर तो निर्णय योग्यच होता, असे स्पष्टीकरण इयन गोल्ड यांनी दिले. गोल्ड यांच्या स्पष्टीकरणानंतर स्टेनचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरल्याचे मत क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केले आहे. रिप्लेमध्ये सचिन बाद नसल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते, मात्र अभ्यास न करता अशी विधाने करून स्टेनने आपल्या मूर्खत्वाचे प्रमाणपत्रच सादर केले आहे.
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@