‘कोटी’बहाद्दर कलाकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020   
Total Views |
Chandu  Parkhi_1 &nb


उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या आणि आपल्या दर्जेदार मुद्राभिनयाने ‘चंदू पारखी’ या हरहुन्नरी कलाकाराने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह नाटक आणि छोटा पडदादेखील चांगलाच गाजवला...



इंदूरमध्ये जन्मलेल्या चंदू पारखी यांचे आयुष्य हे एखाद्या काट्याकुट्याने भरलेल्या रस्त्याप्रमाणेच होते. आपल्याला अभिनयाव्यतिरिक्त दुसरे काहीच करता येणार नाही, अशी खुणगाठ चंदू यांनी आपल्या मनाशी बांधून ठेवली होती. इंदूरच्या या कलाकाराने आपली अभिनयप्रतिभा पुरेपूर ओळखली होती. अभिनय तर करायचा, पण नेमकं काय करायचं, कसं करायचं, हा विचार करत असताना त्यांनी प्रयोग म्हणून आपल्या घराभोवतीच्या परिसरात आपली कला आजमावून पाहण्यास सुरुवात केली. छोटी नाटुकली, विनोदी एकपात्री, इतर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कलेला रसिकजनांकडून प्रचंड दाद मिळाली.


अभिनय हे आपल्या चरितार्थाचे साधन म्हणून वापरायचे असेल, तर इंदौरहून मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी जाणले आणि एके दिवशी खिशात फक्त शे-दोनशे रुपये खिशात असताना, सरळ इंदूर ते मुंबई गाडी पकडली. इतके कमी पैसे आणि इनमिन ओळख, इतक्या जुजबी गोष्टींसह त्यावेळी मुंबई गाठणे हा जीवघेणा जुगार तर होताच, पण खोल दरीत घेतलेली आंधळी उडीसुद्धा होती. पण, हे सगळं साहस करताना चंदू पारखींच्या मनात नेहमी एक गाणे तरळायचे, ते म्हणजे ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम...’ ‘दो आंखे बारह हात’मधल्या या गाण्याचा त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव होता.


मुंबईत राहून नाटकात काम मिळावे यासाठी ते नेहमी संघर्ष करत, कधी कधी तर उपाशी राहूनही दिवस काढावे लागत. मनात आशेचं गाठोडं घेऊन ते मुंबई दूरदर्शनच्या मनोर्यात जायचे आणि तिथे त्यांना एखादं काम मिळालं की, त्यांच्या सातआठ दिवसांच्या जगण्याची सोय होऊन जायची. याच काळात त्यांनी गणेशोत्सवातल्या नाटकांतून भूमिका करण्यास सुरुवात केली. या नाटकांमुळे त्यांना रंगमंचाची खोलवर ओळख झाली आणि याच रंगमंचाने त्यांना स्वतःची ओळख मिळवून देण्यास सुरुवात केली. हळूहळू आपल्या सजग अभिनयातून रंगभूमीवर पदार्पण करण्यास ते सज्ज झाले. या प्रवासातच त्यांना ‘निष्पाप’ नावाचं नाटक मिळालं आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाले. हे त्यांचं पाहिलं नाटकं. या नाटकाने त्यांना ‘अभिनेता’ अशी ओळख मिळवून दिली आणि इथून पुढे त्यांना नाटकं, चित्रपट, मालिका मिळत गेल्या. त्यांच्या जगण्याचा भरकटलेला पतंग स्थिरावू लागला.


‘निष्पाप’ हे त्यांचं नाटक सुरू असताना त्यांचा राहण्याचा, जेवण्याखाण्याचा खर्च कसाबसा सुटत होता. पण, कधी कधी अशी वेळ येत होती की, जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. अशा वेळी पोटात जो आगडोंब उसळायचा तो शमवण्यासाठी त्यांनी स्वत:च एक शक्कल शोधून काढली. ते आपल्या झब्ब्याच्या खिशात दहा-बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन फिरायचे. पोटात भुकेचा असा आगडोंब उसळला की खिशातल्या चार-पाच लसणाच्या पाकळ्या काढायचे, त्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे. त्यामुळे त्यांची भूक शमायची किंवा मारली तरी जायची. या उपायामुळे ते प्रचंड आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनचा कोर्स घ्यायला भाग पाडलं. आपण आजारी आहोत आणि आपल्याला इंजेक्शन्स घ्यावी लागतात, हे कळलं तर त्याचा आपल्या वर्तुळात बभ्रा होईल. त्यामुळे आपल्याला कामं मिळताना कठीण जाईल, या भीतीने चंदू पारखींनी नाटकातल्या आपल्या सहकारी कलाकारांना या बाबतीत काही कळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली.


‘निष्पाप’च्या यशानंतर ’माझा खेळ मांडू दे’, ‘अशी ही फसवा फसवी’ या नाटकांसोबतच त्यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून कधी विनोदी, तर कधी खलनायकी भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील ‘व्योमकेश बक्षी’, ‘अडोस पडोस’, ‘रिश्ते नाते’, ‘लाईफलाईन’,’ जबान संभाल के’ अशा हिंदी मालिका, तसेच ‘मोहरे’, ‘पेस्टनजी’, ‘राम जाने’, ‘धारावी’, ‘अंगारे’ अशा हिंदी चित्रपटामधून ते प्रेक्षकांसमोर आले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘बाप रे बाप’, ‘कळत नकळत’, ‘बलिदान’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘राम रहीम’ यातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक देखील झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘दुसरे निळू फुले’ अशी एक ओळख त्यांना मिळाली होती. “माझी जागा कोणी घेईल, तर तो चंदू पारखीच असेल,” असे चंदू यांचे कौतुक स्वतः निळू फुले यांनी केले होते. त्यांच्या कलाप्रवासाला मानवंदना म्हणून इंदूरच्या महाराष्ट्र साहित्य सभागृहात ‘चंदू पारखी स्मृती एकांकिका’ स्पर्धांचे आयोजनही केले जाते.


अभिनयाची अनोखी लकब आणि शैली या वैशिष्ट्यगुणांमुळे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. हा प्रवास चालू असतानाच १४ एप्रिल १९९७ रोजी या कलाकाराने जगाचा निरोप घेतला. अशा या हरहुन्नरी कलाकाराच्या स्मृतीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे विनम्र अभिवादन!
@@AUTHORINFO_V1@@